पुलवामाबाबत ना‘पाक’ कबुलीनामा

भारतातील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हे पाकिस्तानचेच कारस्थान होते, हे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुलीच खुद्द पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरी यांनी या हल्ल्याचे समर्थन करताना इम्रान खान सरकारचे हे मोठे यश असल्याचा दावा करत एकाप्रकार स्वत:च्या देशाचा बुरखा टराटरा फाडला, राजकीय कुरघोडीच्या प्रयत्नात का होईना पण त्यांच्या तोंडी अखेर सत्य आलेच! फवाद यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुकच केले पाहिजे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जाणारे फवाद यांनी ही कबूली कुण्या राजकीय सभेत दिली नसून त्यांच्या देशाच्या संसदेत दिली आहे. यामुळे याला निश्‍चितच महत्व आहे. या नापाक कबुलीनामामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाच आहे. त्यासोबत भारतात बसून पाकिस्तानचे गुणगाण गाणार्‍यांच्याही थोबाडीत बसली आहे.


पाकिस्तान आणि दहशतवाद हे समानार्थी शब्द

दहशतवाद आणि आतंकवादाचे नंदनवन असणार्‍या पाकिस्तानाचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारत गेल्या ७० वर्षांपासून प्रयत्नरत आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद हे समानार्थी शब्द आहेत असे भारत जगाला समजविण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांपासून यास हळूहळू यश मिळू लागले असले तरी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याची तयारी अद्यापपर्यंत एकाही देशाने दाखविलेली नाही. अमेरिकेवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला करणारा ओसामा बीन लादेनला अमेरिकेने थेट पाकिस्तानमध्ये घूसून यमसदनी पाठविल्यानंतरही अमेरिकेने अधून मधून आर्थिक बंधने लादण्या व्यतिरिक्त ठोस अशी भुमिका घेतलीच नाही. कारण अमेरिका व चीन या दोन बड्या राष्ट्रांची ऐकमेकांवरील कुरघोडी पाकिस्तानच्या नेहमी पथ्थ्यावर पडत आली आहे. कधी अमेरिकेकडून तर कधी चीनकडून मिळणार्‍या भिकेवर पाकिस्तान स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे. आंतरराष्ट्रीय हितसंबंधांमुळे अनेक राष्ट्राना पाकिस्तानला थेट दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यात येणारी अडचण आता खुद्द पाकिस्ताननेच दुर केली आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामा येथे सुरक्षा दलांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. 

पाकिस्तानवर कर्ज नव्हे भीक मागण्याची वेळ

काँग्रेस व इतर पक्षांनी हा हल्ला म्हणजे ‘राजकीय कट-कारस्थान’ असल्याचा आरोप केला होता. मात्र आता पुलवामा हल्ला आम्हीच घडवून आणला, भारताला घरात घुसून मारले, अशी वल्गना पाकिस्तानच्याच मंत्र्याने त्यांच्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात केली. चौधरी यांचे हे वक्तव्य पाक सभागृहातील विरोधी पक्षाचे नेते अय्याज सादिक यांना प्रत्युत्तर म्हणून दिलेले होते. पाकिस्तानच्या ताब्यात गेलेला भारताचा पायलट कॅप्टन अभिनंदन यांना सोडले नाही तर भारत रात्री ९ वाजता पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी त्यावेळी एका बैठकीत सांगितले होते असा गौप्यस्पोट पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते अयाज सादिक यांनी केला. व भारतीय हल्ल्याची माहिती देताना पाकचे लष्करप्रमुख बाजवा यांचे पाय थरथरत होते, असे सादिक म्हणाले. हाफिज सईद, अझहर मसूद सारख्या कुख्यात दहशतवाद्यांना खूश करण्यासाठी भारत विरोधी कारवाया करायच्या व अंगाशी यायला लागल्यानंतर कधी अमेरिका तर कधी चीन तर कधी मुस्लिम राष्ट्रांकडे मदतीसाठी बांग ठोकायची, असा आजवरचा पाकिस्तनचा अनुभव राहिला आहे. दहशतवादी व कट्टरपंथीयांना पोसण्याच्या नादात पाकिस्तानवर कर्ज नव्हे भीक मागण्याची वेळ आली आहे. तरी भारतद्वेषाने पछाडलेल्या तेथील राज्यकर्त्यांना त्याची फिकीर नाही. 

सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईकवर भारताच प्रश्‍नचिन्ह

पाकिस्तानने अशाप्रकारची कबुली पहिल्यांदाच दिली आहे असे नाही. दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानची आर्थिक राजधानी असणार्‍या कराचीमध्ये राहतो आणि त्याचे घर हे कडेकोट सुरक्षाव्यवस्था असणार्‍या लष्करी वसाहतीमध्येच आहे, हे उघड गुपित आहे. मात्र, पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आजवर कधीही तो तिथे आहे, याची कबुली दिलेली नव्हती परंतू भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर दहशतवाद्यांच्या यादीत दाऊदचे नाव आल्यानंतर त्यांनी एकाप्रकारेच कबुलीच दिली होती. मुंबईवर २००८ मध्ये २६/११ रोजी झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘लष्करे तैयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला अमेरिकेने कानपिचक्या दिल्यानंतर का होईना, अखेर पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या देशाचा आजवरचा खोटेपणा उघडा पडला होता. आता चौधरींच्या कबुलीनामाचा भारत कशा प्रकारे उपयोग करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. या कबुलीनामामुळे केवळ पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही राजकीय वादळ उठले आहे. कारण सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईकवर भारताच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यापर्यंत काही नेत्यांची मजल गेली होती. पुलवामा हल्ल्यावरदेखील असेच प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. मात्र आता चौधरीच्या कबुलीनामानंतर काँग्रेसने भाजपावर केलेला आरोप खोटा ठरला आहे. यामुळे काँगे्रसने देशाची माफी मागावी, अशी मागणी करतभाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल करत काही लोक पुलवामा हल्ल्यातही राजकीय स्वार्थ शोधत होते. देशाला इतकी मोठी जखम झाली असताना काही लोकांना हल्ल्यातही राजकारण दिसले. पण आता पाकिस्तानन संसदेत ज्याप्रकारे सत्य स्वीकारण्यात आले आहे त्याने या लोकांचा खरा चेहरा देशांसमोर आणला आहे, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात मात्र जेथे देशाच्या सार्वभौमात्वाचा विषय येतो किमान तेथे तरी राजकारण व्हायला नको, याचे भान राज्यकत्यांनी ठेवायला हवे. नाही तर पाकिस्तान आणि त्यांच्या मानसिकतेत फरक कोणता?


Post a Comment

Designed By Blogger