काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर सायबर हल्ला झाला होता. यात अनेक दिग्गज लोकांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही लोकांना सायबर गुन्हेगारी आणि ओळख चोरीपासून (आयडेन्टी थेफ्ट) वाचण्याचा इशारा दिला आहे. आरबीआयने यासंदर्भात ट्विट केले असून सायबर घोटाळ्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्राहकांनी त्यांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी अधिक सतर्क राहायला हवे, असे आरबीआयने म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या ऑनलाईन व्यवहारामुळे तर सायबर गुन्हेगारांसाठी जणू सुवर्ण काळच आला आहे, असे सध्याचे वातावरण आहे. दर दिवशी सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. यात आर्थिक फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. आतापर्यंत शहरी भागातील मध्यम आणि उच्च मध्यम वर्गापर्यंत मर्यादित असणार्या सायबर गुनहेगारांनी आपले हातपाय आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरले आहेत.
जगातील पहिल्या १० देशांमध्ये भारताचा समावेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल होत आहे. २ ऑगस्टपासून देशातील काही राज्यांत आणि अतिगंभीर कोरोनाबाधीत क्षेत्र वगळता अनेक व्यवहार सुरु करण्यात आले आहेत. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळातही सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. फिशिंग, स्पॅमिंग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील यंत्रणांची स्कॅनिंगच्या माध्यमातून महत्वाची माहिती चोरणे, अशा घटनांमध्ये तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात आणि ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती वाढल्याने इंटरनेटवर संशयित सर्फिंगचेही प्रमाण वाढले आहे. हीच संधी साधत सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धती वापरून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करत आहेत. साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे म्हटल्यास, इंटरनेटद्वारे केल्या जाणार्या गैरवापरास ‘सायबर क्राईम’ म्हटले जाते. सायबर हल्ल्यांचा सामना करणार्या जगातील पहिल्या १० देशांमध्ये भारताचाही समावेश होतो. प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये मोबाइल व इंटरनेट आले आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे. परिणामी सोशल मीडियाद्वारे होणार्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्स अॅप व इतर सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केले जात आहेत. गेल्या दीड वर्षांत घडलेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये सोशल मीडियावरून होणार्या गुन्ह्यांचे प्रमाण १६ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.
७० टक्के गुन्हे हे मोबाईलच्या माध्यमातून
आता सायबर क्राईम करणारे गुन्हेगारदेखील अद्ययावत यंत्रणेचा वापर करू लागले आहेत. आपला आयपी ऍड्रेस सापडू नये यासाठी प्रॉक्सी सर्व्हरचा वापर केला जाऊ लागला आहे. एखाद्याची ओळख (आयडेंटी) हॅक करून तिचा वापर सायबर क्राईमसाठी केला जातो. यामुळे सोशल मीडियावरील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. उच्चशिक्षित मंडळीही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. पाठवलेली फसवी लिंक नागरिक कोणताही विचार न करता ओपन करतात. नंतर त्यांची फसवणूक होते. डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याविषयीच्या माहितीबाबत फोन आल्यानंतर नागरिक लगेच समोरच्याला माहिती शेअर करतात. याच माहितीचा वापर करून गुन्हेगार खात्यातील पैशांवर डल्ला मारत असल्याची प्रकरणे नेहमी समोर येतात. यासाठी इंटरनेट वापरताना आपला आयडी क्रमांक, नेट बँकिंग अकाऊंट क्रमांक, आपला आयडी क्रमांक, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट पासवर्ड क्रमांक अथवा आपली वैयक्तिक माहिती उघड करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. ऑनलाईन खरेदी करताना सुरक्षिततेचे उपाय योजावेत. आपली संगणक सिस्टिम अॅन्टीव्हायरस, फायर वॉलने सुरक्षित ठेवावी. स्पॅममेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करुन उघडण्याचा प्रयत्न करू नये. अशा मेलमधून व्हायरस नकळत डाऊनलोड होतो. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लीकेट फाईल तयार होऊन ती हार्ड डिक्सवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेलद्वारे प्राप्त होते. भारतात होणार्या सायबर गुन्ह्यांत जवळपास ७० टक्के गुन्हे हे मोबाईलच्या माध्यमातून होतात. बनावट सीम कार्ड वापरुन हे गुन्हे केले जातात. आता तर ई सिम वापरुन फसवणूकीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे.
नव्या तंत्रज्ञानामुळे सायबर हल्ल्याचे क्षेत्र गुंतागुंतीचे
सध्या बाजारात नवीन प्रकारचे फोन आले आहेत त्यामध्येच ई-सिम असते. सध्या सायबर गुन्हेगार या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी करत आहेत. भारतातच नव्हे तर जगभरात बेरोजगार युवकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कमी श्रमात झटपट पैसे कमावण्याचे अनेक फंडे शोधून नागरिकांच्या पैशावर डल्ला मारण्याचे उद्योग सुरू आहेत. भारत, चीनचे संबध बिघडल्यानंतर चीनकडून भारतातील महत्वाच्या विभागावर, नागरिकांच्या दैंनदिन जीवनावर परिणामकारक ठरतील असे सायबर अॅटॅक होतील, अशी भीती आणि त्याबाबत सुरक्षा घेण्याबाबतचे आवाहन वारंवार करण्यात येते आहे. यासह पाकिस्तानी हॅकर्सनी आरोग्य सेतू अॅप हॅक केल्यानंतरच्या आठवड्यात पंतप्रधान निधीसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र पंतप्रधान सहाय्यता निधी या खात्याच्या नावाची किमान ५०० बनावट खाती तयार झाल्याचे सायबर सुरक्षा विभागाच्या निर्दशनास आले होते. भारत सरकारने सायबर सुरक्षा धोरण २०२० ची आखणी केली आहे. मात्र हे पुरेसे नाही कारण सायबर सुरक्षेबाबतच्या मुद्यावर आपल्याकडे पायाभूत सुविधांमध्ये कमतरता आहे, हे मान्य करावे लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजेंस, अत्याधुनिक यंत्रसामग्री, इंटरनेट-सक्षम साधने आणि प्रचंड माहिती यासारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे सायबर हल्ल्याचे क्षेत्र आता अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे. याकरीता सुरक्षितता, सावधगिरी बाळगून इंटरनेटचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
Post a Comment