काँग्रेस अध्यक्षपदाची भाकरी फिरणार का?

‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का नि पंजावर मारा शिक्का’ या घोषणेने अनेक दशके जनमानसाच्या मनावर गारुड घातले होते. ९०च्या दशकापर्यंत गाव-खेडं ते शहर काँग्रेसवरील ही अपार अंधश्रद्धा, भक्ती अनेकांनी प्रत्येक निवडणुकीवेळी पाहिली आहे. याची प्रचिती अगदी २००४ व २००९च्या लोकसभा निवडणुकांवेळीही आली. पण, अनेक ‘सोनियाचे दिनू’पाहिलेल्या काँग्रेसला २०१४ नंतर लागलेली घरघर, उतरती कळा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. याची कारणमिमांसा व मंथन काँग्रेसमध्ये सुरु असताना राष्ट्रीय नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडे अनेक रथी महाराथी, लढवय्ये नेते असले तरी काँग्रेसला गतवैभव पुन्हा प्राप्त करुन देणारा ‘सेनापती’ हवा आहे, असा सुरु काँग्रेसमधून उमटू लागला आहे. याकरीताच २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. भाजपचा मुकाबला करायचा असेल आणि देशावरील आर्थिक आरिष्ट रोखायचे असेल तर काँग्रेसला उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये समग्र बदल व्हायला हवा. खालच्या स्तरापासून वरपर्यंत नेतृत्वात बदल करण्यात यावा, अशी भूमिका या नेत्यांनी घेतली आहे. सध्यस्थितीत काँग्रेसची अवस्था पाहता ही मागणी रास्त असली तरी काही नेत्यांचे गांधी घराण्यावरील प्रेम पुन्हा एकदा उफाळून आल्याने काँग्रेस अध्यक्षपदाची भाकरी फिरणार का? याचे उत्तर कुणीही देवू शकणार नाही.



राहुल ब्रिगेड विरूद्ध सर्व असा नवा वाद

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. तेंव्हापासून काँग्रेसच्या सेनापतीपदावरुन चर्चा रंगत आहेत. काँग्रेसचा अध्यक्ष बिगर गांधी कुटुंबिय असावा, अशी भूमिका खुद्द प्रियंका गांधी यांनी मांडल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. काँगे्रस पक्षाला गौरवशाली इतिहास आहे. देशाच्या पायाभरणीतही काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे, हे कुणीही नाकारु शकत नाही पण, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपासून लागलेली उतरती कळा काही थांबायला तयार नाही. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची दयनिय अवस्था झाली आहे. असे असताना देशातील सर्वात जून्या व मोठ्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसावा, याचा विचार करायलाही काँगे्रस नेतृत्वाकडे पुरेसा वेळ नसावा, यास मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. सोनिया गांधी यांनी राजीनामा दिल्यास नेतृत्व कोणाकडे असा प्रश्न काँग्रेससमोर आहे. भारतीय जनता पक्ष व संघ परिवाराचा देशात वाढता प्रभाव मान्य करून काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्षांची गरज सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्यानंतर आता राहुल ब्रिगेड विरूद्ध सर्व असा नवा वाद रंगला आहे. 

गांधी घराण्याव्यतिरिक्त व्यक्ती बसविण्याच्या मोहिमेला बळ

पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची सोनिया गांधींकडे मागणी करणार्‍या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा या नेत्यांही पुढाकार घेतला आहे. यात काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, शशी थरूर, मुकूल वासनिक, जितेंद्र प्रसाद, भूपिंदर सिंग हुड्डा, राजेंद्र कौर भट्टल, विरप्पा मोईली, पी. जे. कुरीयन, अजय सिंह, रेणुका चौधरी, राज बब्बर या सारख्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. यामुळे अध्यक्षपदावर गांधी घराण्याव्यतिरिक्त व्यक्ती बसविण्याच्या मोहिमेला बळ मिळाल्यानंतर दुसरीकडे गांधी कुटुंबाशी निष्ठावान असलेले नेते सक्रिय झाले आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी, स्वपक्षिय नेत्यांवर अत्यंत कडवट शब्दात टीका केली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व बोथट करण्याचे काम काही नेते करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी आता अध्यक्षपदाचा हट्ट सोडू नये, असा सल्ला दिला आहे. वस्तूस्थितीचा विचार केल्यास २०१४ व २०१९ मध्ये नरेंद्र मोदींसमोर टिकाव धरू न शकणारी व्यक्ती २०२४ मध्ये यशस्वी होईल अशी अपेक्षा करणेच चूक आहे. यूपीएच्या काळात प्रशासन ढिले पडले. गरिबी, महागाई आणि भ्रष्टाचार वाढत गेले. यातून अनेक आर्थिक पेच निर्माण झाला आणि लोकांमधला असंतोष वाढत गेला. त्याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. 

....तरच काँग्रेसला गतवैभव प्राप्त होवू शकते

खरे तर काँग्रेसने आपल्या इतक्या वर्षांच्या राजकीय अनुभवानुसार यावर व्यावहारिक उत्तर द्यायला हवे होते. पण राहुल गांधी यांना ते जमलेच नाही, हे मान्य करायलाच हवे. अजूनही राहुल गांधी पक्षाची बांधणी करण्याऐवजी उटसुट कोणत्याही मुद्दयावरुन नरेंद्र मोदींवर टीका करत सुटतात. मध्यंतरी त्यांना समजविण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी केल्यानंतरही त्यांनी भुमिका बदललेली नाही. यामुळे राहुल गांधी अध्यक्षपदाला योग्य न्याय देवू शकत नाही, असा एक मतप्रवाह पक्षात दिसून येतो. काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार व्यक्तीशः पुढे येतील किंवा येऊ शकतील अशा कोण व्यक्ती आहेत? यावर उघडपणे चर्चा करण्यास कुणीही तयार होत नाही. खरे तर पक्षाची स्थिती पाहता बंद दरवाज्याआड नवा अध्यक्ष निवडण्यापेक्षा, पक्षातील तरुण व ज्येष्ठांची मते विचारात घेवून सर्वसंमतीने हा तिढा सोडविण्याची आवश्यकता आहे. सर्वच निवडणुकांमधील पीछेहाट हा निव्वळ योगायोग किंवा लाटेच्या राजकारणाचा परिणाम नाही. त्या स्थितीला ते स्वत:च जबाबदार आहेत. आजच्या व्यवहारातले तोडगे काढण्यात आणि बहुसंख्य लोकांना काँग्रेस पटवून देऊ शकले असते, तर आज स्थिती वेगळी दिसली असती, हे मान्य करायलाच हवे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँगेसने कात टाकून पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणे गरजेचे आहे. यासाठी केवळ गांधी कुटुंबाशी निष्ठेचा दिखावा करण्याची आवश्यकता नाही. हा तिढा लवकर सोडविण्याची आवश्यकता आहे कारण यतानव्या अध्यक्षाला स्थिरस्थावर होण्यासाठी काही महिने लागू शकतात. नव्या अध्यक्षांनी पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढत व हुजरेगिरी करणार्‍यांना दूर ठेवले तरच काँग्रेसला गतवैभव प्राप्त होवू शकते.

Post a Comment

Designed By Blogger