धोका अजून टळलेला नाही

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णसंख्येचा वेग मंदावल्याचे दिसत आहे. देशात शिरकाव केल्यानंतर सुरूवातील कोरोनाचा प्रसार नियंत्रित होता. मात्र शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेग वाढला. सप्टेंबरमध्ये करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण ऑक्टोबरच्या सुरूवातीपासून करोना रुग्णवाढ मंदावली आहे. देशात आतापर्यंत एकूण १ लाख ०९ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णसंख्येचा आकडा हा ७१ लाखांच्या पुढे गेला असला तरी यातील ६० लाखांपेक्षा जास्त बरे झाले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा मात्र १५, २८, २२६ वर पोहोचला आहे. यातील आतापर्यंत एकूण १२,६६,२४० रुग्ण बरे देखील झाले आहेत. ही निश्‍चितच चांगली बातमी आहे. मात्र अजूनही धोका टळलेला नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवण्याची आवश्यकता आहे.



ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येचा विस्फोट

चीनपासून उगम पावलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटारमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. अमेरिकेसारखा बलाढ्या देश देखील कोरोनापुढे हतबल झालेला दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर असून भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी किंवा तो मारण्यासाठी जगभरातील संशोधक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक देशांतील लसींवरील संशोधन अंतिम टप्प्यात पोहचले असले तरी सर्वसामान्यांना लस उपलब्ध होण्यासाठी आणखी खूप काळ जावू शकतो. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. या संकटकाळात दिलासादायक घडलेली गोष्ट म्हणजे, काही लोकं आपल्या उत्तम रोगप्रतिकारक क्षमतेमुळे कोरोनावर मात करण्यात यशस्वी होत आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीयांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक वेगळी रोगप्रतिकारक क्षमता कामी येऊ शकते. ज्याला आपण ‘हर्ड इम्युनिटी’ असे म्हणतो. ब्रिटनच्या प्रिंस्टन युनिव्हर्सिटी आणि सेंटर फॉर डिजीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) च्या काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हर्ड इम्युनिटीचा भारतीयांना सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. यामुळे भारतीय जनता कोरोनापासून बचाव करू शकेल, असा निष्कर्ष ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आला होता. मात्र ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात देशात रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने त्याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागली. 

अलीकडची आकडेवारी काहीशी दिलासादायक 

भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे बर्‍याच क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्थ्या पूर्णपणे कोलमडून पडली आहे. देशाच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना ‘देवाची करणी’ (अ‍ॅक्ट ऑफ गॉड) असे सांगून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे सर्वांना आठवत असेलच! महाराष्ट्रात व देशात रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर पोहचली होती. अर्थात यास अनेक कारणे होती. सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोरोना हाताळणीच्या संबंधात असणारी बेपर्वाई, प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लॉकडाऊनसंदर्भात धरसोडीचे धोरण आणि नागरिकांमध्ये दिसणारी बेफिकीर वृत्ती, ही कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची कारणे होती व आजही आहेत. नियोजनात त्रुटी राहू शकतात, मात्र निदर्शनास आल्यानंतरदेखील त्या अमान्य करणे, ही मानसिकता प्रभावी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडथळा ठरली. लॉकडाऊनसारख्या उपायांनी कोरोना आटोक्यात येत नाही हे दिसून आल्याने आणि करोनावर कोणतेही औषध अजून अस्तित्वात नसल्याने नेमके करावे तरी काय, याची दिशा निश्‍चित होतांना दिसत नव्हते. कोरोनाचे पेशंट वाढत असताना त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतही आता सरकारी यंत्रणांवर मर्यादा येत होत्या. मात्र आता परिस्थित हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे. देशातील रुग्णसंख्या कमी होत असताना बरे होणार्‍यांच्या प्रमाणातही भारताचा क्रमांक आघाडीवर आहे. कोरोनाचा धोका संपला नसला तरी अलीकडची आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे. मागील चार आठवड्यातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केल्यास, दर आठवड्याला नव्याने आढळणार्‍या बाधितांची संख्या काही अंशी कमी होत आहे. सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात १ लाख ५३ हजार ३३१ नवे रुग्ण आढळले होते. तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ९२,२४६ इतकी रूग्णसंख्या आहे. रुग्णांच्या संख्येत ४० टक्के घट झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला. इथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळत, लॉकडाऊन आणि अनल़ॉकमधील सर्व अटी, नियमांचे पालन केल्याचेच हे परिणाम दिसत आहेत. यामध्ये प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांचा मोलाचा वाटा आहे हेसुद्धा तितकंच खरे. त्यामुळे कोरोनाला रोखण्याची मोठी जबाबदारी ही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांसोबतच राज्यातील जनतेचीही राहीली आहे. 

देशातील आरोग्य सुविधांचा फेरआढावा घेण्याची गरज

देशात अनलॉक प्रक्रिया सूरू झाली असून सर्वकाही पूर्ववत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या कमी होत असून मृत्युदरातही घट झाली आहे. तसेच रुग्णवाढीचा दर कमी होत असल्याचे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण अनलॉक होण्याचे संकेत दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव येत्या काही दिवसांत आणखी कमी झाला तर दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकतील, असेही टोपे यांनी म्हटले आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची पुरेशी आकडेवारी हातात नसताना दिवाळीपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे पाऊल ठरेल, असा सावधगिरीचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. यामुळे कोरोना खरंच कमी होतोय की नाही? असा प्रश्‍न अनेकांना पडत आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे, हे जरी खरे असले तरी कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. याचे भान ठेवण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने आपआपली काळजी घेणेचे उचित राहिल. येत्या काही दिवसात राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवर कोरोना नियंत्रणासाठी आणखी व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. त्यात त्यांना सातत्य राखावेच लागेल. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर देशातील आरोग्य सुविधांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर कोरोनासारखी साथ भविष्यात आल्यास आजच्यासारखी धावपळ होऊ नये यासाठीचा व्यापक आराखडा तयार होणे गरजेचा आहे.

Post a Comment

Designed By Blogger