कोरोनाचा उद्रेक

कोरोना महामारीने संपूर्ण जग हैराण झाले आहे. कोरोना विषाणूने जगाचे चित्र बदलून टाकले असून, भारतासह अनेक देश या महामारीचा सामना करत आहेत. कोरोनाच्या संसगार्मुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे. सध्या इतर देशांच्या तुलनेत भारतात दिवसाला आढळून येणार्‍या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून येण्याचा विक्रमही दुर्दैवाने भारताच्या नावे नोंदवला गेला आहे. रविवारी जगभरात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ४० टक्के रुग्ण एकट्या भारतात सापडले होते. गेल्या चार दिवसांपासून देशभरात सरासरी ८० ते ९० हजार करोनाबाधित आढळत असल्याने देशातील करोनाबाधितांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. वर्ल्डोमीटर संकेतस्थळावरील माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या जागतिक क्रमवारीत सध्या अमेरिका पहिल्या क्रमाकांवर आहे. तर भारत दुसर्‍या स्थानी आहे. दोन दिवसांपूर्वीच ब्राझीलला मागे टाकत भारत तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. गंभीर बाब म्हणजे, भारतानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांमध्ये सापडलेल्या नव्या रुग्णांची एकत्रित आकडेवारीही भारतापेक्षा कमी आहे. 


देशात सामूहिक संसर्गाला सुरुवात!

भारतासह जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देश कोरोनाविरुद्धची लढाई लढत असून, चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून आतापर्यंत जगातील २७.१९ मिलियन लोकांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ८ लाख ८८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. मुंबई, ठाणे, पुणे, जळगाव, औरंगाबाद, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत, त्याचप्रमाणे तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश अशा राज्यांतही अनेक जिल्ह्यांत या आजाराचा प्रसार वेगाने होऊन, खूप मोठ्या संख्येने बाधित असलेले व्यक्तीसमूह निर्माण झालेले आहेत. सुरुवातीला शहरी भागापुरता मर्यादित असलेल्या कोरोनाने आता देशातील ग्रामीण भागातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. सध्या भारतात विक्रमी वेगाने वाढणारी रुग्णांची संख्या सामूहिक संसर्गाचाचे स्पष्ट संकेत देत आहेत. देशात सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचा सर्वांना अनुभवायला येत आहे, पण त्यावर केंद्र सरकार का पांघरूण घालतेय, याची अनेक कारणे असू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी होईल, लोकांमध्ये घबराट पसरेल, आरोग्य यंत्रणा कोलमडून पडेल, सरकारवर अपयशीपणाचा शिक्का बसेल, याची भीती वाटत असली तरी कोंबडे झाकून ठेवले, तरी सूर्य उगवायचे थोडेच थांबणार आहे? महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ४३ हजार ७७२ झाली असून मृतांचा आकडा २७,४०७ झाला. देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये महाराष्टाची भागीदारी गेल्या आठवड्यात वाढून पहिल्यांदाच २० टक्के झाली आहे. आता राज्याची ही भागीदारी वाढून २१.७ टक्के झाली आहे. 

महाराष्ट्रात व देशात रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर

आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढून ५ लाखांच्या पुढे गेला आहे. तर कर्नाटकमधील कोरोनाबाधितांची संख्याही वाढून ४ लाखांच्या पुढे गेली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत कोरोना नियंत्रणात आलेल्या दिल्लीमध्ये पुन्हा एकदा बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्येही संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूने देशातील इतर भागांप्रमाणेच दक्षिण भारतालाही घट्ट विळखा घातला आहे. दक्षिण भारतात आंध्र प्रदेशात सर्वाधिक बिकट परिस्थिती असून, राज्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तर मंगळवारी सापडलेल्या १० हजार ६०१ रुग्णांसह येथील रुग्णसंख्या पाच लाख १७ हजार झाली आहे. तामिळनाडूमध्ये पाच हजार, केरळमध्ये तीन हजार आणि तेलंगणामध्ये दोन हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या संकटातून जग अजून बाहेर पडलेले नसतानाच जागतिक आरोग्य संघटनेने पुढील काळात येणार्‍या महामारीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. देशभरात आतापर्यंत पाच कोटींच्यावर चाचण्या झाल्या आहेत. जास्त चाचण्या झाल्या असल्याने रुग्णांची संख्या जास्त असल्याचा दावा अर्धसत्य आहे. महाराष्ट्रात व देशात रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर पोहचली असली तरी, करोना हाताळणीच्या संबंधात अजून मोठ्या प्रमाणात बेपर्वाईच दिसून येत आहे. प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव आणि नागरिकांमध्ये दिसणारी बेफिकीर वृत्ती, ही कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची कारणे आहेत. नियोजनात त्रुटी राहू शकतात, मात्र निदर्शनास आल्यानंतरदेखील त्या अमान्य करणे, ही मानसिकता प्रभावी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडथळा ठरत आहे. 

सरकारी यंत्रणा अपयशी

लॉकडाऊनसारख्या उपायांनी कोरोना आटोक्यात येत नाही हे दिसून आल्याने नेमके करावे तरी काय, याची दिशा निश्‍चित होतांना दिसत नाही. लॉकडॉऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. केंद्र सरकारने १ जूनपासून लॉकडॉऊन शिथिल करण्यास सुरूवात केली. ज्याला अनलॉक-१ असे संबोधण्यात आले. अनलॉक-१ नंतर आर्थिक व्यवहार होऊ लागले. पण त्यासोबतच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली. त्यामुळे लॉकडॉऊनमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गावर मिळवलेले नियंत्रण अनलॉक-१ मुळे आटोक्याबाहेर गेले का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. हाच प्रकार अनलॉक-२ व अनलॉक-३ नंतरही हिच परिस्थिती कायम असल्याने कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. कोरोनाचे पेशंट वाढत असताना त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतही आता सरकारी यंत्रणा अपयशी ठरतांना दिसत आहेत. केंद्र सरकारच्या पातळीवर करोना नियंत्रणासाठी आणखी व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. त्यात त्यांना सातत्य राखावेच लागेल. राज्यांना त्यासाठी पुरेशी आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर देशातील आरोग्य सुविधांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर कोरोनासारखी साथ भविष्यात आल्यास आजच्यासारखी धावपळ होऊ नये यासाठीचा व्यापक आराखडा तयार होणे आवश्यक राहील. तत्पूर्वी कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी वैय्यक्तिक पातळीवर जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. 


Post a Comment

Designed By Blogger