भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव निर्माण झालेला असताना भारताने ओदिशातील एपीजे अब्दुल कलाम प्रक्षेपण संकुलातून संपूर्ण देशी बनावटीच्या ‘हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमन्स्ट्रेटर व्हेइकल’ची (एचएसटीडीव्ही) यशस्वी चाचणी केली. या कामगिरीमुळे भारताला अत्यंत प्रगत अशा ध्वनीपेक्षा वेगवान व शत्रूच्या संरक्षण प्रणालीला चकवा देणारी हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती शक्य होणार आहे. या चाचणीमुळे भारताने अमेरिका, रशिया आणि चीनशी बरोबरी साधली आहे. भारताकडे आतापर्यंत ध्वनीपेक्षा वेगवान- सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करण्याची क्षमता नव्हती, त्यासाठी आपण परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून होतो. या यशस्वी चाचणीने डीआरडीओ पुढील पाच वर्षांत स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करू शकते. त्याचा वेग सेकंदाला दोन किलोमीटरपेक्षा अधिक असतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग उपग्रह सोडण्यासाठी होणार असून अगदी कमी खर्चात भारत उपग्रह सोडू शकेल.
इतिहासकाळात युद्धाचे स्वरुप मर्यादित स्वरुपात विशेषत: समोरा समोर पध्दतीचे असे. जसजसा काळ बदलत गेला तस तसे युध्दाचे स्वरुप बदलत गेले. समोरा समोर येवून लढण्यापेक्षा दुर अंतरावरुन निशाणा साधता येईल, या तंत्रज्ञानाला प्रचंड महत्व आले. यात सुरुवातीच्या टप्प्यात बंदूक किंवा रणगाड्याने लक्ष भेदण्याचे तंत्र ‘क्षेपणास्त्र’ प्रणाली पर्यंत येवून ठेपले. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान ही भविष्याची गरज आहे, याची जाणीव झाल्यामुळे १९८३ साली प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वाखाली ‘समाकलित मार्गदर्शित क्षेत्रणास्त्र विकास कार्यक्रम’ उपक्रम सुरू करण्यात आला. डॉ.कलाम यांनी चार प्रमुख प्रकल्प सुरू केले. यात पहिला म्हणजे, भूपृष्ठावरील एका ठिकाणाहून भूपृष्ठावरील दुसर्या लक्ष्यावर मारा करू शकणार्या लहान पल्ल्याचे क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘पृथ्वी क्षेपणास्त्र’ या नावाने संबोधिले जाते. दुसरा म्हणजे, भूपृष्ठावरून आकाशातील कमी उंचीवरील लक्ष्यावर मारा करू शकणार्या लहान पल्ल्याची क्षेपणास्त्रे निर्माण करणारा प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘त्रिशूळ क्षेपणास्त्र’ या नावाने संबोधिले जाते. तिसरा म्हणजे, भूपृष्ठावरून आकाशातील मध्यम उंचीवरील लक्ष्यावर मारा करू शकणार्या मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्रे निर्माण करणारा प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘आकाश क्षेपणास्त्र’ या नावाने ओळखले जाते आणि चौथा म्हणजे तिसर्या पिढीतील रणगाडाभेदक क्षेपणास्त्र निर्माण करणारा प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘नाग क्षेपणास्त्र’ हे नाव देण्यात आले. या चार प्रकल्पांच्या जोडीने काही वेगळ्या खास प्रणालीच्या ‘अग्नी’ क्षेपणास्त्राचे कार्यदेखील हाती घेण्यात आले.
भारताकडे अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रे
१९८८ साली ‘पृथ्वी’चे प्रक्षेपण झाले. या अस्त्राने १५० किलोमीटर दूरच्या जमिनीवरील लक्ष्यावर मारा केला होता. यानंतर १९८९ मध्ये ‘अग्नी’चे प्रक्षेपण झाले. यानंतर भारताने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज भारताकडे अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आहेत. यात प्रामुख्याने अग्नि ५ इंटर-कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक ज्याची रेंज ५५०० किमी असण्यासोबतच हे अनेक गोष्टीत जागतिक दर्जाचे क्षेपणास्त्र आहे. अग्नि ४ ज्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, या क्षेपणास्त्राची मारा करण्याची क्षमता ४००० किमी आहे. अग्नि ३ या जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याच्या क्षमता असलेल्या हे क्षेपणास्त्र ३५०० किमीपर्यंत मारा करु शकते. यात अत्याधुनिक कॉम्प्युटर आणि नेव्हिगेशन प्रणाली आहे. अग्नि २ -अग्नि २ क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे १ टन पेलोड घेऊन जाण्यासोबतच २ हजार किमीपर्यंत मारा करु शकते. या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि तंत्रज्ञान आहे. अग्नि १ - अग्नि १ क्षेपणास्त्र ७०० किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. निर्भय हे भारताचे सबसोनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. निर्भय क्षेपणास्त्रात रॉकेट मोटार बूस्टरसह टर्बोफेन इंजिन आहे. यामुळे याची रेंज ८०० ते १००० किमी आहे. कोणत्याही हवामानात या क्षेपणास्त्राद्वारे अचूक निशाणा साधता येतो. प्रहार हे शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ज्याची मारक क्षमता १५० किमीपर्यंत आहे. पुढील काही वर्षात हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्यात सामिल होण्याची शक्यता आहे. नाग हे ४ किमी रेंजसोबत ४२ किलो वजनाचे हे क्षेपणास्त्र आपल्या सोबत ८ किलो विस्फोटक घेऊन जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र फायर अँड फॉरगेटच्या आधारावर काम करते. हे क्षेपणास्त्राद्वारे जमिनीवरुन जमिनीवर आणि हवेतून जमिनीवर मारा करता येतो. ब्रह्मोस या क्षेपणास्त्रला भारत आणि रशियाने मिळून बनवले आहे. हे जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. याची मारा करण्याची क्षमता २९० किमी आहे आणि गती ताशी ३७०० किमी आहे. आकाश हे ७०० किलो वजनाचे हे क्षेपणास्त्र जमिनीवरुन हवेत मारा करण्यास सक्षम आहे. याची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे २५ किमीच्या रेंजमध्ये कोणत्याही उडणार्या गोष्टीला भेदण्यास सक्षम आहे.
आधुनिक क्षेपणास्त्रमुळे भारत लष्करीदृष्ट्या प्रभावी
यासर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत आता भारताने विकसित केलेल्या एचएसटीडीव्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने स्क्रॅमजेट वाहनातून दीर्घ पल्ल्याची स्वनातीत क्षेपणास्त्रे सोडली जाऊ शकतात. त्यांचा वेग ध्वनीच्या सहा पट जास्त असल्याने जगातील कुठल्याही भागातील लक्ष्य एका तासात भेदता येते. अन्य क्षेपणास्त्रे बॅलेस्टिक ट्रजेक्टरी फॉलो करतात. म्हणजेच सहजतेने त्या क्षेपणास्त्रांच्या मार्गावर लक्ष ठेवता येते. अशा क्षेपणास्त्रांमुळे शत्रूला तयारी करण्याचा आणि प्रतिहल्ला करण्याची संधी मिळते. पण हायपरसॉनिक शस्त्राचा कोणताही निश्चित मार्ग नसतो. त्यामुळे शत्रूला हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या मार्गाचा अंदाज लावता येत नाही. तसेच हल्ल्याचा वेग इतका प्रचंड असतो की, शत्रूला कळण्याआधी लक्ष्यावर प्रहार केला जाऊ शकतो. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हे ध्वनीच्या गतीपेक्षा पाचपट वेगवान प्रवास करते. भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढला असताना डीआरडीओने भारतासाठी स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित केले. यामुळे भारताच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे. फ्रान्सची राफेल, रशियाची एस ४०० एअर डिफेन्स सिस्टिम आणि स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र यांच्यासह सैन्याची सक्षम असलेली तिन्ही दले आणि आधुनिक भारतीय क्षेपणास्त्र यामुळे भारत लष्करीदृष्ट्या कमालीचा प्रभावी होईल. संरक्षण क्षेत्रात भारत ज्या वेगाने काम करत आहे ते बघता भारत एक आव्हानात्मक देश ठरणार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचे सदैव रक्षण करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. संरक्षण क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करुन स्वदेशी सक्षम संरक्षण यंत्रणा आणि शस्त्रे यांची निर्मिती करत आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेचा एक भाग म्हणून भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा पुढील काळात मोठा लाभ होईल, यात कोणाचेही दुमत नसावे!
Post a Comment