कोरोनाच्या संकटात आयपीएलचा उत्साह

नव्या वर्षाची सुरूवात होताच भारतातील क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे वेध लागतात. प्रत्येक वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यात क्रिकेटविश्‍वात आयपीएलची धूम असते. चौकार, षटकारांची आतषबाजी, अटीतटीचे सामने, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, चीअर लीडर्स आदी रंगानी सजलेल्या आयपीएलची क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून परिचित असलेल्या भारतात प्रचंड क्रेझ दिसून येते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलच्या आयोजनापुढेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आयपीएलच्या १३व्या सीझनला शनिवार १९ सप्टेंबरपासून दुबईत सुरुवात झाली. आयपीएलच्या इतिहासातील स्टार टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीची लढत होवून पहिल्याच दिवशी हायव्होलटेज सामना चाहत्यांना पाहायला मिळाला अर्थात घरात बसूनच!



सोन्याचे अंड देणारी स्पर्धा

कोरोना व्हायसरमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे जगभरात क्रिकेटसह अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. यंदाच्या आयपीएलच्या १३ व्या सीझनचे आयोजन भारतातच २९ मार्चपासून करण्यात येणार होते. परंतु, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल रद्द करण्यात आले. मात्र यंदाच्या वर्षी होणारा टी-२० विश्‍वचषक स्पर्धेला स्थगिती मिळाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेतला. कारण आयपीएल स्पर्धा ही सोन्याचे अंड देणारी स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते. दरवर्षीला मुख्य प्रायोजकाकडून क्रिकेट मंडळाला चारशे चाळीस कोटी एवढी घसघशीत कमाई होती. त्याशिवाय प्रक्षेपणाचे हक्क, जाहिराती यामधून मिळणारी रक्कम वेगळीच असते. यंदा ही स्पर्धा झाली नसती तर बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असते. म्हणूनच आयपीएलच्या आयोजनावर बीसीसीआय ठाम होते. भलेही प्रेक्षक नसले तरी चालेल पण स्पर्धा झालीच पाहिजे, प्रेक्षकांचे काय ते घरी बसूनच स्पर्धेचा आनंद लुटतील, असा कयास आयोजनकांनी बांधला असेल. यंदा आयपीएलचे सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार असल्याने मैदानावर आपल्या आवडत्या संघाच्या किंवा खेळाडूच्या नावाने घोषणा ऐकू येणार नाहीत. इतिहासात दुसर्‍यांदा आयपीएल भारताबाहेर दुबईत खेळवण्यात येत आहे. याआधी २००९मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचे आयोजन भारताबाहेर दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. तसेच २०१४मध्येही लोक सभा निवडणुकांमध्ये आयपीएलचा फर्स्ट हाफ दुबईत खेळवण्यात आला होता. 

महेंद्रसिंह धोनीसाठी ही आयपीएल नक्कीच खास

आयपीएलचा मोसम पन्नास दिवस रंगणार आहे. १० नोव्हेंबर रोजी अंतिम लढत होईल. यामुळे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या स्पर्धेवर कोरोनाच्या माहामारीचे सावट कायम राहणार आहे. याकाळात विविध देशांच्या खेळाडूंना एकत्र आणणे, त्यांना बायो-सेक्यूअर म्हणजे अत्यंत सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, हे शिवधनुष्य पेलण्याचे कठीण कार्यही यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयोजकांची अजूनही तारेवरची कसरत सुरु आहे. कोरोनामुळे बायो-सेक्यूअर वातावरण आणि बायो सेक्यूअर बबल हे परवलीचे शब्द बनून गेले आहेत. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरूवात झाली. त्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तानदरम्यानही कसोटी तसेच टी-२० मालिका रंगली. या काळात बायो सेक्यूअर बबल तयार करण्याचे आव्हान इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पेलावे लागले. आयपीएलसारख्या अत्यंत उत्कंठावर्धक तसेच अटीतटीच्या सामन्यांनी भरलेल्या स्पर्धेत या सगळ्या नियमांचे आणि बंधनांचे पालन खेळाडू कसे करणार, हे पाहावे लागणार आहे. या स्पर्धेवर एक नजर टाकली तर असे दिसून येते की, मुंबईने या स्पर्धेचे चार वेळा जेतेपद पटकाविले असले तरीसुद्धा चेन्नईने तब्बल आठवेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठून तीन वेळा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले आहे. चेन्नईच्या टीमचे सातत्य हे खरोखरीच वाखाणण्यासारखे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार्‍या महेंद्रसिंह धोनीसाठी ही आयपीएल नक्कीच खास आहे. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या माघारीमुळे चेन्नईला निश्चितपणे फटका पडला आहे परंतु चेन्नईकडे रवींद्र जडेजा, पीयूष चावला असे अनुभवी गोलंदाज उपलब्ध आहेत. फलंदाजीत शेन वॉटसन, अंबाती रायुडू, धोनी, ब्राव्हो चेन्नईला तारतील. रोहित शर्माचा मुंबई जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लसिथ मलिंगाने माघार घेतली असली तरी जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, मिचेल असे वेगवान त्रिकूट त्यांच्याकडे उपलब्ध आहे. कृणाल आणि हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड यांच्या रूपात मुंबईकडे गुणवान अष्टपैलूसुद्धा आहेत. 

कोरोना आणि अनोखळी खेळपट्टया असे दुहेरी आव्हान 

कोहलीच्या बंगळुरुला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकाविण्यात यश आले नाही. दिल्ली कॅपिटल संघात धवन-पृथ्वी शॉसारखी तगडी सलामीची जोडी, त्यानंतर पंत, कर्णधार श्रेअस अय्यर आणि अजिंक्य रहाणे अशी फलंदाजी, ईशांत शर्मा, अमित मिश्रा, अश्‍विन अशी गोलंदाजीची फौज असल्याने त्यांना बाद फेरी गाठण्याची संधी आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबलासुद्धा एकदाही विजेतेपदावर मोहोर उमटविण्यात यश आले नाही. केवळ २०१४ मध्ये मिळविलेले उपविजेतेपद वगळता या संघाकडून समाधानकारक कामगिरी झालेली नाही. तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल, कर्णधार राहुल, मयंक अगरवाल, मॅक्सवेल, संदीप सिंग, अशी फलंदाजांची स्टारकास्ट त्यांच्याकडे आहे. हैदराबाद सनरायर्झससुद्धा एक मातब्बर संघ आहे. वॉर्नर, विलियमसन, भुवनेशकुमारसारखे दिग्गज खेळाडू आहेत. राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेचे पदार्पणातच जेतेपद पटकविण्याची कामगिरी केली खरी; पण त्यानंतर त्यांना त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. कोलकत्ता नाईट रायडर्स यंदा तरी आपल्या कामगिरीत सुधारणा करणा का? याचीही उत्सुकता आहे. कोरोनाशी संबंधित बंधनांसोबत संयुक्त अरब अमिरातीतल्या वातावरणाशी, खेळपट्टयांशी खेळाडूंना जुळवून घ्यावे लागणार आहे. संयुक्त अरब अमिरातीतले हवामान खूप उष्ण असते. त्यामुळे इथल्या खेळपट्टया मंद असतात. चेंडूही खाली राहतो. त्यामुळे एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे पूर्णपणे अनोखळी खेळपट्टया असे दुहेरी आव्हान पेलतांना येथे खेळाडूंचा कस लागणार आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी ठरणार यात शंका नाही!




 


Post a Comment

Designed By Blogger