दिवाळीच्या सुट्टीचे नव्हे शाळेत जाण्याचे वेध!

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अनलॉक ५ च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु झाले आहेत. मात्र शाळा-महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. आता गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा १५ ऑक्टोबरपासून टप्याटप्याने पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भात पाहता राज्य सरकारने घाईघाईने शाळा सुरु न करण्याची भुमिका घेतली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोचा उद्रेक पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे, यात दुमत नाही. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, दिल्लीसह अनेक राज्य सरकारांनीही ३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही राज्यात शाळा कधी सुरू होणार, याबाबत संदिग्धता कायम आहे.


सहा महिन्यांपासून शाळा बंद

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागतात मात्र यंदा चित्र थोडेसे उलट आहे. सहा महिन्यांपासून घरी असलेल्या मुलांना आता वेध लागले आहेत ते शाळेचे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, हा एकच प्रश्न त्या सर्वांच्या तोंडी सामावला आहे. जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना महामारिमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे. मार्चपासून उद्भवलेल्या या महामारीमुळे देशातील सर्व शाळा जवळपाव सहा महिन्यांपासून बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथील केला जात आहे. अशातच शाळाही सुरु करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, संपूर्ण शाळेची साफसफाई, परिसराचे निर्जंतुकीकरण, उपस्थितीत लवचीकता, तीन आठवड्यांपर्यंत मूल्यांकन टाळणे आणि टाळेबंदीच्या काळातील घरगुती शिक्षणातून बाहेर पडून सहजपणे औपचारिक शिक्षण सुरू करणे इत्यादी सूचनांचा समावेश आहे. राज्यांनी आपापल्या गरजेनुसार आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी स्वत:ची आदर्श कार्यपद्धती तयार करावी, अशी सूचनाही आरोग्य विभागाने केली आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याची तयारी राज्य सरकार करत आहे, नववी ते बारावीचे वर्ग सुरु होतील अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकार धोरण आखत आहे, सध्या पहिली ते आठवी शाळा कधीपर्यंत सुरु होतील याची स्पष्टता नाही, कोरोनाचा प्रार्दुभाव होणार नाही याची काळजी घेत शाळा सुरु होतील असेही बच्चू कडूंनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान

शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे, यात कुणाचेही दुमत नाही. आपल्याकडे मागील काही दिवसांपासून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अनेक शाळांनी स्वीकारला आहे. मात्र ही व्यवस्था शहरांमधील मोठ्या शाळांपुरती मर्यादित आहे. बर्‍याच ग्रामीण भागात सर्वत्र इंटरनेट उपलब्ध नसल्याने शालेय शिक्षण रखडले आहे. दुसरीकडे सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मागील चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये, म्हणून सरकारच्या परवानगीने शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र आता या ऑनलाईन शिक्षणाचा आरोग्यवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालक करत आहे. ऑनलाईन शिक्षणसाठी सतत कॉम्युटर, मोबाईल समोर बसल्याने डोकेदुखी, डोळे लालसर होणे, कोरडेपणा, डोळ्यांवर ताण, डोळे लालसर होणे तर काही विद्यार्थ्यांच्या चष्म्याचा नंबर वाढल्याच्या समस्यांना सामोर जावे लागत आहे. अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्या देखील भेडसावू लागत आहे. सतत घरात बसून मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. मुलं शिग्रकोपी बनत असल्याच्या तक्रारी आता पालकवर्गातून होवू लागल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरु व्हायला हव्यात, असा विचार पुढे येत आहे. जो एकाबाजूने पाहिल्यास योग्य देखील आहे. मात्र याची दुसरीबाजू देखील तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. 

शाळा सुरु करण्याचा निर्णय महागात

जगाच्या पाठीवर अमेरिकेसह युरोप मधील काही देशांमध्ये अनेक शाळा सुरु झाल्या आहेत. ही एक सकारात्मक बाब असली तरी अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर एक सर्वेक्षण करण्यात आले. यात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, शाळा सुरु होण्याआधीच फक्त २ आठवड्यात ९७ हजार विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत एकूण ३ लाख ३८ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यातच ९७ मुलांना कोरोना झाला आहे. अमेरिकेच्या अकॅडमी ऑफ पीडियास्ट्रिक्सने १६ जुलै ते ३० जुलै या कालाधीत या आकडेवारीचा रिपोर्ट जारी केला आहे. यापूर्वी इज्राइललाही शाळा सुरु करण्याचा निर्णय महागात पडला आहे. या देशाने शाळा सुरु केल्यानंतर २६१ जणांना कोरोना झाला. त्यामुळे ६८०० मुलांना क्वारंटाईन करण्यात आले. यामुळे भारतात शाळा सुरु करण्याची घाई केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, अर्थात याची जाणीव केंद्र व राज्य सरकार या दोघांनाही असली तरी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षा यशस्वीपणे राबवल्या. लाखोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी नियमानुसार परीक्षा दिल्या. तसेच विविध राज्यांमध्ये आता महाविद्यालयीन अंतिम वर्षांच्या परीक्षाही सुरू झाल्या आहेत, असा युक्तीवाद करुन शाळा-महाविद्यालये सुरु करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचे प्रकार कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. मुलं घरात बसून कंटाळली आहेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे १०० टक्के सत्य असले तरी कोरोनाला कमी लेखण्याची चुक करायला नको. सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याची आकडेवारीही दाखल्यांसाठी दिली जात आहे मात्र चाचण्या कमी झाल्याने तसेच नेकमा कोरोना कशाला समजावे, याच्या निकषात बदल करण्यात आल्याने कोरोनाचा ग्राफ खाली येतांना दिसत आहे, या उघडसत्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger