टीआरपी : पैसा फेको तमाशा देखो

राजकारणी, अधिकारी, उद्योजकांसह अनेकांचे घोटाळे उघड करणार्‍या वृत्त वाहिन्यांचा टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) घोटाळा उघड झाल्याने प्रसारमाध्यम जगतात खळबळ उडाली आहे. हे एक ना एक दिवस होणारच होते. कारण ब्रेकिंग न्यूजच्या मागे धावणार्‍या वृत्त वाहिन्यांनी सध्या सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत माजवलेला प्रचंड अकालतांडव आता प्रेक्षकांना नकोसा वाटू लागला आहे. पाकिस्तानमध्ये एका प्रसिध्द व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कसे दफन करणार, याचे वार्तांकन करणार्‍या एका वृत्त वाहिन्यांच्या अर्धवट प्रतिनिधीने चक्क शवपेटीत झोपून केलेला गमतीशिर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर मोठी टीका झाली झाली होती. मात्र त्यानंतर काही दिवसातच बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या एका हिंदी वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीने बाथटपमध्ये झोपून लाईव्ह केले. इथपर्यंत तरी ठिक होतं मात्र आता अभिनेता सुशांतसिंगच्या मृत्यू नंतर काही वृत्त वाहिन्यांनी किळसवाण्या पत्रकारितेचे दर्शन घडविले! स्टुडीओमध्ये बसून जोरजोरात कर्णकर्कश आवाजात ओरडणारे अँकर्स असो का नाचून नाचून बातम्या दाखविणारे प्रतिनिधी असोत, सर्वांनी पत्रकारितेची अब्रूच वेशीवर टांगली. त्यानंतर समोर आलेला टीआरपी घोटाळ्यामुळे वृत्त वाहिन्यांच्या उथळ पत्रकारितेच्या विश्‍वासार्हतेला तडाच गेला.


प्रेक्षकांना चिड आणि किळस येवू लागली

माध्यमांच्या विशेषत: वृत्त वाहिन्यांच्या त्यातही हिंदी वृत्त वाहिन्यांच्या बेजबाबदारपणाद्दल देशात अनेकवेळा चर्चा होते. काही प्रकरणात तर न्यायालयानेही माध्यमांना फटकारत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यातुलनेत वर्तमानपत्रे सरसच असल्याचे वारंवार सिद्ध होत गेले आहे. त्याला कारण या माध्यमाची, त्यांच्या संस्थापकांची, त्यांच्या संपादकांची एक वैचारिक बैठक, जडणघडण आणि त्यांना असलेले भान.  गेल्या महिना दोन महिन्यांत विविध वृत्त वाहिन्यांवर रिया चक्रवर्ती, सुशांतची हत्या की आत्महत्या, कंगना रणावतची आतषबाजी याचे वार्तांकन करताना एका जबाबदार पेशाचा बाजारच मांडला गेला. माध्यमांनी काय योग्य आणि अयोग्य आहे ते समोर आणावे हे त्यांचे कर्तव्य मानले जाते मात्र या नैतिकतेला आता तडा गेला आहे. एकतर्फी वातांकन करताना वृत्त वाहिन्यांचा तोल सुटतांना दिसत आहे. त्यातला सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे कथित तज्ञ पॅनलिस्टची चर्चा. बहुतांश वेळा चर्चेचा मुद्दा काय आहे, याचे भान चर्चा करणार्‍यांना आणि चर्चा घडवून आणणार्‍या वृत्त वाहिन्यांना नसतो. केवळ सनसनाटी निर्माण करायची आणि टीआरपी वाढवून घ्यायचा, हा धंदाच झाला आहे. अशा प्रकारच्या चर्चांमध्ये कर्कशपणे ओरणारे, एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे आणि खोटं बोला पण रेटून बोलाचा वसा जपणार्‍यांची आता चिड आणि किळसही प्रेक्षकांना येवू लागली आहे. 

अर्धवट पत्रकारितेचे दर्शन

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण असो का त्या आधी घडलेले श्रीदेवी मृत्यू प्रकरण, दोन्ही प्रकरणात एक साम्य होते. या प्रकरणांचा तपास पोलीस यंत्रणा करत असताना हिंदी वृत्त वाहिन्यांनी समांतर तपास सुरु केला होता. ज्यास कोणताही आधार नव्हता. एखाद्या माहितीचा तपासाशी कुठेही संबंध किंवा संदर्भ नसताना बाहेर हाती आलेल्या तुटपुंज्या, तोकड्या किंवा मिळेल तेवढ्यात माहितीचे बिंदू जोडून माध्यमांनी परस्परच आख्खा सीनच उभा करण्याचा प्रताप अनेक वाहिन्यांनी केला. हे संतापजनक तर होतेच मात्र त्यापेक्षा किळसवाणे देखील होते. श्रीदेवी यांच्या निधनानंतर प्रत्यक्ष बाथ टबमध्ये बसलेल्या न्यूज चॅनल्सच्या वृत्तनिवेदिकांनी आपल्या अर्धवट पत्रकारीचे दर्शन संपूर्ण देशाला दाखविले आहे. त्यानंतर सुशांतसिंग प्रकरणात उड्या मारत मारत वार्तांकन करणारे काही विदुषकी पत्रकारही पहायला मिळाले. यामुळे प्रेक्षकांना माहिती मिळाली की नाही यात जरी शंका असली तरी अशा अर्धवटरावांमुळे मनोरंजन मात्र नक्कीच झाले. या सर्व प्रकरणांमुळे अनेक वृत्त वाहिन्यांमधील पुढे जाण्याची स्पर्धा ही विश्‍वासार्हता कमावण्यासाठी नसून रेटिंग्ज आणि पैसा कमावण्यासाठी जास्त आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. टीआरपी बद्दल बोलायचे म्हटल्यास, छोट्या पडद्यावर कोणते कार्यक्रम सगळ्यांत जास्त बघितले जातात हे तपासण्यासाठीचे टीआरपी हे मानक आहे. या टीआरपीशीच सगळे अर्थकारण निगडित असते. प्रेक्षकांना पैसे देऊन टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविणार्‍या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला. यात, रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा हे तीन चॅनल सहभागी असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. 

विश्‍वासार्हतेच्या पार चिंधड्या उडाल्या

यामुळे टीआरपी म्हणजे काय, कसा ठरवतात? यावर सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुुरु झाली आहे. एका सेट टॉप बॉक्ससारख्या यंत्राच्या मदतीने टीआरपीसंदर्भातील डाटा गोळा केला जातो. वापरकर्ते कोणत्या वाहिन्या पाहतात, याची नोंद या यंत्राच्या माध्यमातून ठेवली जाते. याच आकडेवारीच्या आधारे टीआरपी निश्चित केला जातो. कोणत्या वाहिन्या सर्वाधिक काळासाठी पाहिल्या जातात, याची आकडेवारी गोळा करून त्याच्या सरासरीच्या आधारे टीआरपी ठरवला जातो. प्रेक्षकांना ४०० ते ५०० रुपये देऊन दिवसभर चॅनल्ससमोर बसविण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली. बनावट टीआरपीमुळे जाहिरातदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकारामुळे विश्‍वासार्हतेच्या पार चिंधड्या उडाल्या आहेत. माहितीला (इन्फॉर्मेशन) करमणुकीची (एंटरटेन्मेंट) जोड देत एन्फोटेन्मेंट नावाची नवी पत्रकारीता उदयास येतांना दिसत आहे. मुख्य प्रवाहातील हिंदी न्यूज चॅनल्सकडून शेती, शेतकरी (शेतकरी आत्महत्या किंवा शेतकरी आंदोलने नव्हे), ग्रामविकास, पर्यावरण, ग्राम आरोग्य, ग्रामीण बाजारपेठ, प्राथमिक शिक्षण, महिला सक्षमीकरण, जलसाक्षरता, स्थानिक रोजगार निर्मिती, शेतीपूरक उद्योग, शेतमाल प्रक्रिया असे अनेक विषय बाजूला टाकले जातात. याच मार्गावर अनेक मराठी न्यूज चॅनल्सची वाटचाल सुरु झाली आहे. यास हिंदी न्यूज चॅनल्सचे अंधानुकीकरण म्हटलेले जास्त संयुक्तीक राहिल. काही मराठी वृत्त वाहिन्या तोंडी लावण्यापुरता हे विषय कधी कधी घेतात. मात्र सर्वाधिक महत्व हे राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि बॉलिवुड अशा विषयांना दिले जाते. ‘जशी मागणी तसा पुरवठा’ हे त्यामागचे सुत्र असल्याचे सांगितले जाते. पैसा फेका तमाश देखा सारखा हा प्रकार आहे.


 


Post a Comment

Designed By Blogger