यंदाची दिवाळी फटाक्यांविना!

राज्यासह देशात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरीदेखील कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळीत फटाक्यांचे विशेष आकर्षण असते. देशाभरात मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होत असल्याने प्रत्येक दिवाळीला प्रदुषणाचा मुद्दा चर्चेत असतो. फटाक्यांच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे अनेक लोकांच्या कानांचे पडदे फाटतात, तसेच धुरामुळेसुद्धा वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. फटाक्यांमुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढून ओझोनच्या थरावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते, असे मुद्दे पुढे करत फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणवाद्यांकडून दरवर्षी होत असते. यंदाची दिवाळी ही कोरोना विषाणूच्या काळात आली आहे. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढण्याची शक्यता असल्याने राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतषबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेहलोत सरकारच्या या निर्णयावर नाराजीचे ‘फटाके’ उडू लागले आहेत.


फटाक्यांतून निघणार्‍या विषारी धुराचा त्रास

अवघ्या जगावर कोरोनाचे सावट आहे. भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबई, पुणे, नाशिकसह अन्य मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नाही. जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्पेनसारख्या विकसित देशांत कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. अनेक देशांना तर पुन्हा लॉकडाउनची घोषणा करावी लागली आहे. आपल्याकडेही अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आपणही सावधगिरी बाळगायला हवी, असा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले ही या क्षणाची समाधानाची बाब आहे. पण आता कोरोनाची काळजी करायची नाही असे म्हणत आपण वावरू लागलो तर सुपर ऍडेड कोरोनाचा संसर्ग विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना व अन्य आजाराने ग्रासलेल्या लोकांना टाळता येणार नाही. त्यात दिवाळी आली आहे. कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. अशावेळी त्यांना फटाक्यांतून निघणार्‍या विषारी धुराचा त्रास होऊन जीव धोक्यात येऊ शकतो. दिवाळीत फटाके फोडले तर त्याचा धूर मोठ्या प्रमाणावर वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांसह नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. यामुळे या वर्षी कोरोनाला हरविण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, असे आवाहन पर्यावरणवाद्यांकडून केले जात आहे. 

दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी 

डॉक्टरांच्या मते फटाक्यांचा धूर दम्याचा विकार असलेल्यांना खूप धोकादायक आहे. अशात त्यांना कोरोना चा संसर्ग झाला तर तो सुपर ऍडेड कोरोना खूप चिंतेचा असणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू न देणे हे आवश्यक नव्हे तर अत्यावश्यक आहे. यापार्श्‍वभूमीवर फटाक्यांच्या विषारी धुरापासून कोरोना संक्रमितांच्या संरक्षणासाठी राजस्थानमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतषबाजीवर बंदी घातली आहे. धुरामुळे कोरोनाबाधितांबरोबरच हृदय आणि श्वासनाची समस्या असणार्‍या रुग्णांनाही त्रास सहन करावा लागतो, यामुळे, दिवाळीत लोकांनी आतषबाजी करू नये. एवढेच नाही, तर त्यांनी फटाके विक्रीच्या अस्थायी लायसन्सलाही स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाचा संसर्ग अजून कमी झालेला नाही. त्यात आता दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढू शकतो. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहून केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत असली तरी हे काही प्रथमच होत आहे, असे मुळीच नाही. दिवाळीमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार होतात, असे अनेक अहवाल आजवर प्रसिद्ध झाले आहेत. विशेषत: शोभेच्या दारुमुळे वायू प्रदूषण, धूर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अगोदरच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या दिवाळीत कुठलेही फटाके, शोभेची दारु उडविण्यात बंदी करावी, अशी मागणी पर्यावरणवाद्यांकडून होत असते. काही वर्षांपुर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे, त्यावेळी तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही महाराष्ट्रातही फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. त्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प देखील केला होता. देशात पारंपरिक सण आणि उत्सवांना महत्त्व असून, ते साजरे करताना पर्यावरणावर प्रतिकूल परिणार होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. 

मेट्रो सिटी, शहरी, निमशहरी, ग्रामीण असे वर्गीकरण आवश्यक

दिवाळीत फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. गत दोन-तिन वर्षांपासून शालेय मुलांना फटाकमुक्त दिवाळीची शपथ देखील दिली जात आहे. आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने हे योग्य देखील वाटते मात्र फटाके केवळ दिवाळीतच फुटतात का? याचे उत्तर नकाररार्थीच आहे. नव वर्षाचे स्वागत करतात, निवडणुक काळात, लग्न समासंभ, मिरवणूका आदी कार्यक्रमांनाही मोठ्याप्रमाणत आतषबाजी केली जाते. जर बंदी घालायचीच असेल तर सर्व ठिकाणी घातली गेली पाहिजे. ही बंदी घालतांना सरसरक निर्णय घेण्याऐवजी मेट्रो सिटी, शहरी, निमशहरी, ग्रामीण असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. कारण प्रदुषणाची स्थिती व मर्यादा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. यावेळी या व्यवसायाच्या अर्थकारणाचाही विचार करणे आवश्यक आहे. आधीच कोरोना व लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यात नवी भर टाकतांना ३६० अंशाने विचार करावा लागणार आहे. कोरोना रोखण्यासाठी केवळ फटाक्यांवर बंदी घालून पुरेसे होणार नाही कारण दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दिवाळी जरूर आनंदाचा क्षण आहे पण हा सण पुढेही आनंदाने साजरा करता यावा म्हणून आता थोड्या मर्यादा पाळणे आवश्यकच आहे. कोरोना केवळ तोंडाला मास्क बांधला म्हणून जात नाही. संपर्क टाळणे, वेळोवेळी हात धुणे, अनावश्यक कारणासाठी बाहेर न पडणे हे आजही पाळणे गरजेचे आहे. नाहीतर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला आमंत्रण मिळणार, यात शंका नाही!

Post a Comment

Designed By Blogger