संपूर्ण जग कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर!

जगभरात हाहाकार माजवणार्‍या कोरोनाचा भारतातील वेग काही दिवसांपासून मंदावला आहे. भारतातील कोरोना संक्रमणकाळास नऊ महिने झाले असताना सप्टेंबरच्या तिसर्‍या आठवड्यापासून देशातील आणि राज्यातील कोरोनामुक्तीचा दर वाढू लागला. देशातील कोरोनामुक्तांच्या संख्येने ९० टक्क्यांचा उंबरठा ओलांडला. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ७९ लाख ९० हजार ३२२ एवढा झाला असला तरी त्यापैकी सुमारे ७२ लाख ५९ हजार ५०९ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशात सध्या केवळ ६ लाख १० हजार ८०३ जणांवर उपचार सुरू आहे. महाराष्ट्रातील चित्रही असेच दिलासादायक असून कोरोनामुक्ती दर नव्वदीकडे वाटचाल करीत आहे. आता परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असली तरी धोका मात्र अटळ आहे. कारण दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस सारखे सण साजरे करताना बाजारात गर्दी उसळल्याने संक्रमणाचा धोका वाढण्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. भारतात दुसर्‍या लाटेचा इशारा याआधीही देण्यात आला होता. प्रारंभी हा इशारा अनेकांनी गांभीर्यांने घेतला नव्हता पण आता जगभर कोरोनाची दुसरी सुरु झाल्याने धास्ती वाढली आहे.



कोरोनाबाधितांची घटणारी संख्या निश्‍चितच आनंद देणारी

गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोना ठाण मांडून बसला आहे. या विषाणूच्या दहशतीने देशात लॉकडाऊन लागू करावा लागला होता. आता लॉकडाऊनचे दिवस सरले आणि ‘अनलॉक’चे एकामागून एक टप्पे सुरू झाले. मॉल, सिनेमागृहे, जीम काही अटीवर उघडले. रेल्वेच्या फेर्‍या वाढविण्यात आल्या. एसटीच्या बसमधूनही शंभर टक्के प्रवासी क्षमतेसह वाहतूक सुरू झाली. लवकरच मुंबई लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांनाही खुले होणार आहेत. दुसरीकडे कोरोनाचा वेगही मंदावताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आठ महिन्यांनंतर कोरोनाच्या संसर्ग वेगाला ब्रेक लागला अन् मृत्यूदर नीचांकी पातळीवर आला. तमाम जनतेला गर्भगळीत करणार्‍या कोरोनाचा मृत्यूदर २२ मार्चनंतर प्रथमच नीचांकी पातळीवर अर्थात १.५ टक्क्यावर घसरला आहे. देशात सध्या ७.८८ टक्के सक्रीय रुग्ण आहेत. तर बरे झालेल्यांचे प्रमाण ९०.६२ टक्के आहे. तर १.५० टक्के रुग्ण दगावले आहेत. देशात जून आणि सप्टेंबरदरम्यान कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड वृद्धी होत होती. सप्टेंबरच्या तिसर्‍या आठवड्यापासून नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. १६ सप्टेंबर रोजी देशात ९७,८९४ नवे बाधित सापडले होते. हा भारतातील उच्चांकी आकडा ठरला होता. तर १६ सप्टेंबर रोजी ७ दिवसांचा सरासरी आकडा ९३,१९९ होता. १६ सप्टेंबरनंतर नव्या बाधितांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. हा आकडा आता ५० हजारच्या खाली आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या उपाययोजनांचे फलित म्हणा किंवा अन्य काही मात्र कोरोनाबाधितांची घटणारी संख्या निश्‍चितच आनंद देणारी आहे. 

संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्याचे स्पष्ट संकेत

भारताची वाटचाल ‘हर्ड इम्युनिटी’ अर्थात समूह प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या दिशेने सुरू आहे, असे देखील मानण्यात येत आहे. मात्र अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही, असे तज्ञांनी स्पष्ट करत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. कारण सध्या भारतात सणासुदीचा काळ सुरु आहे. यामुळे बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. एकमेकांच्या गाठीभेटींचे प्रमाण देखील वाढले आहे. सणांच्या काळात केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली मधील कोरोना प्रकरणात वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिल्ली व केरळमध्ये तर दुसर्‍या लाटेला सुरुवात झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. दुसरी लाट केवळ भारतातच आली नसून जगभरात अनेक देश दुसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अमेरिकेत निवडणूक जवळ आली असतानाही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. १ आठवड्यात ५ लाखांहून अधिक नवे बाधित सापडले आहेत. याचदरम्यान ५,६०० रुग्ण दगावले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फैलाव आता इलिनॉइस प्रांतात दिसून येत आहे. पेन्सिलवेनिया आणि विस्कॉन्सिन प्रांतातही स्थिती वेगाने बिघडू लागली आहे. ब्रिटनमध्ये संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने सरकारने तेथे लॉकडाऊनसह अन्य उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. 

भारतात कोरोनाबद्दल गाफिल राहून चालणार नाही

फ्रान्समध्ये संसर्गाची दुसरी लाट पाहता सरकार सतर्क झाले आहे. गुरुवारपासून देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केली आहे. युरोपीय देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. इटली, स्पेनमध्ये प्रतिदिन १५ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्पेनमधील परिस्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळेच आता दुसरी लाट उसळली म्हणताच स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी संचारबंदी आणि आणीबाणी लागू केली. स्पेनमध्ये कोणत्याही परिस्थितीत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला रोखणार असल्याचा निर्धार पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी व्यक्त केला आहे. इटलीत दिवसभरात २१,९९४ नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील बाधितांचे प्रमाण ५.६४ लाख झाले आहे. तर ३७,७७० जणांना जीव गमवावा लागला आहे. इटलीत संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जर्मनीतही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. पोर्तुगाल सरकारने निर्बंधांसंबंधी नवा नियम प्रसारित केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. नियमाचा भंग करणार्‍यांवर ५९० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ही परिस्थिती पाहता भारतात कोरोनाबद्दल गाफिल राहून चालणार नाही. आज कोरोनाची आकडेवारी कमी होत असताना अनेकजण जणू कोरोना संपलाच याच आविर्भावात विनामास्क फिरताना दिसत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी लसी तयार झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी चाचण्यांचे तीन टप्पे पूर्ण करून लस आपल्यांपर्यंत पोहोचायला पुढचे वर्ष उगवेल, हे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे कोरोनाशी सुरू असलेली अर्धी लढाई देशाने जिंकली असली तरी कोरोनाच्या समूळ उच्चाटनाचे आव्हान मोठेच आहे, हे विसरून चालणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger