मानवाला अगदी प्राचीन काळापासून चंद्राचे विशेष आकर्षण राहिले आहे. १९६९ मध्ये अमेरिकेच्या अंतराळवीरांनी खरोखर चंद्रावर पाऊल ठेवले. त्यानंतर माणसाला चांद्रभूमीवरचे भूखंड आणि त्या भूखंडाच्या खाली दडलेला खनिजांचा अफाट खजिना खुणावू लागला. चंद्रावर मानवी वस्ती उभारण्याची स्वप्ने जगभरातील शास्त्रज्ञ पाहत आहेत. मात्र चंद्रावर खरोखरच मानवी वस्ती शक्य आहे का? या प्रश्नाचे ठोस उत्तर आतापर्यंत कुणीच देवू शकले नसले तरी याबाबतीत आता आशेचा किरण दिसला आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या संशोधकांना चंद्रावर पाणी शोधण्यास यश मिळाले आहे. चंद्रावर सूर्यप्रकाश येणार्या भागात शास्त्रज्ञांना पाणी आढळले आहे. चंद्रावरील पाण्याचा शोध नासाच्या स्ट्रेटोस्फियर ऑब्जरवेटरी फॉर इंफ्रारेड अॅस्ट्रोनॉमीने (सोफिया) लावला आहे. पृथ्वीबाहेर पाण्याचा शोध घेण्याच्यादृष्टीने हे मोठे यश हाती लागले आहे. हे संशोधन विश्वाबद्दलचे आकलन वाढविणारे असून, भावी अंतराळ मोहिमांसाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे.
‘जहा ना देखे कोई, वहा देखे कवी...’ या काव्यपंक्तींप्रमाणे कवी, साहित्यिकांसह सर्वसामान्यांनीही आपआपल्या कल्पना विश्वात रमत अनेकवेळा चंद्राची सफर केली आहे. आजी-आजोबांच्या गोष्टीत तर ‘चंदामामा’ असतोच. साहित्यिक व कविकुलाचा हा लाडका, प्रेमीयुगुलांच्या भावबंधांचा साक्षीदार मानला जातो. चंद्राची तुलना प्रियसीसोबत करत अनेक गाणी लिहिली गेली आहेत. तिकडे सातासमुद्रापारच्या शेक्सपीरिअन साहित्यातही चंद्र हटकून डोकावतोच. पाश्चात्त्य जगात क्वचित काही विज्ञान काल्पनिकांमध्ये चंद्राचा उल्लेख झाला आहे. तसेच काही हॉलीवूडपटांमध्येही चांद्रमोहिमा दाखविण्यात आल्या आहेत. कारण मुळात माणसाला चंद्राचे खास असे आकर्षण कायम राहिले आहे. याच आकर्षणामुळे मानवाने थेट चंद्रावर पाऊल ठेवण्याची अचाट कामगिरी करुन दाखवली आहे. तेंव्हापासून पृथ्वीपासून फक्त तीन लाख ८४ हजार ४०० किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर अनेक देशांच्या मोहिमा सुरु आहेत. मानवाने निर्माण केलेली अंतराळयाने डझनभर वेळा चांद्रा माहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे अंतराळवीर पहिल्यांदा चंद्रावर गेले होते. त्यावेळी चंद्रावरील भाग पूर्णपणे कोरडा असल्याचे म्हटले गेले होते. मात्र चंद्र कधीच स्वत:भोवती फिरत नसल्याने त्याच्या एका भागावर कायम काळोख राहतो. यामुळे या भागात पाणी राहण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून सातत्याने वर्तविण्यात येते. यामुळे चंद्रावर जीवसृष्टी आणि पाणी आहे का, याचा शोध जगातील प्रगत देश सातत्याने घेत आहेत.
एक टन मातीतून काहिसे मिली पाणी
‘चांद्रयान-१’ने पाठवलेल्या माहितीच्या आधारे भारताने २००९ मध्येच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असल्याचे म्हटले होते. आता अमेरिकेच्या ‘नासा’ने ही चंद्रावर पाणी असल्याचे म्हटले आहे. हे पाणी थेंब, तलाव किंवा समुद्राच्या स्वरुपात नाही, तर तेथील खनिज संपत्तीत पाण्याचे अंश आहेत. म्हणजेच हे पाणी शुद्ध रुपात अस्तित्वात नाही. चंद्रावरच्या एक टन मातीतून काहिसे मिली पाणी हाती लागेल, असे ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल एरनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्टेशन’ (नासा)च्या संशोधनामुळे चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा नवा पुरावा मिळाला आहे. चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागात पाण्याचे अंश असल्याचा नासाच्या स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्जर्व्हेटरी फॉर अॅस्ट्रॉनॉमी (सोफिया) या हवाई वेधशाळेला मिळाला आहे. सोफियाने सतत सूर्यप्रकाशात राहणार्या चंद्राच्या पृष्ठभागावर जलस्फटिके टिपली आणि त्यावरून नि:संदिग्धरीत्या चंद्रावर पाणी असल्याचे अनुमान शास्रज्ञांनी काढले. सोफिया ही बोईंग विमानात बसवलेली हवाई वेधशाळा असून, जमिनीपासून ४५ हजार फुटांवर जाऊन विश्वातील विविध घटकांकडून येणार्या इन्फ्रारेड लहरींचे निरीक्षण ती करते. चंद्राच्या दक्षिण गोलार्धात असलेल्या आणि पृथ्वीवरून दिसणार्या क्लॅव्हियस विवरात पाण्याचे रेणू असल्याचे ‘सोफिया’ला २०१८मध्ये आढळले होते. सोफियाचा हा ताजा शोध चंद्राचे आकलन वाढवेल. चंद्राच्या ध्रुवीय, अंधार्या भागांखेरीज अन्य पृष्ठभागावरही पाणी असणार असा नासाचा अंदाज आहे.
नव्या शोधामुळे अनेक दरवाजे खुले
भावी मानवी मोहिमांसाठी चंद्रावरील पाण्याचा वापर करता येईल का, या दिशेने आता पुढील संशोधन होणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होण्याचा कयासही उत्कंठा वाढवणारा आहे. सततचे छोटे-छोटे उल्कापात, पृष्ठभागावर आदळणारे लघुग्रह किंवा धूमकेतू आणि सौरवार्यांमधून येणारे ऊर्जाभारित कण यांमुळे हे पाणी तयार होत असावे, असा शास्रज्ञांचा अंदाज आहे. चंद्रावर मानवी मोहिमांच्या पलिकडे जावून थेट मानवी वस्ती उभारण्याची स्वप्ने अनेक वर्षांपासून पाहिली जात आहेत. इलॉन मस्क यांची स्पेस एक्स या कंपनीने या प्रकल्पावर काम देखील सुरु केले आहे. चंद्रावर वस्ती करण्याची स्वप्ने या सगळ्यांना या शोधामुळे नवा आयाम प्राप्त होणार आहे. २०२४ मध्ये पहिली महिला चंद्रावर पाठविण्याची ‘अर्टेमिस’ मोहीम नासाने आखली आहे. या मोहिमेअंतर्गत एक महिला आणि एक पुरुष अंतराळवीर चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेसह भविष्यातला मानवाचा चंद्रावरचा वावर हा केवळ काही मिनिटांचा किंवा तासांचा नसेल, हे लक्षात घ्यायला हवे. एक झेंडा रोवून, पाऊलठसा उमटवून परत येण्यात आता काहीच हशील नाही. आता तिथे जायचे ते मुक्कामासाठीच, ही माणसाची महत्त्वाकांक्षा आहे. चंद्रपृष्ठावर गुरुत्वाकर्षण कमी आहे, तिथे प्राणवायू किंवा पाणी नाही, असे असले तरी भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती होऊ शकेल का, याची चाचपणी करणे महत्त्वाचे ठरणारे आहे. अशात आपले भावविश्व व्यापून राहिलेल्या चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आढळणे, ही मानवी मनाला सुखावणारी आणि उन्नतीची आस लावणारी घटना आहे. या पाण्याचा फायदा केवळ भविष्यात मानवाच्या चंद्रावरील मिशनला होणार नसून पिण्यासाठी आणि रॉकेट इंधन म्हणून देखील उपयोग होणार आहे. यामुळे नव्या शोधामुळे अनेक दरवाजे खुले होणार आहेत.
Post a Comment