अयोध्येतील राम मंदिर देशातील सद्भभावनेचे प्रतिक

५०० वर्षांची प्रतीक्षा, आंदोलन, राजकारण आणि दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर अयोध्येत राम मंदिरच्या भूमीपूजनाचा ‘मूहूर्त’ लागला आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे हा लोकभावनेशी जुळलेला विषय राहिला आहे. राम मंदिर उभे राहण्याच्या बाजूने सुरुवातीपासून बहुमत असताना, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी याला राजकारणाचा मुद्दा बनविल्याने हा विषय चिघळला. वस्तुत: मुस्लिम समुदायातील बहुसंख्य लोक देखील राम मंदिर उभारणीच्या बाजूने होते. याकरिताच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बहुतांश मुस्लिम समाजाने याचे स्वागत केले. एवढेच नव्हे तर राम मंदिर ट्रस्टतर्फे भूमीपूजनाचे पहिले निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना पाठवण्यात आले. त्यासह मुस्लिम पक्षकार हाजी महबूब व बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आले. या निर्णयामुळे सद्भावनेची प्रचिती येत आहे, जी खरोखरच कौतूकास्पद आहे.


सोहळ्याबाबतची उत्सुकता शिगेला 

भारतातीलच नव्हे तर जगभरातील हिंदूच्या भावनेशी जुळलेल्या राम मंदिर निर्माणाचे काम गेल्या अनेक वर्षाच्या वादानंतर सुरु होणार आहे. कोरोनाच्या सावटाखाली होत असलेला हा भूमिपूजन सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे. भूमिपूजनाचा मूहूर्त जसजसा जवळ येत आहे तसतशी या सोहळ्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचत आहेत. आपण जशी दिवाळी साजरी करतो तसे सध्या अयोध्येत वातावरण निर्माण झाले आहे. घरांना रंगेबीरंग कलर, साफसफाई, दुकानांमध्ये गर्दी तसेच प्रत्येक जण या भूमिपूजनाच्या मुर्हुतावर आनंद साजरा करण्यासाठी जो तो आप आपल्यापरिने तयारी करत आहे. २.७७ एकर जमिनीवर भव्य असे राम मंदिर बांधले जाणार आहे. प्रस्तावित राम मंदिराचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा दहा हजार चौरस फुटांनी जास्त म्हणजे ४७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाऐवजी ५७ हजार चौरस फूट असेल. एकूण पाच शिखरे आणि तीन मजले असलेल्या या मंदिराची उंची १२८ फुटांऐवजी १६१ फूट करण्यात आली आहे. मंदिर परिसराच्या चारही कोपर्‍यांवर सीता, लक्ष्मण, भरत आणि गणेशाची मंदिरे बांधण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्रत्येक मजल्यावर १०६ स्तंभ असे एकूण ३१८ स्तंभ असतील. प्रत्येक स्तंभ साडेचौदा फुटांचा असेल आणि त्यावर १६ मूर्ती कोरल्या जातील. मंदिर निर्मितीसाठी द्वार आणि स्तंभांवरील नक्षीकामाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. तथापि, गर्भगृहाची निर्मिती अद्याप व्हायची आहे. गर्भगृहातच मूर्ती ठेवण्यात येणार आहे. स्तंभ तयार असले तरी गर्भगृहाची तयारी अजून सुरू करण्यात आलेली नाही. आतापर्यंत १०६ स्तंभ तयार झाले असून आणखी १०६ स्तंभावरील नक्षीकाम अजून बाकी आहे. दगडांवरील कोरीव काम सन १९९० पासून सुरू करण्यात आले आहे आणि म्हणूनच यातील बरेचसे काम पूर्वीच झालेले आहे. असे असले तरी किमान तिन वर्ष मंदिर उभारणीसाठी लागण्याची शक्यता आहे. 

कोट्यावधी हिंदूंसाठी राम मंदिर हा श्रद्धेचा विषय

५ ऑगस्ट बुधवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या धार्मिक सोहळ्याची सुरुवात हनुमान गढी मंदिरातील पूजेने करणार आहेत. हनुमाना शिवाय भगवान रामाचे कोणतेही काम सुरु होत नाही, त्यामुळे मोदी अगोदर हनुमानगढी मंदिरात जावून हनुमानाची पूजा करणार आहेत. राम मंदिर आंदोलनातील महत्वाचे चेहरे असलेले लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उभा भारती या भव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडवाणी आणि जोशी दोघेही व्हिडिओ परिषदेच्या माध्यमातून सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. कोट्यावधी हिंदूंसाठी राम मंदिर हा श्रद्धेचा विषय असल्याने संपूर्ण देशात मंगलमय वातावरण निर्माण झाल्याची प्रचिती येवू लागली आहे. या दिवशी घराघरात दिवे लावून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन देखील करण्यात येत आहे. एकीकडे हा आनंदाचा क्षण समिप येत असताना यावरुन होणारे राजकारण व वाद अजूनही संपायचे नाव घेत नाही. या मंदिर-मशीद राजकारणामुळे ८० आणि ९०च्या दशकांत मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच परंतू आता मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जवळ येत असताना यावरुन राजकारण सुरुच आहे. 

विनाकारण होणारे वाद थांबणे गरजेचे

काही दिवसांपूर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी रामाचा जन्म अयोध्येत नसून नेपाळमध्ये झाल्याचा दावा करत नव्या वादाला तोंड फोडले होते. या विषयावरुन राजकारण करणार्‍यांची भारतातही कमी नाही. राम मंदिराच्या मुद्यावरुन काँग्रेसची भुमिका सुरुवातीपासून संशयितच राहिली आहे. एकावेळेला रामाचे अस्तित्वच नाकारणार्‍या काँग्रेसला अचानक रामाचा साक्षात्कार झाला असून अयोध्येत श्रीरामांचे मंदिर व्हावे, ही राजीव गांधीचीही इच्छा होती असा दावा काँग्रेसचे वादग्रस्त नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत भूमिपूजन करणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. काही लोकांना वाटते की मंदिर बांधून कोरोना जाईल, असे म्हणत त्यांनी वादाला तोंड फोडले होते. शरद पवारांसोबत आघाडीत असलेल्या शिवसेनेसाठी अयोध्या हा जिव्हाळ्याचा विषय आहे. उद्धव ठाकरे अलिकडेच पुन्हा अयोध्येत जाऊन आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आघाडीतही अयोध्येमुळे वाद निर्माण होऊ शकतात. हे विनाकारण होणारे वाद थांबणे गरजेचे आहे. याविषयाचा राजकीय संदर्भ २०२४च्या लोकसभा निवडणुकांशी देखील घातला जात आहे. कारण कारण ३ ते साडेतीन वर्षांमध्ये मंदिराचे काम पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या जवळपास ६ महिने आधी राम मंदीर बांधून पूर्ण होऊ शकते. अर्थातच याचा सर्वाधिक फायदा भाजपाला होईल म्हणूनच राम मंदिराच्या भूमिपूजनाची घटिका समिप येत असतानाही हे वाद थांबायचे नाव घेत नाहीत. अर्थात ते  थांबण्याची अपेक्षा करणेही चुकीचे आहे, कारण हे कलयुग आहे.....

Post a Comment

Designed By Blogger