विघ्नहर्त्या, कोरोनाचे संकट दूर कर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, गणरायाचे मंगलमय वातावरणात शनिवारी सर्वत्र आगमन होत आहे. गणराया हा बुद्धिमत्ता, विद्या आणि समंजसपणाचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यात अफाट सामर्थ्य आहे, पण त्याचा वापर फक्त लोककल्याणासाठी करतो. आजपासून दहा दिवस लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा आनंदोत्सव सुरु राहणार असल्याने विघ्नहर्त्या बाप्पाकडे भरभरुन मागायचे आहे. त्याच्या कृपेमुळे जे जे मिळेल ते ते पदरात पाडून घ्यायचे आहे. बाप्पाकडे काही मागायचे असेल तर केवळ घरापुरता नव्हे तर राज्य, देश व संपुर्ण जगासाठी मागितले तरी गणराया नाही म्हणणार नाही! देवा तुच बनविलेल्या या पृथ्वीवर काय सुरु आहे, हे तुला दिसत असेलच, देवा आज संकटे चहुबाजूने आली असल्यासारखे भासत आहे. कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी मानवामुळे! सध्या गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे त्रस्त आहे. या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. लाखो जणांचा जीव घेतला तर कोट्यावधी जणांना उद्ध्वस्त केले आहे. यावर जगभरातले शास्त्रज्ञ यावर औषध शोधत आहे मात्र त्यात अद्यापही यश मिळालेले नाही. आता बाप्पा तुच वाचव...


सर्व संकटांच्या मालिकांपासून तुच वाचव 

राज्यातील गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून एकही सण किंवा उत्सव साजरा झालेला नाही. यामुळे गणेशोत्सव देखील साध्यापध्दतीने साजरा करण्याचा निर्णय बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतला आहे. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण तर आहेच मात्र दुसरीकडे अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अनेकांचे रोजगार गेल्याने देशात बेरोजगारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. अनेक वस्तुंचा तुटवडा निर्माण होवून महागाईदेखील वाढली आहे. कोरोनाचे संकट काय कमी होते म्हणून आता राज्यात कोल्हापूर, कोकणसह देशात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. तिकडे भारत-चीन सीमेवर तणाव कमी व्हायचे नाव घेत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील उलथापालथींमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत असल्याचे त्याचे हादरे देशाच्या अर्थव्यवस्थेला बसत आहेत. विघ्नहर्त्या या सर्व संकटांच्या मालिकांपासून तुच वाचव रे... देशाचे माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २०२० मध्ये भारताला महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविले होते. मात्र महासत्ता होणे तर दूरच परंतू सर्वसामान्यांना होणारा ‘महात्रास’ हा असह्य होवू लागला आहे. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याचे स्वप्न दाखवले होते. पण देशाचा जीडीपी अत्यंत निचांकी पातळीपर्यंत घसरला आहे. 

बाप्पा तुझंही डोकं दुखायला लागेल

देवा आज भारताने पृथ्वीवरुन थेट चंद्र व मंगळावर उडी मारली आहे. अवकाश तंत्रज्ञानाबाबतीत भारताला आज अमेरिका, इंग्लंड, रशिया या देशांच्या पंक्तीत बसण्याची संधी मिळाली आहे. मात्र देशापुढील अनेक आव्हाने आजही कायम आहेत. लोकसंख्या, गरिबी, स्वच्छता, भ्रष्टाचार, स्त्रियांंवरील अत्याचार अशा अनेक समस्या आजही तशाच आहेत. बाप्पा आता तुला नुसतीच गार्‍हाणी सांगून उपयोग नाही. तू म्हणशील मी आलो नाही तर यांनी आपली गार्हाणी सुरू केली पण बाप्पा संकटमोचक म्हणून आम्ही तुझा धावा नाही करायचा तर कुणाचा करायचा? वाढत्या महागाईसह गरिबी आणि बेरोजगारी हे असेच काही प्रश्न आहेत. सरकारे येतात आणि जातात, प्रश्न मात्र तिथेच राहतात. राजकारण मात्र सर्रास सुरू राहते. त्यात मरतो तो गरीब! या राजकारण्यांना सुबुद्धी देशील का विनायका? सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याच्या खोलात शिरलास तर देवा तुझेही डोके ठणकायला लागेल. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. येथील डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचार्‍यासह अनेक कोरोना योध्दे बॅटल फिल्डवर लढत आहेत. यातील अनेकांना कोरोनामुळे स्वत:चा जीव देखील गमवावा लागला आहे. या कोरोना योध्यांना कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशी रसद पुरवली जात आहे का? त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे का? त्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण केली जात आहेत? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधतांना बाप्पा तुझंही डोकं दुखायला लागेल. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गरजेपेक्षा जास्त फॉर्मात (मस्तीत) असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाशी हातमिळवणी केली. या तिनचाकी रिक्षा नेमके कोण चालवतयं हेच समजत नाही. त्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तर सध्या कहरच चालविला आहे. त्यांच्या भुमिका म्हणजे ग्रेट कॉमेडी सर्कस देखील फिकी पडेल, अशी झाली आहे. मात्र यामुळे बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक कन्फ्यूज झालेला दिसत आहे. 

देवा सर्वांना सुबुद्धी दे

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूमुळे मुंबई पोलिसांची भुमिकाच संशयाच्या भोवर्‍यात आली आहे. सरकार व पोलीस नेकमे कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, हेच समजत नाही. बाप्पा तु सर्वांना बुध्दी देतो, या सर्व राजकारण्यांनाही थोडीशी बुध्दी दे गणराया. कारण प्रत्येक विषयावर सत्ताधारी व विराधी पक्षांमध्ये होणार्‍या राजकारणामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांकडे आजही दुर्लक्ष होत आहेत किंबहुना करण्यात येत आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. देशाची परिस्थिती यापेक्षा फारशी वेगळी नाही. गरिबांचे पोट भरणे, अशिक्षितांच्या मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देणे अशा पायाभूत सुविधांकडे कुणाचे लक्ष जात नाही. महिलांवरील अत्याचारांनी तर कळस गाठला आहे. स्त्रियांवरील अत्याचार, दलितांवरचे अत्याचार हे रोखायला हवेत. देशातील आर्थिक संकट व विषमता विषमता संपवण्यासाठी काही तरी ठोस करण्याची बुद्धी लाभावी हीच इच्छा! काळ्या पैशाने कधीही चांगली कामे होऊ शकत नाहीत, हे त्या लोकांना कुणी तरी सांगायला हवे. तिकडे शेजारच्या चीन आणि पाकलाही थोडी बुद्धी दे, ज्या देशाने चंद्रापर्यंत मजल मारली, ज्याचे सैन्यबळ जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्या देशाला युद्ध करणे मोठी गोष्ट नाही मात्र युद्धाने प्रश्‍न सुटतील का? यासाठी त्यांच्या डोक्यात थोडा प्रकाश टाक. तूर्त गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झाला आहे. मोरया, मोरयाचा गजर सुरू झाला आहे. ढोल-झांज-लेझीम पथके नाद करू लागली आहेत. बाप्पा आता तू चागला १० दिवस मुक्काम करणार आहेस आणि तू बुध्दीचा देवता आहेस. हा सण धार्मिकतेपेक्षा सांस्कृतिक, सामाजिक आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक बंध मजबूत करणारा आहे. देवा सर्वांना सुबुद्धी दे. सौख्य, समाधान दे आणि राष्ट्रीय भावनेने, सद्विचाराने अवघा समाज समरस होऊ दे हीच एक अपेक्षा आहे.

Post a Comment

Designed By Blogger