सोशल मीडियाची ‘फेकाफेकी’

सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येकजण हा कुठल्या ना कुठल्या सोशल साईटशी जोडलेला असतोच. फेसबुक ही मोठ्या प्रमाणात यूजर्स असलेल्या सोशल साईट पैकी एक आहे. कोटयवधींच्या संख्येने यूजर्स फेसबुक या सोशल साईटचा वापर करताना दिसतात. फेसबुक नावाचे एक मोठे जग निर्माण झालेले आहे. मात्र फेसबुकसह ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर खोटी अकाऊंट्स तयार करुन त्यामाध्यमातून खोटी माहिती पसरवली जाते, हे आता नवे राहिलेले नाही. गत काही दिवसांपासून सोशल मीडियावरील असे फेक अकाउंट्स चर्चेत आहेत. कारण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर सुशांतची आत्महत्या नसून हत्या झाली आहे, अशा चर्चा होऊ लागल्या आणि बरेच दिवस सोशल मीडियावर सुशांतबद्दल हॅशटॅगही टॉप ट्रेण्डमध्ये होता. यावर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशी केली असता तब्बल ८० हजार फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून सुरु असल्याचे समोर आले आहे. हाच मुद्दा धरुन शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


२५ कोटी अकाऊंट फेक 

फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावरील फेक अकाउंट्स व फेक माहितीचा मुद्दा अधून मधून चर्चेत असतो. अनेकदा आपल्याही फोनवर अशा प्रकारची माहिती येत असते. फोटोशॉपचा उपयोग करुन बातमी, फोटो मॉर्फ केले जातात. ते खरे आहे असे भासवण्यासाठी हे केले जाते. कोणत्याही माहितीची शहानिशा न करता फेक माहिती तयार केली जाते. एखाद्याची बदनामी करण्यासाठी, प्रतिमा निर्माण करण्यासाठी किंवा मलिन करण्यासाठी, दोन धर्मांमधील तेढ वाढवण्यासाठी, आपसातले शत्रुत्त्व वाढवण्यासाठी, दिशाभूल करण्याच्या उद्देशाने अशी ‘फेकाफेकी’ केली जाते. ही माहिती खरी आहे हे दाखवण्यासाठी न्यूज चॅनल्स, वृत्तपत्रे, वेबसाईट किंवा सेलिब्रटी, राजकारण्यांची बनावट अकाऊंट तयार करुन त्यावरुन ती प्रसिध्द केली जाते. त्यामुळे ही माहिती खरी आहे असे भासवता येते. गेल्या वर्षाच्या फेसबुकच्या वार्षिक अहवालामध्ये २५ कोटी अकाऊंट हे फेक असल्याच समोर आले होते. या बनावट अकाऊंटमध्ये विविध संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र, ब्रँडशी निगडीत असलेली अकाऊंट्स होती. विशेषत: अशी अकाऊंट्स बनविणार्‍या देशांमध्ये भारताचा वरचा क्रमांक आहे. भारत, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्ससारख्या विकसनशील मार्केटमध्ये बनावट अकाऊंट्सची सख्या अधिक आहे. फेसबुक वरील काही अकाऊंट्स पूर्णपणे बनावट आहेत, असे बनावट अकाऊंट्स विशिष्ट उद्देशाने बनवले जातात. 

खोट्या पेजला खर्‍या पेजहून अधिक लाइक्स

काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर आणि मकरंद अनापुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या ‘नाम’ संस्थेच्या नावाने सुरू केलेल्या खोट्या पेजला खर्‍या पेजहून अधिक लाइक्स असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर लगेचच सलमान आणि मनिषा कोईरालानेही त्यांच्या खोट्या अकाऊंट्सवरून फसवणूक सुरू असल्याचे जाहीर करत त्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. याआधी अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, शाहीद कपूर, शाहरूख खान, गुलशन गोव्हर, दिग्दर्शक अनुराग बासू, रणदिप हुडा, यामी गौतम यांनी वेळोवेळी आपल्या खर्‍या अकाऊंटवरून खोट्या अकाऊंटबद्दल चाहत्यांना सावध केले आहे. वरकरणी हा गमतीचा किंवा रिकामटेकड्यांच्या टिवल्याबावल्यांचा विषय वाटत असला तरी अनेकदा अशा फेक अकाऊंट्सवरील चुकीच्या माहितीची किंमत समाजाला, देशाला चुकवावी लागली आहे. आता सुशांतसिंग प्रकरणामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुबंई पोलिसांच्या दाव्यानुसार, मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी तब्बल ८० हजार फेक अकाऊंट्स तयार करण्यात आली या फेक अकाऊंट्सच्या माध्यामातून गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांबद्दल अफवा पसरवल्या गेल्या. सर्वाधिक फेक अकाऊंट्सचा प्रॉक्सी सर्व्हर हा परदेशातील आहे. मुंबई पोलिसांच्या विरोधात केलेल्या पोस्ट इटली, जपान, पोलँड, स्लोवेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलँड, रोमानियासारख्या इतर देशातून केल्या आहेत.

सोशल मीडियावरील वातावरण दूषित

याचा संबध बिहार विधानसभा निवडणुकांशी जोडला जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला असला तरी गेल्या काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर दीड लाख फेक अकाऊंट आहेत. काँग्रेसचे फेक अकाऊंट जास्त नसून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रचंड फेक अकाऊंट असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला होता. फेक अकाऊंटवरुन त्यांना व भाजपाला ट्रोल करण्यात येते, असा आरोप त्यांनी उघडपणे केला होता. त्याआधी गत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकने काँग्रेस पक्षाला जोरदार डिजिटल धक्का दिला होता. फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेली तब्बल ६८७ पेज आणि अकाऊंट्स डिलीट केली होती. यामुळे हा प्रकार भारतासाठी नवा नाही. परंतू हे केवळ भारतातच होते असे नाही. फेसबुक संस्थापक मार्क झकरबर्ग यांना अमेरिकन संसदेत यासंबंधीत विषयावरूनच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले होते. यावेळी एलेक्जांड्रिया ओकॅशिओ कोर्टेज यांनी फेसबुकच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. सोशल मीडियावरील जाहिरातींचा वापर लोकांच्या मतावर किंवा निवडीवर प्रभाव टाकून ध्रुवीकरण करणार्‍या ठरत असल्याकारणाने २०२० च्या अमेरिकन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्विटर सीईओ जॅक डॉर्सी यांनी ट्विटर या प्रसिद्ध सोशल मीडिया वेबसाइटवरून राजकीय जाहिराती बंद केल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. फेक न्यूज सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून पसरवल्या जाऊ नयेत म्हणून ट्विटरने ट्विटरने हजारो फेक न्यूज अकाऊंट्स डीलीट केले आहेत. पेड राजकीय प्रमोशन, खोटी माहिती पसरवून दिशाभूल करणे त्या त्या सोशल मीडियावरील वातावरण बर्‍यापैकी दूषित होत गेलेले दिसते. पेड ट्रेंडस, त्यासाठी फेक अकाऊंट्स, त्यावरून लागणारी भांडणे किंवा होणारे वादविवाद लक्षात घेता हे मूळापासून थांबवले जाणे गरजेचे आहेच. 

Post a Comment

Designed By Blogger