अबकी बार बायडन सरकार

जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र म्हणून दबदबा असणार्‍या अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक हा संपूर्ण जगासाठी उत्सुकतेचा विषय असतो. सर्वशक्तिमान राष्ट्राच्या अध्यक्षपदी कोण निवडून येणार यावर जागतिक राजकारणाचा पट अवलंबून असतो. यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. अमेरिकेची यंदाची निवडणूक भारतासाठी विशेष मानली जात होती. आशिया खंडात एक नवीन शक्तीशाली राष्ट्र म्हणून उदयास येणार्‍या भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध असो का निवडणुकीत भारतिय मतदारांचा दबदबा असो, विद्यमान राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन या दोघांनाही याची पुरेशी जाणीव असल्याने दोन्ही पक्षांनी भारत व अनिवासी भारतियांची मने जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ही निवडणूक कोणीही जिंकू अथवा हरू याचा परिणाम अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांवर होणार नाही, अशी अटकळ सुरुवातीपासून बांधली जात होती कारण सध्या दोन्ही देशांमधील संबंध मजबूत आहेत. तरी ट्रम्प यांच्या तुलनेत बायडनचा विजय भारतासाठी आनंददायी ठरू शकणारा आहे.


ट्रम्प प्रशासनाविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त

सर्वात मोठी लोकशाही असण्याचा मान जसा भारताला मिळाला आहे. तसा सर्वात जुनी लोकशाही असण्याचा मान अमेरिकेला मिळाला आहे. जवळपास २०० वर्षापेक्षा जास्त म्हणजे सन १८०४ मध्ये अमेरिकेत निवडणुकीची सुरुवात झाली. दर चार वर्षांनी होणार्‍या या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून असते. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. कोरोनाचे संकट रोखण्यात आलेले अपयश, वाढती मृत्यू संख्या आणि बेरोजगारी या दोन प्रमुख्य मुद्यांवर झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथील मतदार वर्ग राजकीय दृष्ट्या दुभंगल्याचे स्पष्ट झाले. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन या दोघांनी आपापले पारंपरिक मतदार गड राखले, मात्र अटातटीच्या लढतीत ट्रम्प पराभवाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या इतिहासात १९९२ नंतर सलग दुसर्‍यांना संधी न मिळणार्‍यांमध्ये ट्रम्प यांचे नाव नोंदविले जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत अमेरिकी भारतीय मतदारांनी कळीची भूमिका निभवल्याचे निदर्शनास येते. डेमोक्रॅटिक पक्षाच्या विद्यमान चार खासदारांची फेरनिवड करून भारतीय मतदारांनी ट्रम्प प्रशासनाविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त केला आहे. फ्लोरिडा, जॉर्जिया, मिशिगन, नॉर्थ कॅरोलायना, पेनसिल्व्हानिया आणि टेक्सास या अटीतटीच्या राज्यांमध्ये तब्बल १८ लाख भारतीय मतदार आहेत. या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांनी भारतीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यातील डॉ. अमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना व राजा कृष्णमूर्ती या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या विद्यमान खासदारांची फेरनिवड मतदारांनी केली आहे. 

भारत अमेरिकेदरम्यान दृढ संबंध 

या निवडणुकीचे अजून एक वैशिष्टे म्हणजे, बायडेन यांनी सर्वाधिक मत मिळवण्याचा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा विक्रम मोडीत काढला आहे. फेडरल इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीनुसार २००८ साली पहिल्यांदा निवडणूक लढणार्‍या बराक ओबामा यांनी सहा कोटी ९४ लाख ९८ हजार  ५१६ मते मिळवली होती. मात्र बायडन यांनी सात कोटींपेक्षा जास्त मते मिळवून नवा विक्रम स्थापित केला आहे. बायडन अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्टोरल मतांच्या जादुई आकड्याच्या जवळ पोहोचले आहेत. बायडन यांना आतापर्यंत २६४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. या अध्यक्षपदासाठी २७० इलेक्टोरल मते मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यो बायडन यांना विजय मिळविण्यासाठी फक्त आणखी सहा इलेक्टोरल मतांची गरज आहे. सध्या काही भागात हिसांचार उफाळून आल्याने मतमोजणी थांबविण्यात आली असल्याने निकालाला उशिर होत आहे. अजून अंतिम निकाल जाहीर होण्यास बराच कालावधी जावू शकतो मात्र निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारताच्या दृष्टीने अमेरिकेच्या निवडणुकीला प्रचंड महत्व असते. भारत अमेरिकेदरम्यान राजनितीक, रणनितीक, सामरिक आणि आर्थिक स्तरावर दृढ संबंध आहेत. अमेरिकेचे चार अध्यक्ष बिल क्लिटंन, जॉर्ज बुश, बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प या सर्वांचा भारताशी संबंध अधिक दृढ करण्यावर भर होता. बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळापासून दोन्ही देश एकमेकांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. त्यानंतर आलेले डोनाल्ड ट्रम्प यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली मैत्री सर्वश्रृत आहे. ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात भारताचा सर्वात चांगला मित्र म्हणून ओळख मिळवली आणि दोन्ही देशांचे संबंध नव्या उंचीवर नेले. चीन व पाकिस्तानसोबतच्या वादात ट्रम्प भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्याचे पहायला मिळाले. त्यांच्या लहरी स्वभावामुळे पर्यावरण, प्रदुषण, विसासह अनेक मुद्यांवर त्यांनी भारतावर टीका देखील केली मात्र त्याचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवर होऊ दिला नाही. 

बायडन यांचा विजय भारतासाठी फलदायीच

आता कोरोना संसर्गाने अमेरिकेला घट्ट विळखा घातला असतानाही धामधुमीत अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत बायडन यांनी बाजी मारली. बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या आहेत तसेच राहतील आणि त्यापेक्षाही पुढच्या स्तरावर जातील, याची दाट शक्यता आहे. बायडन हे अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक मानले जातात. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उप राष्ट्राध्यक्ष म्हणून बिडेन यांनी आठ वर्ष काम केले आहे. भारत-अमेरिका नागरी अणुकराराच्या मंजुरीसाठी आणि द्विपक्षीय व्यापारातील ५०० अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उद्दीष्ट ठेवण्यात बायडन यांचा मोलाचा वाटा होता. बायडन यांच्या कोअर टीममध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांच्या वतीने, उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आहेत, तर बायडन यांचे दोन महत्त्वाचे सल्लागारदेखील भारतीय वंशाचे आहेत. याखेरीज बायडन यांनी निवडणुकीदरम्यान सांगितले आहे की, ओबामा-बायडन प्रशासनाने नेहमीच भारताशी मजबूत संबंधांना प्राधान्य दिले. त्यामुळे आता त्यांच्या निवडीमुळे भारत आणि अमेरिका समन्वय अधिक मजबूत होईल. यामुळे बायडन यांचा विजय भारतासाठी फलदायीच ठरणारा आहे. मात्र याच वेळी बायडन यांचे चीनसोबत वैयक्तीक व्यापारी संबंध आहेत, हे देखील विसरुन चालणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger