दिवाळीच्या गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण!

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेले काही महिने बंदिस्त जीवन जगणार्‍या नागरिकांनी पुनश्च हरिओमनंतर तसेच दिवाळीच्या पाशर्वभूमीवर उत्सवी खरेदी करण्याला प्राधान्य दिल्याचे चित्र कोणत्याही बाजारपेठेत फेरफटका मारतांना दिसून येत आहे. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली असल्याने मरगळ झटकून बाजारपेठाही गजबजल्या आहेत. ही एक सकारात्मक बाब असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, याचे भान ठेवण्याची आवश्यकता आहे. कोरोनाबाबतची नागरिकांची बेफिकिरी जनतेला भविष्यात भारी पडू शकते, असा इशारा सरकार आणि तज्ञांकडून वारंवार दिला जात आहे. मात्र जणू कोरोनाचे संकट टळले आहे, अशा अर्विभावात वावरणार्‍यांमुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. तशी वेळ भारतात येवू नये यासाठी सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे....तरच कोरोनाला हरवणे शक्य

गेल्या आठ महिन्यापासून संपूर्ण जगभरात कोरोनाची साथ सुरू आहे. मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात पहिला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर संपूर्ण देशांत लॉकडाऊन करण्यात आला. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आरोग्य कर्मचारी व पोलिसांनी कडक उपाययोजना करून कोरोनाला अटकाव केला. ऑगस्टनंतर विशेषत: गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोनावर सप्टेंबर अखेरनंतर पुन्हा नियंत्रणात मिळवण्यात आले आहे. मात्र दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण दिवाळीचा मोठा सण चार दिवसांवर आला आहे. नागरिकांनी कपडे, फटाके, फराळ, रांगोळी, कंदील खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केल्याने बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत. यात सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. रस्त्यावर फिरताना सामाजिक अंतर न राखणे आणि मास्क न लावता फिरताना नागरिक दिसत आहेत. लोकांचे वर्तन असे आहे की जणू कोरोना नाहीसा झालेला आहे आणि आपले जीवन पूर्ववत झाले आहे. मात्र कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे स्वतःची खबरदारी हीच जबाबदारी हे मनात ठेवत पुढील काही दिवस नियमांचे पालन केले तर अन् तरच कोरोनाला हरवणे शक्य होईल. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर योग्य ते प्रयत्न आजही सुरु आहेत. मात्र कोरोनाला खरंच हरवायचे असेल तर सरकारी यंत्रणेला सगळ्यांची साथ मिळणे गरजेचे आहे. 

प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून वागले पाहिजे

राज्यात रुग्ण दुपट्टीचा कालावधीही ५४ दिवसांवरुन २०८ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. कोरोना नियंत्रणात येत असला तरी संकट टळलेले नसून बेसावध राहणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देणेच होईल. कोरोनावर लस नसल्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह तोंडावर मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. ‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते. परंतू दिवाळीचा आनंद खर्‍या अर्थाने लुटायचा असेल तर काही पथ्ये पाळावीच लागतील. बाजारात होणारी गदी ही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला आमंत्रण देणारे ठरु शकते. कोरोना संकटामुळे प्रत्येकाने दिवाळीसण साजरा करताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी सरकारला कायदे करण्याची गरज पडू नये. कारण कोरोनाला रोखण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे, तशी आपलीही आहे. दुसर्‍याबाजूला कोरोनाची लागण होऊन जीव गमवावा लागला त्यांच्या घराच्यांना तर आपल्या घरातील मृत व्यक्तीचे अंत्यदर्शनही घेता आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचीही जबाबदारी समाजाची आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सामाजिक अंतर पाळताना माणसेच माणसांपासून दुरावली. एरव्ही कुठलेही संकट येवो, परंतु कोरोनामुळे हाकेला धावणारा समाज एकमेकांपासून दुरावला. अशी परिस्थिती पुन्हा येवू नये यासाठी प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. 

कोरोनाचा उद्रेक झाला तर.....

दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण खूप वाढते. यावर्षी फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे विकार होवून कोरोनापूरक स्थिती निर्माण होऊ शकते. दिवाळीत फटाके फोडायचे का नाही? हा वाद दरवर्षी होत असला तरी यंदाची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. राज्यात अनलॉक पर्व सुरू झाल्यानंतर वाहतूक , नागरिकांची वर्दळ वाढत आहे. काही पक्षांकडून सर्वसामान्यांसाठी रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे, प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी दबाव आणला जात आहे. आरोग्यसेवा यंत्रणा, पोलीस दल गेल्या सात महिन्यांहून अविरत काम करत आहे. कोरोनावरील लस उपलब्ध होऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही काही महिन्यांचा काळ लागणार आहे. जागतिक आरोग्य संघटना, देशातील आरोग्य विभाग, राजकीय नेते यावर वेगवेगळी मते मांडत आहेत. कोरोना संकटात प्रत्येक नागरिकांनी जबाबदारी ओळखून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखावे. स्वतःच्या हातापायांची स्वच्छता राखत भोवतालचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवावा. मास्कशिवाय घराबाहेर पडणे टाळावे याचे पुन्हा स्मरण करून द्यावेसे वाटते. मुंबई लोकलसह रेल्वे प्रवास सुरु करण्याची ओरड केली जात आहे. ही ओरड सर्वसामान्य प्रवासी करतही असेल, ते कोणी नाकारू शकत नाही. मात्र मंदिर, लोकल यावरुन राजकारण केले जात आहे, हेच मोठे दुर्दव्य आहे. लोकल सुरु झाली, मंदिरांचे दरवाजे उघडले आणि कोरोनाचा उद्रेक झाला तर त्याला तुम्ही आणि आम्ही जबाबदार असू हे सत्य नाकारता येणार नाही. कोरोनाच्या नावाखाली राजकारण सुरु आहे, तो राजकीय भाग आहे. परंतु भविष्यात आपल्याला कुटुंबासोबत आयुष्य जगायचे असेल तर कोरोना विरोधातील लढा देत राहिला पाहिजे. याकरीता दिवाळीच्या सणासुदीमुळे कोरोना वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, एवढीच माफक अपेक्षा आहे.

Post a Comment

Designed By Blogger