अमेरिकन वृत्तवाहिन्यांचे धाडस

भारतात वृत्त वाहिन्यांवरील चर्चा हा अलीकडच्या काळात चेष्टेचा विषय ठरतोय. बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या, कंगना राणावत व महाविकास आघाडीमधील वाद हि त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत. त्याआधी फायटर प्लेन राफेलचे भारतातील आगमन असो का भारताने पाकिस्तावर केलले सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक असो, काही वृत्तवाहिन्यांच्या अतिउत्साही पणाचा अनुभव भारतीय टीव्ही प्रेक्षकांनी घेतलेला आहे. याची आता आठवण येण्याचे कारण म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची वादग्रस्त विधाने आणि त्याविरोधात सीएनएन, एनबीसी, सीबीएस यासारख्या दिग्गज वाहिन्यांनी घेतलेली भुमिका! ट्रम्प वारंवार खोटं बोलत असल्याने आणि वादग्रस्त विधाने करत असल्याने या वाहिन्यांची त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण मध्येच थांबवलं. अर्थात या वाहिन्याही काही दुधाच्या धुतलेल्या नाहीत मात्र त्यांनी दाखविलेले धाडस भारतीय वृत्त वाहिन्या करु शकतील का? हा मुख्य प्रश्‍न आहे.


ओरडणारे अँकर्स व वायफळ चर्चांना प्रेक्षक कंटाळले

वृत्त वाहिन्यांवरील चर्चा आणि त्यांची विश्‍वासर्हाता हा भारतात नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे. ज्वलंत प्रश्‍नांबाबत ३६० अशांने समाजाला माहिती व्हावी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे आणि जनमानसाचे प्रतिबिंब जाणून घ्यावे हा त्या चर्चेमागील उद्देश असायला हवा. पण, हा हेतू आता मागे पडला असून, ब्रेकिंग न्यूज  आणि आपल्या चॅनलचा टीआरपी कसा वाढेल याकडे सर्वच वाहिन्यांचे लक्ष असते. नजिकच्या काळात बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या आणि अभिनेत्री कंगना राणावत आणि महाराष्ट्रातील महाविकास आघडी सरकारमधील वाद या दोन विषयांवरुन काही वृत्त वाहिन्यांनी पत्रकारितेची मुल्ये पायदळी तुडवत अगदी किळसवाणे दर्शन लाईव्ह घडविले. टीव्हीवर जोरजोरात ओरडणारे अँकर्स व वायफळ चर्चांना प्रेक्षक कंटाळले होते. असे प्रथमच घडले नव्हते, श्रीदेवीचा अपघाती मृत्यू, करिना-सैफ, विराट-अनुष्काचे लग्न आदी विषयांच्या वेळीही याची प्रचिती टीव्हीच्या प्रेक्षकांना आलेली आहे. प्रसिद्धी माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जातात; पण तो आता भूतकाळ ठरला आहे. अनेक माध्यमांना त्यांची निष्ठा कुठेतरी एखाद्या राजकीय पक्ष, उद्योग व्यवसाय, सरकार, धार्मिक विचार यांच्याशी बांधली गेलेली आहेत. हे कटूसत्य आता लपून राहिलेले नाही. यामुळे एखाद्या राजकीय पक्षाशी किंवा व्यक्ती समर्थनार्थ किंवा विरोधात असे दोन अ‍ॅगल्स ठळकपणे जाणवता. एखद्या नेत्याने खोटे किंवा वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यात तेल, मिरची टाकून फोडणी देण्याचे प्रकार सातत्याने पहायला मिळतात. याचा समाजावर काय परिणाम होईल, याचे भान ठेवण्याचे प्रकार आता हळूहळू लुप्त पावतेय की काय? असा प्रश्‍न अनेकांच्या डोक्याचा भुगा बनवितो. अर्थात काही वृत्त वाहिन्यांनी तठस्थ भुमिका मांडत पत्रकारितेची विश्‍वासर्हाता टिकवून ठेवली आहे, हे नमुद करायलाच हवे. आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान अमेरिकेच्या काही वृत्त वाहिन्यांनी चौकटी बाहेरचे धाडस केल्याने त्या जगभरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहेत. 

विश्‍वसनीयतेवर प्रश्नचिन्ह

सर्व जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाची इतकी अटीतटीची कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवरील निवडणूक अनेक अर्थांनी अभूतपूर्व म्हणावी लागेल. अनेक पातळ्यांवर दुभंगलेल्या या महासत्तेची ही लढाई इतकी सोपी असणार नाही, याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते; पण त्यात उत्कंठेपेक्षा अधिक तणाव आणि भीतीयुक्त वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या चार दिवसांनंतरही निकाल स्पष्ट होऊ शकलेले नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हार मानायला तयार नाहीत. ते काउंटिंग रोखण्याची मागणी करत आहेत. ही निवडणूक त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अधिकच चर्चेत आहे. आता त्यांचा पराभव जवळपास निश्‍चित झाल्यानंतरही हे हार मानायला तयार नाहीत. याकाळात त्यांनी अनेक खोटे दावे केले. निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदा व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेत कोणतेचही पुरावे न देता खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. ते १७ मिनिट बोलले आणि अशाच प्रकारचे खोटे दावे करत राहिले. अमेरिकेच्या तीन प्रमुख न्यूज चॅनल्स सीएनएन, एनबीसी, सीबीएसने याला देशाची स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेविरोधात मानले आणि व्हाइट हाऊसमधून लाइव्ह कव्हरेज थांबवले. यामुळे ट्रम्प यांच्यापेक्षा अमेरिकेच्या वृत्त वाहिन्यांच्या भुमिकेची जगाने दखल घेतली. कारण ट्रम्प यांच्या खोट्या दाव्यांमुळे देशात अशांतता निर्माण होवून देशाचे नुकसान होण्याची शक्यता आधिक होती. या पार्श्‍वभूमीवर या वृत्तवाहिन्यांची भुमिका स्वागतार्हच म्हणावी लागेल. आपल्याकडे एखाद्या पक्षामुळे किंवा नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दंगली, रक्तपात, तणाव निर्माण झाल्याचा इतिहास आहे. अशावेळी त्या विषयावर कथित तज्ञ आमंत्रित करुन चर्चासत्र घडवून आणली जातात. मात्र हे चर्चासत्रच आगीत तेल ओतण्याचे प्रकार करत असल्याचा अनेकवेळा अनुभव आला आहे. या चर्चासत्रांमध्ये एकमेकांना शिवीगाळ करण्यापासून हमरीतुमरी पर्यंत वाद पोहचले आहेत. आता फक्त हाणामारीच होणे बाकी राहिले आहे. काही वेळा एखाद्याचे वैयक्तिक, राजकीय, सामाजिक प्रतिमा उद्ध्वस्त करणे, अशा प्रकारची सुपारी घेऊन मीडिया ट्रायल अर्थात चर्चा घडवून आणत आहेत का? असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे वाहिन्यांना टीआरपी भले लाभत असेल; पण त्यांच्या विश्‍वसनीयतेवर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित झाले आहे, हे नाकारता येणार नाही. 

Post a Comment

Designed By Blogger