पाकिस्तान एकीकडे स्वत:ला इस्लामचा रक्षक आणि संपूर्ण जगातील मुस्लिमांचा सर्वात मोठा हितचिंतक मानतो. भारतात मुस्लिमांवर कथित अत्याचाराबाबतही पाकिस्तान अधूनमधून बांग ठोकत असतो. भारतामधील मुस्लीम हे जगातील इतर कोणत्याही इस्लामिक देशामध्ये राहणार्या मुस्लिमांपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचे अनेक मुस्लिम देशांमधील (पाकिस्तानसह)मुस्लिम देखील मान्य करतात. तरीही पाकिस्तान आयएसआय व दहशतवादी संघटनांच्या मदतीने भारतासह अनेक देशांमधील मुस्लिमांची डोकी भडकविण्याचे काम करतो. अमेरिका, युरोपसह भारतातल्या मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे बोलणार्या पाकिस्तानने मात्र सीमेच्या बाजूलाच असलेल्या चीनबद्दल मात्र मौन बाळगले आहे. उइगर मुस्लिमांच्या कट्टरतावादामुळे त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर चीन सरकारने अंकुश लावला आहे. आतातर चीनमधील जिनपिंग सरकाने मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचे वास्तव्य असणार्या शिनजियांग प्रांतातील अतुश सुंथग या गावातील एक मशीद पाडून तेथे चक्क सार्वजनिक शौचालय उभारले आहे. तसेच इतर दोन ठिकाणीही मशिदी पाडण्यात आल्या आहेत. याला विरोध तर दुरच मात्र चकारशब्द न काढणार्या पाकिस्तानचा ढोंगी मुस्लिमपे्रमाचा बुरखा फाटला आहे. यामुळे मुस्लिम देशांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन (आयओसी)ने ही पाकिस्तानला लाथाडण्यास सुरुवात केली आहे.
मुस्लिमांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न
जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत इंडोनेशिया हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. इंडोनेशियामध्ये सध्या २१ कोटी मुस्लीम नागरिक आहेत. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर भारत आहे. भारतात सुमारे १९ कोटी ४८ लाख मुस्लीम नागरिक आहेत. तिसर्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. पाकिस्तान हा मुस्लीम बहुलदेश असुनही त्या देशातील मुस्लीम नागरिकांची संख्या भारतापेक्षा कमी आहे. पाकिस्तानात १८ कोटी ४० लाख मुस्लीम नागरिक आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर बांगलादेश आहे तर पाचव्या क्रमांकावर नायजेरिया आहे. पाकिस्तानसह जगभरात अनेक ठिकाणी मुस्लिमांवरील कथित अत्याचारावर नेहमी चर्चा होते मात्र भारतामधील मुस्लीम हे जगातील इतर कोणत्याही इस्लामिक देशामध्ये राहणार्या मुस्लिमांपेक्षा जास्त सुरक्षित मानले जातात. कारण ते ‘भारतिय’ आहेत. भारतात सर्व धर्मिय समभाव मानला जातो हेच भारतिय एकत्मतेचे प्रतिक आहे. मुस्लिमांच्या प्रश्नांवरुन भारतात राजकीय वाक्युध्द बर्याचदा रंगते मात्र भारताच्या एकात्मतेला तडा जावू दिला जात नाही. गेल्या काही दिवसांपासून सीएए, एनआरसी, राम मंदीरसारख्या विषयांवरुन मुस्लिमांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न परकिय शक्तींकडून करण्यात आला. असे प्रयोग शेजारच्या पाकिस्तानमध्ये बसलेल्यांकडून सातत्याने होत असतात. मात्र ७० वर्षात त्यांना यश मिळालेले नाही.
पाकिस्तान : एक दहशतवादी राष्ट्र
मुळात पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र आहे. या देशाने अनेक दहशतवादी टोळ्या पोसल्या आहेत. शेजारी देशांविरुद्ध छुपे युद्ध खेळण्यासाठी पाकिस्तान या टोळ्यांना अब्जावधी रुपये पुरवतो. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर व मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रेहमान लख्वी याच्यासारखे संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेले लोक पाकिस्तानात बिनधास्त राहतात. सरकारच्या मदतीने राजरोस पैसा गोळा करतात व दहशतवादी कारवाया करतात. दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याशी संबंधित निकष पाकिस्तानने पूर्ण केले नसल्यामुळे ‘फायनान्शिअल एक्शन टास्क फोर्स’ने पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केले आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या खूप खराब आहे, यासोबतच आंतरराष्ट्रीय कर्जदात्यांनीही पाकिस्तानला आर्थिक मदत आणि कर्ज देणे कमी केले आहे. पाकिस्तान सारखे देशच खरे इस्लामचे दुश्मन आहेत. हे आता भारतासह जगभरातल्या मुस्लिमांना कळून चुकले आहे. जगात मुस्लिमांचा सर्वात मोठा शत्रू कोणी असेल तर तो चीन आहे. कारण जगाच्या पाठीवर मुस्लिमांवर सर्वात जास्त अन्याय चीनमध्येच होतो. मात्र पाकिस्तान चीनच्या ताटाखालचे मांजर बनले आहे. चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर होणार्या अत्याचाराची माहिती आता जगाला नवी राहिलेली नाही. चीनमध्ये जवळपास २.३ कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. यातले जवळपास १ कोटी उइगर मुस्लिम शिनजियांग प्रांतात राहतात. चीनमधील जिनपिंग सरकाने आता उइगर मुस्लींमांची धार्मिक ओळख मिटवण्यासाठी एक मोहिम सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. याच मोहिमेअंतर्गत उइगर मुस्लीमांच्या धार्मिक विधीवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये अगदी टोपी घालण्यावर तसेच घरात कुराण ठेवण्यावरही सरकारने बंदी घातली आहे. २०१४ मध्ये त्यांना रमजानचा उपवास करण्यासही बंदी घातली होती.
पाकिस्तानला मुस्लिमांशी काही घेणेदेणे नाही
मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचे वास्तव्य असणार्या शिनजियांग प्रांतातील अतुश सुंथग या गावातील एक मशीद पाडून तेथे चक्क सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. तसेच इतर दोन ठिकाणीही मशिदी पाडण्यात आल्या आहेत. रेडिओ फ्री एशियाने यासदर्भातील वृत्त दिले आहे. २०१६ साली मशिदींची संख्या कमी करण्यासाठी आणि कट्टरतावादावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोहीम सुरु केली होती. या मोहिमेच्या नावाखील मोठ्याप्रमाणात मशिदी, दर्गे आणि मुस्लिमांच्या स्मशानभूमी तोडण्यात आल्या आहेत. दुसर्या जागी मशीद पाडून त्या ठिकाणी एक दुकान सुरु करण्यात आले आहे. या दुकानामध्ये सिगारेट आणि दारुची विक्री केली जाते. वॉशिंग्टनमधील उइगर ह्युमन राइट्स प्रोजेक्टने केलेल्या अभ्यासामध्ये २०१६ ते २०१९ दरम्यान शिनजियांगमध्ये १५ हजार मशिदी आणि दर्गे तोडण्यात आल्याचा दावा केला आहे. इतर मुस्लिम देशांनीही याबाबत अजून कोणताही विरोध केलेला नाही. पण पश्चिमेकडच्या मानवाधिकार संघटना याविरोधात आवाज उठवायला लागल्या आहेत. अमेरिकेचे प्रमुख वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने या मुद्द्यावर पहिल्या पानावर फोटो आणि बातमी प्रकाशित केली आहे. मात्र यावर पाकिस्ताने सोईस्कररित्या चूप्पी साधली आहे. यामुळे पाकिस्तानचे मुस्लिमांवरील प्रेम ढोंगी असल्याचे सिध्द होते. पाकिस्तानला मुस्लिमांशी काही घेणेदेणे नाही त्यांना केवळ पैसा महत्त्वाचा आहे, हे पाकिस्तानचा पुळका वाटणार्यांनी शांत डोक्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे.
Post a Comment