गडकरींचे रोक ‘ठोक’ भाष्य

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी आपल्या परखड बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी केलेल्या भाष्यावरुन ते देशभरात चर्चेत आहेत. २००८ साली मंजूर झालेले बांधकाम पूर्ण करण्यास २०२० उजाडले, यावरुन त्यांनी नोकरशहांवर ओढलेले शाब्दिक आसून सरकारी बाबूंंना जिव्हारी लागले असले तरी गडकरी आपल्याच मनातील बोलले, याचा आनंद सर्वसामान्यांना नक्किच झाला असेल! धडाडी, जिद्द, निर्णयक्षमता आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती या गुणांनी त्यांचे नाव आजच देशाच्या पातळीवर घेतले जाते. महाराष्ट्र सरकारात बांधकाममंत्री असताना त्यांनी पुणे-मुंबई हा द्रुतगती महामार्ग ज्या वेगाने पूर्ण केला आणि सार्‍या राज्यात उड्डाणपूल उभे करून तेथील वाहतुकीची कोंडी ज्या तडफेने निकालात काढली त्यासारखी कामगिरी नंतर कुणीच करु शकला नाही. यामुळे गडकरी यांच्या बोलण्याला निश्‍चितपणे अर्थ असतो. अशा शासकीय दिरंगाईमुळे संबंधित अधिकार्‍यांचे खिसे सर्वसमान्यांच्या टॅक्समधून भरत असतात, यामुळे अशा प्रकारांबाबत केवळ नाराजी व्यक्त न करता ठोस धोरण आखायण्याची आवश्यकता आहे.


गडकरी  यांच्या तोंडून निघालेले सर्वसामान्यांचे मत

सरकारी कामे करण्यासाठी सर्वसामान्यांना चप्पल झिजवावी लागते, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. सरकारी लालफितीचा फटका सर्वसामान्यांनाच बसतो असे नाही तर लोकप्रतिनिधी, मंत्री यांनाही दप्परदिरंगाई सोसावी लागते. यावर सगळेच जाहीरभाष्य करत नाहीत कारण कुणाचे ना कुणाचे लागेबांधे, हितसंबंध आडवे येतच असतात. फार क्वचित नेते यावर परखडपणे बोलतात. त्यात सर्वात अग्रभागी नाव असते ते नितिन गडकरी यांचे. गडकरी तसे शांत व संयमी नेते म्हणून ओळखले जात असले तरी एखादे काम त्यांच्या मनासारखे न झाल्यास त्यांच्या रौद्र्अवताराचा सामनाही काहींना करावा लागतो. यामुळे कधी कधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अडचणीत देखील येतात. गेल्या वर्षी भोपाळमधील बेतुलमधील एका जनसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना दिलेली धमकी खूप गाजली होती. ‘काम योग्य झाले नाही किंवा कामात काही गडबड झाली तर मातीऐवजी तुम्हाला बुलडोझर खाली चिरडेन’, अशी धमकी कत्रांटदारांना दिल्याचे स्वतः नितीन गडकरी यांनी सांगितले होते. महाराष्ट्रातील सिंचन योजनेबाबत बोलतांना त्यांनी, एक वेळ हिजड्याला मुले होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असे आम्हाला वाटले होते. मात्र भाजपा सरकारने सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली, असे वादग्रस्त वक्तव्य गडकरी यांनी केल्याने त्यांच्यावर खूप टीका झाली होती. एकदा नागपूर येथे बोलतांना त्यांनी बदल्यांसाठी प्रयत्न करणार्‍या नेत्यांना झापले होते. सध्या सर्व नेते बदल्यांसाठी भिडून आहेत. बदल्या हा नेत्यांचा आवडीचा विषय झाला आहे. याला तिथून फेका, त्याला तिथे घाला. हीच सध्या नेत्यांची कामे आहेत, असा टोला त्यांनी राजकीय नेत्यांना लगावल्याने अनेकजण दुखावले गेले होते. मात्र प्रत्येकवेळी त्यांनी परखड भूमिका मांडली. त्यांच्या अशाच परखड भुमिकांमुळे तसेच ते नेहमी इनोव्हेशन आणि अत्याधुनिक नवे तंत्रज्ञान याची चर्चा करत असल्याने. प्रदुषण कमी करण्याबाबत दाखल एका याचिकेवर सुनावनी करताना सुप्रीम कोर्टानेही गडकरींच्या कामाची दखल घेत त्यांना माहिती देण्यासाठी न्यायालयात येण्याबाबत विचारणा केली होती. आता त्यांची पुन्हा चर्चा होण्याचे कारण रास्त आहे. त्यामुळे जे काही गडकरी बोलले ते त्यांच्या तोंडून निघालेले सर्वसामान्यांचे मत होते, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचे काम २००८मध्ये निश्चित झाले. २०११ मध्ये याची निविदा निघाली आणि हे दोनशे अडीचशे कोटींचे काम नऊ वर्षांनंतर नुकतेच पूर्ण झाले. याचे उद्घाटन करताना गडकरी म्हणाले की, ‘कोणतेही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचे अभिनंदन केले जाते. पण मला संकोच वाटतोय की, तुमचे अभिनंदन कसे करू? कारण हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारे आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज ह काम पूर्ण झाले आहे. मला याची लाज वाटतेय. जे विकृत विचारांचे अधिकारी आहेत. ज्यांनी निर्णय न घेता समस्या तयार केल्या. हे सगळे १२ ते १३ वर्षांपासून चिटकून बसले आहेत. मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची परंपरा किती नालायक आणि निकम्मी आहे, याचे उदाहरण म्हणजे ही इमारत आहे. माझे नाव बदनाम झालेच आहे. मला रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकार्‍यांना हाकलून लावले. त्यांना सेवामुक्त केले, हेच माझे उद्दिष्ट आहे. आता मला वाटत अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये, असा संताप त्यांनी व्यक्त केला.’ अशाच प्रकारच्या दिरंगाईचा अत्यंत वाईट अनुभव आपण सर्वजण जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या रुपाने घेतला आहे. अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही. गडकरी यांच्या दणक्यानंतर त्याला काहीसा वेग आला. नाहीतर अजूनही खड्यांमधूनच मार्ग काढत राहवे लागले असते. कदाचित यास अनेक कारणे असतील त्यापैकी काही रास्त देखील असतील तरीही या महामार्गासह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्याचे काम कोणत्या वेगाने सुरु आहे, हे सर्वजण जाणताच. २०० कोटींच्या कामाला दहा वर्ष लागली तर मग आता ८० हजार १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग पूर्ण करण्यास किती वर्ष लागतील? गडकरी यांनी आपल्या अचाट कर्तृत्वाने, अफाट धाडसाने, प्रचंड कल्पकतेच्या आधारे गडकरींनी विकासाचे नवे मापदंड उभे केले. मुंबईतल्या विशालकाय उड्डाणपुलांसह विदर्भातील मेळघाट असो की राज्यातील आदिवासी बहुल गाव - पाड्यांपर्यंत बारमाही रस्ता पोहोचवण्याची किमया राज्यात गडकरींनी करून दाखवली होती. आता देश पातळीवर विकासाचे एकाहून एक सरस उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी गडकरी यांचे आदराने नाव घेतले जाते. रोडकरी, पुलकरी ही नामाभिधाने त्यांना जनतेनीच उत्स्फूर्तपणे दिली. मात्र त्यांच्याच खात्यातील अधिकारी असे वागत असतील तर देशातील अन्य विभागांमध्ये किती गोंधळ असेल, याची कल्पनाच न केलेली बरी!

Post a Comment

Designed By Blogger