मास्क लावाल, तर वाचाल

देशात करोनाचा शिरकाव होऊन आठ महिने झाले आहेत. मात्र अद्यापही कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश मिळू शकलेले नाही. कोरोनाला रोखणार्‍या लसींवर जगभरात काम सुरु असले तरी सर्वसामान्यांना लस उपलब्ध होण्यासाठी किमान चार ते सहा महिने किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ फेसमास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंग हे दोनच हत्यार कोरोनापासून बचाव करु शकतात, हे जगभरातले शास्त्रज्ञ ओरडून ओरडून सांगत आहेत. मात्र कोरोनाचा धोका पुरता टळला नसताना मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍या बेजबाबदार महाभागांचे दर्शन सर्वत्र होते. याबाबत जनजागृतीचाही फारसा उपयोग होत नसल्याने मुंबईत ‘विना मास्क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला व त्याला आता यश देखील मिळू लागले आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह यासह बसेस, टॅक्सी, रिक्षांमध्येही ‘नो मास्क, नो एन्ट्री’ हे धोरण राबविण्यात येत आहे. कोल्हापूरमध्येही राबवण्यात येत असलेल्या मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात याची कडक अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे.

कोरोनाबाबत बेफिकरी दाखवणे महागात

गेल्या काही दिवसांपासून काही अंशी कमी झालेली करोनाबाधितांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ६३ लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात १ ऑक्टोबरपासून अनलॉक-५ला सुरुवात झाली आहे. येणार्‍या काळात नवरात्री, दसरा, दिवाळी, ईद यासारखे मोठे सण आहेत. या सणासुदीच्या काळात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती तज्ञांनी बोलून दाखवली आहे.  तसेच हिवाळ्यात कोरोना व्हायरसपासून अधिक सतर्क राहण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. या बदलत्या वातावरणात संसर्ग वाढणार की कमी होणार हा एक चिंतेचा विषय आहे. कारण पावसाळा संपला असून आता हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात करोनाचा कहर वाढणार की कमी होणार? याची चिंता सर्वांना सतावत आहे. पुढील दोन ते तीन महिने खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला सर्व प्रकारची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण हिवाळा विषाणू आणि संसर्गासाठी प्रजनन काळ असतो. जगभरात करोनाची दुसरी लाट आली आहे हे आपण विसरता कामा नये. आतापर्यंत कोरोनाची प्रचंड दहशत असलेली मोठी राज्ये, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर घट होताना दिसत आहे. मात्र केरळ, पंजाब, दिल्लीमध्ये दुसर्‍या लाटेचे संकेत मिळत आहेत. यामुळे कोरोनाबाबत बेफिकरी दाखवणे प्रचंड महागात पडू शकते. 

 मास्क वापराबाबत कोल्हापूर पॅटर्न

कोरोना व्हायरस टाळण्यासाठी आणि व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मास्क न वापरणार्‍या लोकांना अनेक ठिकाणी दंड भरावा लागत आहे. मास्कमुळे कोरोनाच्या प्रसारावर मास्कच्या वापरामुळे काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचे सिध्द झाले आहे. म्हणूनच ‘मास्क लावाल, तर वाचाल’, अशी जाहिरातही आता सरकारकडून केली जातेय. सावर्जनिक ठिकाणी वावरताना, कामाच्या जागी आणि प्रवास करताना मास्कचा वापर करावा अशा सूचना भारत सरकारच्या अनलॉकच्या नियमावलीमध्ये देण्यात आलेली आहे. भारतासह जगभरातल्या अनेक देशांनी मास्क घालण्याविषयी नियमावली तयार केली आहे. असे असले तरी अनेक महाभाग विनामास्क फिरतांना दिसतात. जणू कोरोना त्यांचे काहीच वाकडे करु शकत नाही, अशा आविर्भावात फिरणार्‍यांमुळे कोरोना दिवसेंदिवस आपले हात पाय फैलवत आहे. ग्रामीण भागात आपल्या खिशात असलेला हातरूमाल हा मास्क म्हणून सध्या काही नागरीक वापरत आहेत. चेहरा व हात पुसल्यानंतर हातरूमाल हा मास्क म्हणून वापरणे चुकीचे आहे. मास्क म्हणून वापरलेला हातरूमाल परत खिशात ठेवणे हे संसर्गास कारणीभूत होऊ शकते. यामुळे मास्क शिवाय पर्याय नाहीच! याची खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली पाहिजे. मास्क वापराबाबत कोल्हापूर पॅटर्नचा आदर्श घेण्याचीही आवश्यकता आहे. 

‘नो मास्क, नो एन्ट्री’

कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही हा उपक्रम फायदेशिर ठरत आहे. या उपक्रमात एकादा दुकानदार मास्क लावून बसला नसेल तर तिथे ग्राहकांने जायचे नाही. एकादा नागरिक विना मास्क दुकानात आल्यास त्याला वस्तू अथवा सेवा द्यायची नाही. याचे उल्लंघन झाल्यास त्यांना दंड करणे किंवा व्यापारी आस्थापनांची दुकाने काही दिवसांसाठी बंद केले जातील. याला जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करुन ही मोहीम दुसर्‍या जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. याच धर्तीवर मुंबईतही नवा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. मुंबईतील लॉकडाऊन सरकारकडून टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात आले. यात सरकारी-खासगी कार्यालये, दुकाने, उपहारगृहे, मॉल्स, सभागृहे काही नियम पाळून सुरू करण्यात आले. मात्र, या ठिकाणीही आता अगदी काटेकोरपणे मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह या ठिकाणी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’, ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. यासह बेस्ट, टॅक्सी, रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना मास्क न घालणार्‍या बेजबाबदार व्यक्तींना बेस्ट, टॅक्सी, रिक्षात प्रवेश देऊ नये, यासाठी बस, टॅक्सी, रिक्षावर ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ असे स्टिकर्स मुंबई महानगरपालिकेकडून लावण्यात आले आहेत. ही मोहिम यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ शासन व प्रशासनाचीच नसून आपल्या प्रत्येकाची आहे. केवळ कोरोना वाढतोय, यासाठी राज्य किंवा केंद्र शासनाच्या नावे शंख न फुकता, या लढाईत माझे काय योगदान आहे? याचा प्रामाणिक विचार प्रत्येकाने करुन तसे वर्तन केले पाहिजे. आपण सर्वांनी केवळ महिनाभर जरी याची स्वयंशिस्तीने काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास कोरोनाला हरविण्यास आपल्याला वेळ लागणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger