‘मेड इन इंडिया’चा चीनमध्ये डंका

पूर्व लडाखमध्ये भारत-चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीनचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या आक्रमक रणनीतीमुळे अमेरिकेसह अनेक देशांनी भारताला उघडपणे पाठिंबा दिला आहे. सीमेवर भारतीय सैनिक चीनला बुलेटने उत्त्तर देत असताना देशात सर्वसामान्यांनी चीनला वॉलेटने उत्त्तर द्यावे, ही संकल्पना मॅगेसेस अ‍ॅवार्ड विजेते संशोधक सोनम वांगचूक यांनी मांडल्यानंतर भारतात चीनी वस्तूंवर बहिष्कारासाठी अभियान वेगाने सुरू झाले आहे. परिणामी चीनच्या उत्पादनांची मागणी घटली आहे. मात्र याचवेळी चीनने भारतीय वस्तूंची जोरदार आयात केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये चीनसाठी भारतीय वस्तूंची निर्यात ७८ टक्के वाढली असल्याची माहिती क्रिसिल रिपोर्टमधून सामोर आली आहे. भारतात बायकॉट चायनाची चळवळ जोर धरत असताना चीनमध्ये वाजणारा मेड इन इंडियाचा डंका निश्‍चितच प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरणारा आहे.



निर्यातीमध्ये ७८ टक्क्यांची वाढ 

क्रिसिलच्या अहवालानुसार जूनमध्ये चीनला निर्यात केल्या जाणार्‍या उत्पादनांमध्ये थोडी थोडकी नव्हे तर ७८ टक्क्यांची वाढ झाली आहे. चीनने कोरोनावर ताबा मिळविला असल्याने तिथे भारतीय वस्तूंची मागणी वाढली असल्याचे व्यापार क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. जुलै महिन्यामध्येही भारतीय वस्तूंना मोठी मागणी राहिलेली आहे. चीनमध्ये ७८ टक्के, मलेशियामध्ये ७६ टक्के, व्हिएतनाम, सिंगापूरमध्ये ३७ टकक्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. अमेरिका, इग्लंड, ब्राझीलसह युरोपियन देश आताही कोरोना संकटाशी सामना करत आहेत. यामुळे तिथे केली जाणारी निर्यात घटली आहे. याचवेळी भारतातून केल्या जाणार्‍या निर्यातीमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी सुधारणा झाली आहे. चीनमध्ये भारतीय वस्तूंच्या निर्यातीचे प्रमुख कारण आयर्न, स्टील, अभ्रक आणि जैविक पदार्थांची मागणी होती. यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय गंगाजळी मिळली आहे. भारताने चीनमधून आयात घटविली असली तरीही निर्यातीमध्ये मोठी वाढ झाली आहे, याला व्यापारीदृष्ट्या खूप महत्व आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय चीनमधून मोठमोठे कंटेनर भरून साहित्य आयात करत होते. स्वस्तात मस्त असणार्‍या चीनी वस्तू घराघरात पोहचल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक वस्तू, मुलांची खेळणी आदी सारे काही चिनी होते. आज कोरोनाने हे पारडेच पालटले आहे. गलवान घाटीतील घटनेनंतर संपूर्ण देशात बायकॉट चायनाची मोहिम सुरु झाली आणि चीनच्या उत्पादनांची मागणी घटली. रेल्वे, बीएसएनएल, हायवे सारख्या सरकारी प्रकल्पांनी चीनसोबतचे कोट्यवधींचे करार मोडून काढले. याचबरोबर सरकारने ३७१ चिनी उत्पादनांवर हळूहळू बंदी आणण्यास सुरुवात केली आहे. यावर कामही केले जात आहे. 

स्वदेशी मोहिमेला बळ

परदेशी वस्तूवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा स्विकार केल्याने मिळालेले फळ किती गोड असते, याची चव आपण सर्वजण १९४७ पासून चाखत आहे. इतिहासाची पाने उलगडून पाहिल्यास इसवी सन १७ व्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारताला ‘सोने कि चिडिया’ असे म्हटले जात होते. कारण आपला देश त्यावेळी जगातील सर्वात मोठा निर्यातदार होता. सर्व बाबतीत आपण समृद्ध होतो. त्या काळी मसाले, सोने, हिरे, कापड आणि मीठ मोठ्या प्रमाणात आपण जगाला निर्यात करत असू. मात्र इंग्रजांच्या राजवटीत हे चित्र पालटले. याची जाणीव झाल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत साधारणपणे १९३० मध्ये परदेशी मालाच्या बहिष्काराचे आंदोलन संपूर्ण देशात पसरले होते. इंग्रजी सत्तेविरोधात स्वदेशीच्या घोषणेलाच शस्त्र बनवणार्‍यांत लोकमान्य टिळक हे अग्रणी होते. इंग्रजी सत्तेविरोधात लढत स्वराज्य प्राप्तीच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी भारतीयांना स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, असा चतुःसूत्री कार्यक्रम दिला होता. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीत स्वदेशी एवढेच महत्व बहिष्कारालाही होते. स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकरांनी केलेली परदेशी कपड्यांची होळी, हे परदेशी वस्तुंवरील बहिष्काराचे जहाल उदाहरण होते. आता पुन्हा एकदा स्वदेशी मोहिमेला बळ मिळतांना दिसत आहे. 

सोशल मीडियावर देशप्रेम दाखविणे पुरेसे नाही

भारतीय बाजारपेठेवर होणार्‍या चीनी आक्रमणावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने ‘मेक इन इंडिया’ ही महत्वकांक्षी योजना सुरु केली आहे. यास बळ देण्याची आवश्यकता असून भारतीय लघुउद्योग उत्पादनालाही चालना देणे आवश्यक आहे. बहुतांश चिनी वस्तू या लघुउद्योगांतून बनविल्या जातात. चिनी स्त्रिया या वस्तू घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अत्यंत कमी असतेे. चिनी वस्तू जर स्वस्तात मिळतात तर आपण त्या वस्तू कशाला बनवायच्या? या विचाराने अनेक भारतीय उद्योजन चिनी वस्तूंचे कंटेनरच्या कंटेनर खरेदी करतात व त्यावर आपले लेबल लावून बाजारात विकतात. यामुळे ते भरपूर पैसे कमावतात पण यामुळे आपण चिनी अर्थव्यवस्थेला हातभार लावतो आहोत, याकडे दुर्लक्ष होत आहे. भावनेच्या भरात वाहून चीनी लायटींग, खेळणी, किरकोळ वस्तूंवर बहिष्कार टाकण्यापेक्षा त्यांचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे लघुउद्योग निर्माण करायला हवेत. त्यासाठी स्वस्तात जागा, भांडवल, कच्चा माल उपलब्ध करून दिले पाहिजे. कर कमी केले पाहिजेत. त्यामुळे आपणसुद्धा दर्जेदार वस्तू बनवू शकू. नागरिक म्हणून फक्त खरेदीदाराच्या भूमिकेत न राहता उत्पादकाच्या भूमिकेत शिरायला हवे. यासाठी भारतीय लघुउद्योग उत्पादनाला चालना देण्याची गरज आहे. तसेच बायकॉट चायना या मोहिमेची व्याप्प्ती अजूनही रस्त्याच्या कडेला मिळणार्‍या किंवा सिग्नलवर विक्री होणार्‍या वस्तूपुरताच मर्यादित आहे. कारण गेल्या तिन महिन्यात एमआय, वनप्लस, विवो, झिओमी या चीन कंपन्यांच्या मालाची विक्रमी विक्री भारतातच झाली आहे. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. बायकॉट चायना मोहिमेत सहभागी होण्यासाठी चीनी कंपन्यांचे मोबाईल फोन वापरून केवळ सोशल मीडियावर देशप्रेम दाखविणे पुरेसे नाही, याची जाण प्रत्येकाने ठेवावी, ही अपेक्षा आहे!

Post a Comment

Designed By Blogger