भाजप-सेनेचा नवा ‘सामना’

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. फडणवीस-राऊत यांच्यातील भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यासर्व गाठी-भेटींबाबत तर्कवितर्क सुरु असताना, या सर्व भेटी नियमित भेटींचा भाग होत्या, हे पटवून देण्याचा प्रयत्न सर्वच जण करताना दिसत आहेत. मात्र बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर सुरु झालेली ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीचे धागेदोरे काही दिग्गज राजकीय नेत्यांपर्यंत पोहचल्याची चर्चा आहे. याप्रकरणी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची सीबीआय किंवा नार्कोटीक्स विभागाकडून कधीही चौकशी होवू शकते, अशी भीती देखील शिवसेनेला वाटत आहे. कदाचित यामुळे देखील शिवसेनेने ताठर भुमिका सोडत भाजपासोबत जुळवून घेण्याचा प्रत्यत्न केल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाजप प्रेम अधून मधून उफाळून येत असल्याने शिवसेना धास्तावलेली आहे. एकीकडे कोरोनामुळे सरकार चालवितांना येणार्‍या अडचणी तर दुसरीकडे महाआघाडीचे सरकार चालवितांना होणारी तारेवरची कसरत, यामुळे ठाकरे सरकारवर अस्थिरतेचे ढग घोंगावू लागल्यास भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा पर्याय शिवसेनेने खुला ठेवला आहे, हेच प्रथमदर्शनी दिसून येते.


तिन्ही पक्षांमधील कुरबुरु व कुरघोड्या 

२०१९मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा एकत्र लढले होते. मात्र, सत्ता वाटपावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये मतभेद झाले होते. दोन्ही पक्षात सत्ता वाटपाचे सूत्र जुळून आले नाही. तसेच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, अशी ताठर भुमिका सेनेने घेत वेगळी वाट निवडली होती. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत हात मिळवत सत्ता स्थापन केली होती. या राजकीय समीकरणात शरद पवार व संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मात्र महाआघाडीचे हे सरकार स्थापन झाल्यापासून तिन्ही पक्षांमधील कुरबुरु व कुरघोड्या सातत्याने समोर येत आहेत. सरकारमध्ये असूनही काँग्रेसने अनेकवेळ जाहीर नाराजीदेखील व्यक्त केली आहे. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी अटकळ देखील बांधली जाते मात्र धुरंधर राजकारणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या शरद पवार यांनी तिन्ही पक्षांना अद्याप एकत्र बांधून ठेवले आहे. मुख्यमंत्रीपद जरी शिवसेनेकडे असले तरी त्याचा रिमोट कंट्रोल थोरल्या पवार साहेबांकडेच आहे, असा ठाम विश्‍वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना आहे. असे असताना धाकटे पवारसाहेब अनेकवेळा वेगळीच वाट निवडतांना दिसतात. जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर अभिवादन केले होते. नंतर त्यांना ते तत्काळ मागे देखील घेतले मात्र त्यासाठी आपणास वरिष्ठांच्या सुचना होत्या, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत. तसेच कृषी विधेयकाची राज्यात अंमलबजावणी करणार नाही, असे परस्पर जाहीर करून अजित पवारांनी पक्षाला अडचणीत आणले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोणतीही एकवाक्यता नाही हेच यावरुन स्पष्ट होते. यामुळे राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांमध्ये अजित पवार यांना मानणारा मोठा गट असल्याने ते कधीही राष्ट्रवादीचा गट घेऊन भाजपबरोबर जाऊ शकतात, हा शिवसेनेचा संशय बळावत चालला आहे. परिणामी, शिवसेना भाजपसोबत पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

राजकीय संशयकल्लोळ 

सर्वत्र राजकीय संशयकल्लोळ उठला असताना फडणवीस-राऊत यांच्या भेटीवर चर्चा झाली नसती तर नवलच! या भेटीवर दोन्ही नेत्यांनी भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नव्हते. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बर्‍याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी अशी महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, यामुळे ही भेट झाली. तर फडणवीस म्हणाले की, माझी मुलाखत घेणार असल्याचे संजय राऊत यांनी घोषित केले होते. पण या मुलाखतीसाठी माझ्या काही अटी होत्या. मुलाखतीच्या अटींवर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो. दरम्यान जे सरकारचे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू पण भाजपला सरकार बनवण्याची कोणतीही घाई नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र सामाना साठीच्या मुलाखतीसाठी तब्बल दोन तास खलबते! हे न पटण्यासारखे आहे.

सरकार चालवितांना मोठी कसरत 

महाआघाडीचे सरकार चालवितांना उध्दव ठाकरे यांना मोठी कसरत करावी लागत आहे. आधीच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे संबंध गुंतागुंतीचे झाले आहेत. सत्तेत राहता आले हेच खूप झाले, अशी काँग्रेसच्या नेत्यांची भावना आहे, तर अन्य दोघे पक्षवाढीसाठीच्या एकमेकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा तिढा केंद्राच्या सहकार्याखेरीज सुटणार नाही. आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यास राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे लोण पुन्हा उद्भवण्याची भीती उद्धव ठाकरे यांना वाटते आहे. कोरोना रुग्णांवर उपाययोजना करण्यात राज्य सरकार निधीच्या अभावी कमी पडत असून जनतेचा रोष मात्र वाढतच चालला आहे. विधान परिषदेच्या १८ जागा रिक्त आहेत. मात्र, राज्यपाल यांच्या असहकार्यामुळे त्या भरता येत नाहीत. महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देता आलेली नाही, अशी कामे प्रलंबित राहिल्याने सरकार असून नसल्यासारखी शिवसेनेची अवस्था आहे. मात्र भाजप-शिवसेनेने एकत्र येणे तेवढे सोपे नाही. शिवसेनेचा पाच वर्षे सतत अपमान केला, आदित्य ठाकरेंना अडचणीत आणले, एकनाथ शिंदे यांना कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत स्टेजवर भाजपमुळे रडावे लागले, अशा भाजपसोबत जायचे कशाला, असा अंतर्गत विरोध उफाळून येवू शकतो. यामुळे भाजप-शिवसेनेचा नवा ‘सामना’ कसा रंगतो? याचे उत्तर येणार्‍या काळातच मिळेल.

Post a Comment

Designed By Blogger