शेतकर्‍यांच्या अपेक्षांवर निसर्गाचा ‘नांगर’

आस्मानी संकटांची मालिका शेतकर्‍यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. पाचसहा वर्ष कोरड्या दुष्काळात दुबार तिबार पेरणी करून ही खरीप, रब्बी पिके हातात आली नाहीत. गतवर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हाहाकार माजवला होता. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नाही. यावर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिकांची स्थिती चांगली होती. मात्र उडीद व मुग फुलोरामध्ये येण्याची वेळ असताना पावसाने ओढ दिली. मात्र तरीही उडीद, मुगाचे पीक समाधानकारक येईल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. हे पीक ऐन तोडणीवर आले असताना पावसाने धुमाकुळ घालायला सुरुवात केली. जळगाव जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उडीद, मूग आदी पिके पूर्णपणे वाया गेले आहेत. तर कपाशी, ज्वारी, मका, सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच वादळी वार्‍यामुळे यावल, रावेर, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर आदी भागातील केळीही भुईसपाट झाली आहे. वादळी पावसामुळे सलग दुसर्‍या वर्षीही शेतकर्‍यांच्या अपेक्षेवर निसर्गाने नांगर फिरविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 



केळी बागा उद्ध्वस्त

गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग, सोलापूर, जळगाव, पुणे जिल्ह्यात पावसाचा फटका मोठ्या प्रमात बसला आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक जिल्ह्यांमधील धरणे फुल्ल भरली आहेत. यंदा आतापर्यंत दमदार पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील तीन मोठे व १३ मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेने तब्बल आठ टक्के अधिक साठा आहे. अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, मन्याड, बोरी, गिरणा व वाघूर धरण ओव्हरफ्लो झाले असून, हतनूरमधे ७६ टक्के साठा आहे. त्यातून पाण्याच्या आवकमुळे विसर्ग सुरू आहे, तर मोर व बहुळा मध्यम प्रकल्प ९० टक्क्यांच्या वर साठा आहे. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गिरणा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने त्याचा परिणाम म्हणून जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव शहरांसह १५८ ग्रामीण पाणीयोजनांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतीसाठीही पाणी मिळणार आहे. ही सकारात्मक बाजू असली तरी दुसर्‍या बाजूला सध्या सुरु असलेल्या पावसाच्या धुमाकुळीमुळे शेतकर्‍यांच्या शेतात व डोळ्यात असे दोन्ही ठिकाणी पाणी आले आहे. गेल्या तिन दिवसात झालेल्या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. यासोबतच मका, ज्वारी, कापूस या पिकांचेही नुकसान झाले आहे. कापणीवर असलेली केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. कपाशी पूर्णत: झोपली आहे तर ज्वारीचे व मक्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

ज्वारी, मका, सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान

गेल्या दोन-तीन वर्षांपासून काही ना काही कारणास्तव शेतकजयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वर्षी जुनला मृगात पेरणी झाली. चांगली पिके येतील अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र या आशेवर वरुणराजाने वकृदृष्टी करत मुगाच्या ऐन तोडणीच्या काळात सतत पडत राहिल्याने मुगाच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. या वर्षीच्या पावसाळ्यात सुरूवातीपासून पिकांच्या गरजेनुसार पडणारा पाऊस, सरासरीपेक्षा जास्तच होता. त्यामुळे मुगाचे पिक प्रचंड वाढले. यात वारा आणि पाऊस यात हे पिक आडवे झाले तरीही पन्नास टक्के पिक हातात येईल अशी आशा शेतकर्‍यांना वाटत असतांना तो घास देखील वादळी पावसाने हिरावून घेतला आहे. दररोजच्या पावसामुळे पिकांना जागेवरच कोंब आले व जागेवरच सडत आहेत. उडीद व मूग शेतकजयांच्या हातून पूर्णपणे निघून गेला, तरीही पाऊस सुरूच आहे. कापणीवर आलेल्या ज्वारी, मका, सोयाबीन या पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. गेल्यावर्षीही त्यामुळे गेल्या वर्षी उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तीच परिस्थिती पुन्हा दुसर्‍या वर्षीही उद्भवली आहे. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना यंदा कुकुंबर (सीएमव्ही) आणि गेल्या पंधरवाड्यापासून अधून मधून दमदार हजेरी लावत असलेल्या वादळी पावसामुळे सुमारे १४ ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी बागांचे नुकसान झाले. जिल्ह्यात रावेरसह मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, यावल आदी भागातील काढणीवरील केळी पिकाला वादळी पावसाने भुईसपाट केले आहे. रावेरातील कोचूर व लगत काढणीवरील केळीला फटका बसला. यावलमध्येही वादळाने काढणीवरील केळीचे नुकसान झाले आहे. तर पाचोर्‍यातील केळीचे आगार असलेल्या नगरदेवळा व इतर भागालाही वादळी पावसाने फटका बसला. 

राजकारणाचे जोडे बाजूला एकत्र येण्याची आवश्यकता 

यामुळे एकट्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना सुमारे ८० ते ९० कोटींचा फटका बसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही, दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीतून सावरत नाही, तोच पुन्हा झालेल्या वादळी पावसामुळे पुन्हा एकदा खरिपाच्या पिकांना फटका बसून पिके भुईसपाट झालेली आहेत. धुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात पावसाने मात्र जास्तच कहर केला होता. सप्टेंबर महिन्यात देखील वादळीवार्‍यासह पाऊस झाला. त्यातून सावरत नाही तोच गत दोन-तिन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील कपाशी बाजरी मका सर्वत्र डोलदार पिके आडवे पडून जमीनदोस्त झालीत शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात जिल्ह्यात तळोदा-शहादा तालुक्यात वेळेवर पावसाला सुरुवात झाली. मात्र वादळ वार्‍याने केळी, पपई, उसाचे मोठे नुकसान केले. अनेक हेक्टर क्षेत्र जमीनदोस्त केले. ऑगस्ट महिन्यात नंदुरबार, नवापूर, धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तो आजही कायम आहे. या पावसामुळे मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, मिरची आदी पिकांची लागवड शेतकर्‍यांनी केली. पिके चांगली जोमात आली. मात्र सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके पिवळी पडली, काही ठिकाणी कुजली व मररोगाचा प्रादुर्भाव झाला. खान्देशावर ओढवलेल्या या आस्मानी संकटात बळीराजाला शासनाकडून मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. यासाठी तात्काळ पंचनामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षिय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. तेंव्हाच शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू पुसता येतील.

Post a Comment

Designed By Blogger