अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी नामांकित अभिनेत्रींची नावे समोर आल्याने अवघे बॉलीवूड हादरले आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग या आघाडीच्या अभिनेत्रींच्यामागे अमली पदार्थ नियंत्रक विभागाच्या (एनसीबी) चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. बॉलीवूडच्या या ड्रग्ज कनेक्शनचे बिंग फुटल्यामुळे आता अभिनेते, अभिनेत्री अंमली पदार्थाच्या कशा आहारी जात आहेत, याची चर्चा होत असली तरी बॉलीवूडमध्ये ड्रग्सचे कनेक्शन नवीन नाही किंवा अमली पदार्थ आणि बॉलीवूड याचा संबंध प्रथमच समोर आलेला नाही. याआधी संजय दत्त, ममता कुलकर्णी, बॉबी देओल, प्रतीक बब्बर, रणबीर कपूर, फरदीन खान, पूजा भट्ट यांच्यासह अनेक कलाकारांच्या अमली पदार्थांच्या सवयी उघड झालेल्या आहेत. यापैकी अनेकांनी आपल्या नशेच्या सवयी सोडल्याचे उघडपणे मान्य देखील केले आहे.
सुशांतसिंग मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीदरम्यान बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा डर्टी पिक्चर समोर आला. याप्रकरणी एनसीबीच्या रडारवर सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावे समोर आली आहेत. बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलेब्रिटींशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर दिपिकाचे व्हॉट्स चॅट समोर आल्यामुळे एनसीबीने दीपिका, सारा, श्रद्धा व रकुल प्रीत सिंग यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार, टप्प्या टप्प्याने सर्वांची चौकशी झाली. यात रकुल प्रीतने व्हॉट्सअॅप ड्रग्ज संवादाबाबत कबुली देत, आपण स्वत: कधीच ड्रग्ज घेतले नसून, रियाच माझ्या घरी ड्रग्ज ठेवत असल्याचे सांगितले. त्यामुळे रियाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. बॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहरने ऑगस्ट २०१९ मध्ये दिलेल्या एका पार्टीत अनेक स्टार कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते, अशी तक्रार अकाली दलाचे खासदार सिरसा यांनी काही दिवसांपूर्वीच दाखल केली होती. यावर बॉलीवूडमध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. कारण यापार्टीत दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, विकी कौशल, अर्जुन कपूर, मलाईका अरोरा, वरुण धवन, शाहिद कपूर, झोया अख्तर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहर्यांनी हजेरी लावली होती. हा वाद शमत नाही तोच आता रिया चक्रवर्तीने बॉलीवूडचा खरा चेहरा टरा टरा फाडण्यास सुरुवात केली आहे.
अनेक सेलिब्रिटींची ड्रग्सच्या व्यसनाबाबत कबूली
आज सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे दारू, अमली पदार्थ, गांजा, कोकेन अशा अनेक अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे दिसते. तसे पाहता बॉलीवूड व अमली पदार्थांचे नाते नवे नाही. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी ड्रग्सच्या व्यसनाबाबत कबूली दिली आहे. बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर संजय दत्त आधीच ड्रग्जचा बळी ठरला होता. १९८१ मध्ये जेव्हा त्याची आई नर्गिस यांचा कर्करोगाने मृत्यू झाला, त्यानंतर तो अमली पदार्थांच्या जास्तच आहारी गेला. १९८२ मध्ये ड्रग्स बाळगल्याच्या आरोपाखाली त्याला तुरूंगवासही झाला आहे. त्याची अवस्था इतकी वाईट झाली होती की, त्याचे वडील सुनील दत्त यांनी अमेरिकेच्या रिहॅब सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार केले. याबाबत खुद्द संजय दत्तने अनेकवेळा कबूली दिली आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याचा बायोपिक ‘संजू’ या चित्रपटात हे वास्तव दाखविण्यात आले आहे. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणार्या रणबीर कपूरने एका मुलाखती दरम्यान तो शालेय जीवनात ड्रग्सचा बळी होता, याचा गौप्यस्फोट केला होता. २००१ साली कोकेन बाळगल्या प्रकरणी अभिनेता फर्दिन खान याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या प्रसिद्धीवर आणि प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याचा त्याच्या कारकिर्दीवर सुद्धा परिणाम झाला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत आपली छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटील हीचा मुलगा प्रतीक बब्बर याने सुद्धा त्याने ड्रग्स घेतले असल्याचे मान्य केले आहे. वयाच्या १३व्या वर्षीच ड्रग घेतले आणि त्यानंतर तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. प्रसिध्द रॅपर व गायक योयो हनी सिंग देखील ड्रग्जच्या आहारी गेला. एक वर्षासाठी त्याच्यावर पुनर्वसन केंद्रात उपचार करण्यात आले.
कलाकार केवळ करमणूक करण्यासाठी
एकेकाळी बॉलीवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री असणारी मनीषा कोईरालाही ड्रग्जमुळे संपली. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा नवरा विक्की गोस्वामी यांचे दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात नाव होते. बॉलिवूड अभिनेता विजय राजलाही दुबईमध्ये ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. अशी कित्येक नावे समोर येतील. अमली पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे अनेकांची कारकीर्द कायमची संपली आहे. दुर्दव्य म्हणजे अशा नशेखोरांना आजची तरुणाई आयडॉल मानते व त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. चित्रपटसृष्टीतील हे कलाकार केवळ करमणूक करण्यासाठी आहेत, हे वास्तव न स्विकारता पडद्यावर जो अभिनय ते करतात, त्यास वास्तव मानून त्याचे अनुकरण करण्याच्या नादात अनेकांचे आयुष्य बरबाद झाल्याची असंख्य उदाहरणे देशात सापडतील. आज सुशांतसिंगच्या मृत्यू प्रकरणाच्या निमित्ताने बॉलीवूडची काळीबाजू समोर आली आहे. यात आघाडीच्या अभिनेत्रींची नावे असल्याने नेहमीपेक्षा यंदा याप्रकरणाला अधिक गंभीरता आहे. यात अजून कुणाकुणाची चौकशी होते, कुणाची नावे समोर येतात, त्यांना शिक्षा होते की नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येणार्या काळात मिळतील किंवा मिळणार देखील नाही. मात्र यानिमित्ताने बॉलीवूडचा खरा ‘डर्टी पिक्चर’ प्रदर्शित झाला आहे, यापासून तरुणाईने बोध घ्यायला हवा, एवढीच माफक अपेक्षा!
Post a Comment