व्हर्च्युअल दीक्षांत समारंभ

पदवी प्रदान सोहळ्यात पदवी स्वीकारण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात. मात्र, यंदा करोनामुळे पदवीचे स्वप्न पूर्ण होणार असले तरी, दीक्षांत समारंभात पदवी स्वीकारण्याच्या आयुष्यभर जपून ठेवाव्या, अनुभवाला मात्र लाखों विद्यार्थ्यांना मुकावे लागले आहे. यास अपवाद ठरले आहे, आयआयटी मुंबई! कारण येथील संशोधक प्राध्यापकांनी ‘आभासी वास्तव’ आणि ’कृत्रिम बुद्धिमत्ता’ याचा वापर करून विद्यार्थ्यांना घरबसल्या हा सर्व अनुभव घेता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देत देशातील पहिला व्हच्यूअल रिअ‍ॅलीटी दीक्षांत समारंभ पार पाडला. कोरोना संकटात आयआयटी मुबंईने ५८ वा दीक्षांत समारंभ व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानाद्वारे आयोजित केला. १२५५ पेक्षा जास्त विद्यार्थी घरीच होते आणि त्यांच्या अ‍ॅनिमेटेड रूपाला आभासी मंचावर अ‍ॅनिमेटेड दिग्दर्शक सुभाशिष चौधरी यांच्याकडून पदवी स्वीकारताना बघत होते. प्रमुख पाहुणे नोबेल विजेते डंकन हाल्डेन यांच्या थ्रीडी रूपाने पदक प्रदान केले. विद्यार्थी एका मोबाइल अ‍ॅपद्वारे समारंभात सामील झाले होते. दीक्षांत सोहळा विद्यार्थ्यांच्या आठवणीतील कप्प्यात कायमस्वरूपी राहतो. त्यामुळेच २० तज्ज्ञ विद्यार्थ्यांनी २ महिने तयारी करत हा प्रयोग यशस्वी करुन दाखविला.


आयआयटी मुंबईचा देशात प्रथम प्रयोग

देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना कोणताही सण, समारंभ साजरा करण्यावर प्रचंड बंधने आली आहेत. कोरोनाचा फटका जवळपास सर्वच क्षेत्रांना बसला आहे, अर्थातच यास शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. कोरोना नसता तर एव्हाना नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले असते. मात्र यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. कोरोनामुळे नवे शैक्षणिक वर्ष सुरु करणे तर सोडाच मात्र गत शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत व जर घ्यायच्या तर कशा घ्यायच्या? हा तिढा अद्यापही सुटलेला नाही. जेथे परीक्षा झाल्या आहेत त्यांचा दीक्षांत समारंभ न घेता किंवा ऑनलाईन पध्दतीने समारंभ घेत पदव्या देण्यात आल्या. यामुळे शैक्षणिक जीवनातील सर्वोच्च आनंदाच्या क्षणाला लाखो विद्यार्थी मुकले. परंतू विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक करण्यासाठी आयआयटी मुंबईने व्हर्च्युअल रिअ‍ॅलीटी अर्थात आभासी वास्तव या संकल्पनेचा वापरत करत यंदाचा दीक्षांत समारंभ आभासी वास्तव आणि कृत्रिम बुद्धीमता या पद्धतीने पार पडला. बहुदा देशात प्रथमच असा प्रयोग झाला असल्याने हा व्हर्च्युअल दीक्षांत समारंभ देशभरात चर्चेचा व कौतूकाचा विषय ठरला आहे. या दीक्षांत समारंभाचा विद्यार्थ्यांचा आनंद कुठेही कमी होऊ नये यासाठी अप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांचे हुबेहूब अवतार तयार करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना परिस्थितीत देखील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल दीक्षांत समारंभाचा उत्तम अनुभव मिळाला. 

आभासी वास्तव आणि कृत्रिम बुद्धीमता 

भौतिकशास्त्राचे २०१६ चे नोबेल विजेतेे प्रा. हाल्डेन यांनीही व्हर्च्युअली मार्गदर्शन केले. ते म्हणाले, यातून जगाला शिकायची गरज आहे. बदलत्या वातावरणात भारत नवनवे प्रयोग करत जगासमोर मजबूतपणे ताकद दाखवत आहे, अशा शब्दात त्यांनी या अभिनव प्रयोगाचे कौतूक केले. कोरोनामुळे सर्वत्र ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा वापर केला जात आहे. बहुतांश शाळा-महाविद्यालयांमध्ये लेक्चर ऑनलाईन होत आहेत, मिटिंग्ज झूम किंवा गुगलवर होत आहेत. पण आयआयटी मुंबईने एक पाऊल पुढे टाकत घेतलेला हा व्हच्यूअल रिअ‍ॅलीटी दीक्षांत सोहळा पूर्णपणे वेगळा आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी वारंवार ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’चा उल्लेख केला आहे. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो मात्र भारतात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्यापतरी केवळ मोबाईल व व्हीडीओ गेम्सपुरताच मर्यादित आहे. तांत्रिक भाषेत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे एक कम्प्युटरवर तयार केलेले त्रिमिती वातावरण जे एका व्यक्तिकडून आभासी प्रवासाद्वारे पाहिले आणि अनुभवले जाऊ शकते. हे एक असे तंत्रज्ञान आहे. जे वापरकर्त्याच्या वास्तविक जगावर आभासी वास्तवाच अध्यारोपण करते. हे वापरकर्त्याद्वारे पाहिलेले वास्तविक दृश्य आणि संगणकाद्वारे उत्पन्न केलेल्या आभासी देखावा यांचे संयोजन करते. यामध्ये आवाज, चित्रे आणि इतर गोष्टींचा वापर होतो. ज्यामुळे आपण आपल्या सभोवतालच्या परिसराशी जोडून जातो. या तंत्रज्ञानामुळे वास्तविकता आणि कल्पकता यामधील अंतर अत्यंत अस्पष्ट होते. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे आभासी वास्तविकता. ज्याचा भास होतो की अमुक गोष्ट तिथे आहे पण खरेतर ती नसते! समजा आपण आपल्या घरी ‘व्हच्युअल रिअ‍ॅलिटी’ हेडसेट घालून बसलो आहोत आणि ‘व्हच्युअल रिअ‍ॅलिटी’ हेडसेटमध्ये अमेरिका मधील एखाद्या शहराचे वातावरण दाखवलेले असेल तर आपण घरी असूनसुद्धा अमेरिकेत फेरफटका मारत असल्याचा भास होईल. आपण ज्या बाजूला मान वळवली त्या भागात जे जे आहे ते आपल्याला घर बसल्या दिसेल. आपण मागे पुढे सरकलो तर तिथे आभासी चित्रातही तशीच हालचाल होईल, त्यामुळे आपल्याला अगदी खरोखर तिथे असल्याचा अनुभव येतो.

 शिक्षण व तंत्रज्ञानाची सांगड

 ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ हे एक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे, हे आपण जाणून घ्यायला हवे. सत्याचा आभास म्हणजे ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी.’ ज्या गोष्टी प्रत्यक्ष घडूच नयेत आणि घडल्याच तर त्यांच्यासाठी आपण उत्तम रितीने तयार व्हावे यासाठी ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’चा वापर करायला हवा. ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ने सत्याची अदलाबदल करू नये, तर उलट सत्य स्वीकारण्याची सक्षम ताकद यावी, ही अपेक्षा. तिने दुबळेपणा येता कामा नये. सध्या कोरोनामुळे जे काही बदल घडत आहेत त्यात काही सकारात्मक बदल देखील आहेत. शिक्षण क्षेत्रात या तंत्राचा वापर प्रभावीपणे केल्यास अनेक अडचणी सहज सुटू शकतात. याची दिशा आयआयटी मुंबईने दाखवली आहे. या प्रयोगाबद्दल तेथील प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचे कौतूक करावे तितके कमीच आहे. आयआयटी या भारतातील प्रथितयश संस्थेने नेहमीच काहीतरी वेगळे करुन दाखविण्याचे धाडस दाखविले आहे. कदाचित यामुळेच आयआयटीच्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर मागणी असते. ही मागणी का असते? याचे उत्तर पुन्हा एकदा आयआयटी मुंबईने व्हर्च्युअल दीक्षांत समारंभाच्या माध्यमातून दिले आहे. शिक्षण व तंत्रज्ञानाची सांगड घालणारा हा प्रयोग येथेच सिमित न राहता सर्वदूर पोहचणे आवश्यक आहे. याची ब्लूप्रिंट आता मिळाली आहे. याचा आदर्श घेत अन्य शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही या मार्गावर आपल्यालाही चालता येईल का? याचा विचार करावा, ही अपेक्षा आहे.

Post a Comment

Designed By Blogger