‘यूपीएससी’त मराठी पाऊल पडते पुढे.....

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सन २०१९मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. जेंव्हाही यूपीएससीचा निकाल जाहीर होतो तेंव्हा प्रशासनातील ‘मराठी टक्क्या’ची चर्चा सुरू होते. आताही या विषयावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. प्रचंड चिकाटी... अभ्यास... बुद्धिमत्ता याचा कस लावणार्‍या यूपीएससीच्या परीक्षेत मराठी मुले मागे राहतात, त्यांची चिकाटी, अभ्यास कमी पडतो अशी ओरड होत असते. मात्र यंदा यूपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. आव्हाने पेलण्याची क्षमता, परिश्रम, जिद्द, आत्मविश्‍वास, सातत्य, वेळेचा सदूपयोग यासोबतच संघर्ष करण्याची तयारी असेल तर केवळ यूपीएससीच नव्हे तर आयुष्याच्या कुठल्याही परीक्षेत उत्तीर्ण होता येते, हे पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहे. गेल्या काही वर्षांपासून युपीएससी निकालात महाराष्ट्राचा टक्का वाढला असून यंदाही निकालाची परंपरा कायम आहे. त्याच बरोबर गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदाही मुलगी पहिली आली. मराठमोळ्या नेहा भोसले हिने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यातून प्रथम येण्याची गेल्या काही वर्षांतील मुलींची परंपरा कायम ठेवली आहे. 


गेल्या १०-१५ वर्षांत मराठी मुलांचा कल वाढला 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने वर्ष २०१९-२०साठी सप्टेंबर, २०१९मध्ये मुख्य परीक्षा घेतली होती. तर फेब्रुवारी आणि जुलैमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. यातील यशस्वी उमेदवारांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर झळकली. एकूण ८२९ उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस यूपीएससीने केली आहे. यंदा प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कोट्यातून ७८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने प्रथम क्रमांक पटकावला. राज्यातून नेहा प्रकाश भोसले हिने १५वा, बीड येथील मंदार पत्की याने २२ वा,  आशुतोष कुलकर्णी याने ४४वा, नांदेडच्या योगेश पाटील याने ६३ वा तर सोलापूरमधील राहुल चव्हाण याने १०९ वा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील आठ जणांनी यशाचा झेंडा रोवला आहे, मराठवाड्यातील १५ तर खान्देशातून तिघांनी मोठे यश संपादन केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंजिनीअर झाल्यानंतर दृष्टी गमावलेल्या जयंत मंकले याने १४३वा क्रमांक पटकावत आपले स्वप्न साकारले आहे. यूपीएससी आणि त्यातील यशातील महाराष्ट्राचा विचार करता ही बाब ठळकपणे लक्षात येते की, गेल्या १०-१५ वर्षांत मराठी मुलांचा या क्षेत्राकडील कल चांगलाच वाढला आहे. ही अभिमानाची बाब असली तरी केवळ मराठी टक्का वाढला असे वरपांगी दिसणार्‍या तथ्यांच्या आधारे परीक्षेतील यशाचे मूल्यमापन न करता वस्तूनिष्ठ मूल्यमापन व्हायला हवे. 

ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे

गेल्या काही वर्षातील निकालावर नजर टाकल्यास असे लक्षात येते की यूपीएससीत मराठी टक्का हळूहळू वाढत असला तरी हे पुरेसे नाही. यास अनेक कारणे आहेत त्यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सेकंड प्रायोरिटी म्हणून पाहतात. अनेक जण करिअरची निवड करताना खूप गोंधळलेले असतात. एकदा का आपण प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा दुसरीकडे वळून पाहूच नये. तसे झाले तरच आपली मुले यात यश मिळवू शकतील. यात यश मिळवण्यासाठी प्रचंड चिकाटीची गरज लागते. यात अजून एक उल्लेख आवर्जून करायला हवा, तो म्हणजे एमपीएससी, युपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचा मांडलेला बाजार. मुंबई, पुण्यात मार्गदर्शनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय सुरु झाला आहे. त्यास अनेक मुलं बळी पडतात. लाखो रुपये फी, मेस, हॉस्टेल आदी खर्च केल्यानंतर एक वर्ष किंवा दोन वर्षानंतर या मुलांचे पेशन्स संपते, पैसा संपतो यानंतर येते ते नैराश्‍च! यामुळे देखील मराठी मुलं यात मागे पडतात. यासाठी ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना अनेकदा शाळांची पुस्तके वाचण्यास कंटाळा येतो. पण यूपीएससीची तयारी करण्यासाठी शाळांची पुस्तके वाचणे गरजेचे आहे. याकरिता वाचनसंस्कृती वाढण्याची आवश्यकता आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, या निकालात यंदाही इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेल्या आणि पूर्वी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. 

शेतकर्‍यांचे दु:ख जाणणारी पिढी प्रशासनात असणे गरजेचे 

अभियांत्रिकीसारखी व्यापक अभ्यासक्रमावर आधारित पदवी संपादन करताना प्राप्त होणारी विविध कौशल्ये व क्षमता नागरी सेवा परीक्षांची तयारी करताना उपयुक्त ठरतात. या उलट, काही अपवाद वगळता, केवळ पारंपारिक अभ्यासक्रमांच्या पदवीचे शिक्षण घेताना आवश्यक शैक्षणिक व अभ्यासबाह्य क्षमता पुरेशा विकसित होत नाहीत. यामुळे ही मुले यूपीएससीच्या परीक्षेत मागे पडतात. याचबरोबर यापूर्वीच्या प्रयत्नांमध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले व सध्या अन्य सेवेसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. प्रशासकीय सेवेत किंवा परराष्ट्र सेवेतच काम करण्याचे ध्येय असणारे यामध्ये अधिक आहेत. त्यासाठी पूर्वी गुण कमी पडल्याने त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश मिळाले आहे. राज्यातील यशस्वी उमेदवारांमध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांपेक्षा राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास निश्चितपणे यश मिळू शकते, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. शेतकरी कुटुंबातील तरूणांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा ध्यास घेतला तरच महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करेल. यासाठी शेतकर्‍यांचे दु:ख जाणणारी पिढी प्रशासनात असणे गरजेचे आहे. मात्र यासाठी मराठी मुलांनी केवळ प्रेरणादायी भाषणं एकूण किंवा कुणाच्या सांगण्यावरुन याकडे न वळता, स्वत:ची कुवत, चिकाटी, आत्मविश्‍वास, कष्ट करण्याची तयारी, सातत्य व सहनशीलता याचे स्वयं मुल्यमापन करुन तयारीला सुरुवात केल्यास त्यांना यश मिळवण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही. सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन...

Post a Comment

Designed By Blogger