रेल्वेच्या चाकांना ‘गती’

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात २४ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला. तेंव्हापासून रेल्वे गाड्यांची चाकेसुद्धा थांबली आहे. मात्र, अनलॉकमध्ये प्रवासी रेल्वेसेवा हळूहळू रूळावर येत आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे रेल्वे सेवा सुरू करण्यास टप्प्या टप्प्याने परवानगी देण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, पुणे लोकलसह राज्यांतर्गत अनेक प्रवासी गाड्या सुरु झाल्या आहेत तर येणार्‍या सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेने प्रवास करणार्‍यांसाठी ७८ विशेष ट्रेन सुरु करण्यास रेल्वे बोर्डाने परवानगी दिली आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वी रेल्वेकडून वेगवेगळ्या झोनमध्ये सुविधेनुसार ट्रेन चालविण्यात येणार आहेत. नवरात्र उत्सवापूर्वी सुरु करण्यात येणार्‍या बहुतांश ट्रेन या एसी स्पेशल, राजधानी, शताब्दी आणि दुरंतो या श्रेणीमधील असतील. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भारतातील पहिली खाजगी ट्रेन तेजस देखील सुरू होणार आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये थांबलेल्या रेल्वेच्या चाकांना गती मिळाली आहे.



रेल्वे पहिल्यांदा १९७४ साली पूर्णपणे बंद झाली होती

देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. या घटनेला १६७ वर्ष पूर्ण झाली आहेत. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा १९७४ साली पूर्णपणे बंद झाली होती. जार्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे बंदचा संप पुकारण्यात आला होता. २० दिवस तो संप होता. जागतिक महायुद्ध, मुंबईतील बॉम्ब स्फोट, अतिरेकी हल्ला याने देखील रेल्वे सेवा बंद झाली नव्हती. मात्र आणीबाणी आणि काहीवेळ नैसर्गिक आपत्ती रेल्वे बंद काही काळ खंडीत झाली होती. मात्र कोरोना विषाणूमुळे रेल्वे सेवा सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी बंद असल्याचे पहिल्यांदाच झाले. याकाळात सरकारी, खासगी कार्यालयेही बंद होती. परिणामी लाखो रोजगार बुडाले, हातावर पोट असणारे मिळेल तिथे काम शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत झाले आहेत. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी राज्य व केंद्र सरकारची धडपड सुरु आहे. लॉकडाऊन काळात मालवाहतूक आणि श्रमीक प्रवासी सेवा वगळता रेल्वेचे कामकाज ठप्प असल्याने रेल्वेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असून रेल्वेचा हजारो कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. कोरोना संकटामुळे रेल्वेची आर्थिक तब्येत बिघडली असून निवृत्ती वेतन देण्यासाठी रेल्वेकडे पुरेसा निधी नाही. देशात सर्वात जास्त शासकीय कर्मचार्‍यांची संख्या रेल्वेत आहे. सध्याच्या घडीला १३ लाख कर्मचारी रेल्वेत कार्यरत असून निवृत्त कर्मचार्‍यांची संख्या १५ लाख आहे. विवीध भत्त्यापोटी रेल्वे दोन हजार कोटी खर्च करते. त्यामुळे काटकसरीचे धोरण राबविण्यास रेल्वे मंत्रालयाने सुरुवात केली असून. याच अंतर्गत ब्रिटीश कालीन रेल्वे डाक सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे पोस्ट सेवा ही ब्रिटीश कालीन व्यवस्था आहे. ही रेल्वेची अंतर्गत पोस्टल सेवा आहे. या अतर्गत रेल्वे फाईल्स, संवेदनशील, गुप्त माहिती असलेल्या फाईल्स पाठवल्या जात होत्या. मात्र काटकसरीच्या धोरणामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. 

चाकरमन्यांचे हाल

दुसरीकडे अजूनही रेल्वेसेवा पूर्णपणे सुरु झालेली नाही मात्र राज्यांतर्गत काही गाड्यांसह लांब पल्ल्यांच्या काही प्रवासी गाड्या सुरु झाल्या आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे बोर्डाने अन्य विशेष रेल्वे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. प्रवासी संख्या जास्त आहे, अशाच रेल्वे संबंधीत मार्गांसाठी निवडल्या जात आहेत. भुसावळ व जळगाव येथून पुणे तसेच मुंबई जाणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. येणार्‍या काळात अन्य मार्गावर अजून काही गाड्या धावणार आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातील चाकरमन्यांसाठी लोकल सेवा सुरु झाली आहे. परंतू भुसावळ विभागांतर्गत येणार्‍या चाकरमन्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावर चाकरमन्यांची संख्यादेखील अधिक आहे. आता अनलॉकपर्व सुरु झाल्यापासू सर्व चाकरमनी कामावर रुजू होवू लागले. पण या चाकरमान्यांसाठी कार्यालयापर्यंत पोहोचायचे कसे याचे योग्य नियोजन सरकारने न केल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत हलाकीची होत आहे. रेल्वे सेवेअभावी नोकरदारांचे हाल सुरू आहेत. खासगी कार्यालये नियमित सुरु झाल्याने सर्व चाकरमन्यांची प्रचंड तारांबळ उडत आहे. जसे मुंबईला लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नोकरदारांना ओळखपत्र व कंपनीचे संमतीपत्रक असल्याशिवाय पास देवू नये, जितके सीट्स आहेत तितक्याचा पासेस दिल्यास अन्य मार्गावरील चाकरमान्यांची सोय होवू शकते. 

आता रेल्वेचा प्रवास पुर्वी प्रमाणे नसेल

राज्यात आता आंतरजिल्हा प्रवासावरील बंदीही उठविली आहे. रेल्वेतूनही आंतरजिल्हा तिकीट उपलब्ध होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच चालणार्‍या रेल्वे देखील सुरु झाल्या आहेत. यात मासिक पासधारक चाकरमन्यांसाठी एखादी डबा राखीव ठेवल्यास चाकमन्यांचे हाल थांबू शकतात. याचा राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाने सहानुभुतीपुर्वक विचार करण्याची आवश्यकता आहे. कोरोनानंतरचे जग वेगळे असेल, असे म्हटले जात होते त्याचा आता हळूहळू प्रत्यय येवू लागला आहे. अर्थात यास रेल्वे प्रवास देखील अपवाद नाही. आता रेल्वेचा प्रवास पुर्वी प्रमाणे नसेल. आरोग्य सेतु अ‍ॅपशिवाय प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यापुढे सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य होईल. साहजिकच रेल्वेत दोन व्यक्तींमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे होईल. हे प्रवास साहजिकच खूप सुकर आणि आरामदायी होतील, पण त्यातील बैठकांची संख्या कमी झाल्यामुळे हे प्रवास नक्कीच तिपटीने महागतील. सर्वात कठीण गोष्ट असेल ती रेल्वे स्टेशनंवरील प्रवाशांच्या गर्दीची. यासाठी संगणकावर आधारित अपॉइंटमेंट सिस्टीम तयार करून, रेल्वेस्थानकांंचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन जेवढे प्रवासी मावतील तेवढेच एका वेळेस बोलवावे लागतील. गाड्यांची संख्या मर्यादित करावी लागेल. अधिक मोठी रेल्वे स्टेशन्स तयार करावी लागतील किंवा त्यांचे आकार वाढवावे लागतील. प्लॅटफॉर्मवर एका वेळेस तीन फूट अंतर राखून प्रवासी घ्यावे लागतील. लस उपलब्ध होईपर्यंत तरी याची प्रत्येकाने सवय करुन घ्यावी लागणार आहे.

Post a Comment

Designed By Blogger