कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात अजूनही ही अस्थिरता कायम आहे. गेली तिन-चार महिने दररोज नवे नवे विक्रम स्थापन करणार्या सोने व चांदीच्या किंमतीमध्ये या आठवड्यात मोठी घसरण होत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या चार-पाच महिन्यांच्या काळात आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात बंद असल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता, ज्यामुळे सोन्याच्या किंमती मोठया प्रमाणात वधारल्या होत्या. पण आता अचानक सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येत आहेत. सोन्याची आतरराष्ट्रीय किंमतीत जवळपास ६ टक्क्यांनी उतरल्या आहेत. तर स्थानिक सुवर्ण बाजारपेठेत केवळ आठवडाभरात सोने जवळजवळ अडीच हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. एरव्ही पितृपक्षात कमी होणारे सोने-चांदीचे भाव यंदा पितृपक्षात विक्रमी पातळीवर पोहचले व आता अधिक-मासात कमी-कमी होत आहे. पितृपक्षात भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात मात्र अधिकमासात घसरण होत असल्याचे उलट चित्र निर्माण झाले असल्याने गुंतवणुकदारांसह सर्वसामान्यही बुचकळ्यात पडले आहेत.
डॉलर मजबूत; सोन्याच्या किंमतीमध्ये पडझड
स्वत:जवळ पैसे असो वा नसो, पण सामान्य माणसाला सोन्याच्या भावाचे आणि एकूणच सोन्याचे मोठे कुतूहल राहिले आहे. यामुळे भारतात सोन्याला प्रचंड महत्व दिसून येते. फॅशन व सुरक्षित गुंतवणूक अशा दोन्ही पातळ्यांवर सोने खरे उतरत असल्याने याला विशेष महत्त्व आहे. कोरोना आणि लॉकडाऊनसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे गेले काही आठवडे सोनेच्या दरात नवीन उच्चांक नोंदवले जात हे दर आता जवळपास ५२ हजारांच्या पातळीवर गेले होते. सोने दराचा हा वेग पाहता वर्षअखेरीस सोने ७० हजारी होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र अचानक सोन-चांदीच्या दरांची घसरगुंडी सुरु झाली आहे. गेल्या आठवडाभरात सोने जवळजवळ अडीच हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. युरोपमध्ये आर्थिक मंदीची चिन्ह दिसत असल्याने युरोपियन चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचा भाव वधारला आहे. सोन्या चांदीचे भाव घसरत आहे हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे हे निर्देश आहेत अस एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते या भितीने गुंतवणुकदारांनी आता डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच अमेरिकन चलन अधिक मजबूत होताना दिसत आहे. अमेरिकन चलनाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती अधिक मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी पडझड झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये आणखीन घसरण होऊ शकते असेही तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांचे पडसाद
वास्तविक आज सर्वच पातळ्यांवरचे अर्थकारण बिघडले आहे. कोरोनाच्या आधीच्या काळापासूनच देशातील उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली होती. परिणामी लोकांच्या उत्पन्नावर आणि रोजगारावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. त्यातच मार्चपासून देशातील आणि जगाच्या बहुतांश भागातील लॉकडाऊनमुळे बहुतेक सारेच व्यवसाय ठप्प झाले. सराफ बाजारालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. त्यांच्याकडील विक्रीही मोठ्या प्रमाणात घटली असताना सोन्याचे भाव मात्र कसे वाढले होते? असा काहींना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मुळात महागाई, जागतिक पातळीवरील अर्थकारणाच्या घडामोडी, सरकारचे सोने साठवण धोरण, ज्वेलरी मार्केटमधील मागणी आणि व्याजदराचा चालू ट्रेंड या पाच घडामोडीचा सोन्याच्या खरेदी-विक्रीवर आणि परिणामी त्याच्या दरावर मोठा परिणाम होत असतो. शेअरबाजार गडगडत चालला की सोन्याच्या किमती वाढतात आणि शेअरबाजारात तेजी आली की नेमके उलट घडते असा आजवरचा अनुभव राहिला आहे. अर्थव्यवस्था संकटात सापडते तेव्हा सोन्याचे भाव वर जातात. अर्थव्यवस्थेची मंदी, मोठमोठे घोटाळे, परचक्र अशा काळात शेअर्स, बाँड्स व इतर मालमत्तांचे भाव कोसळतात. मात्र, जेवढी अनिश्चितता जास्त, तेवढा सोन्याचा भाव अधिक, असे सोन्याच्या दराचे आजवरचे गणित राहिले आहे. मात्र या गणितालाही आता अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात विक्रमी घसरण पहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांचे पडसाद कमॉडिटी बाजारासह सर्वत्र उमटत असल्याने हा चढ-उतार सुरु झाले. त्याआधीची परिस्थिती पाहिल्यास, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात अलीकडच्या काही महिन्यांमध्ये सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्व अधोरेखीत होते.
सोन्यामध्ये गुंतवणूक करतांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता
चालू २०२० वर्षांत सोन्याने २८ टक्के परतावा दिला आहे. तर चांदीबाबत हे प्रमाण ३३ टक्के आहे. अडचणीच्या काळात सोनेच उपयोगी पडते ही मानसिकता निव्वळ भारतीयांची नसून जगभरातील गुंतवणूकदारांची आहे. येणार्या काळात अडचणी आणखी वाढतील या भितीने गुंतवणूकदार सोने खरेदी करत सुटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढून त्या परिणाम सोन्याचे दर वाढण्यावर झाला होता. भारतातील सोन्याच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात कारण आपण सोने आयात करतो. आपल्याकडे सोने फारसे निर्माण होत नाही. यामुळे भारतातही सोन्याचे दर सातत्याने वाढत होते परंतू रुपयाच्या तुलनेत डॉलर अधिक मजबूत होत असल्याने पुन्हा एकदा सोन्याची चकम फिकी पडू लागली आहे. दुसरीकडे भारतातील ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देशात कोरोनाचा फैलावही मोठया प्रमाणात वाढतच आहे. यामुळे देशाची विस्कटलेली आर्थिक स्थिती पुढील बरेच दिवस पूर्वपदावर येण्याची लक्षणे दिसत नाहीत. बाजारात पैसा खेळता राहण्यासाठी आरबीआयची मान्यता असणार्या बँकांनी सोन्यावर ९० टक्के कर्ज देणे सुरू केले आहे, यापूर्वी ७५ टक्के कर्ज दिले जायचे. ही देखील धोक्याची घंटा असल्याचे तज्ञांचे मत आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता सोन्यामध्ये गुंतवणूक करतांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कर्ज काढून किंवा मालमत्ता विकून सोन्यात गुंतवणूक करणे जोखमीचे ठरु शकते. अमेरिकेसह युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्यास सोन्याचे दर अजून विक्रमी वेगाने कोसळू शकतात. याकरीता जोपर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत सोन्याच्या दरांमध्ये अशाच प्रकारे चढउतार पहायला मिळू शकतात, याकरीता सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही.
Post a Comment