स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी अचानक महेंद्रसिंग धोनीने ‘आज संध्याकाळी सात वाजून २९ मिनिटांनी मी निवृत्त झालो आहे, असे समजा’ अशा आशयाचे ट्विट केले. सोबत ‘मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी हस्ती है’ या गाण्यावर क्रिकेट प्रवासाचा उलगडत जाणारा एका फोटो अल्बम सोशल मीडियावर टाकत कोणाच्या ध्यानीमनी नसताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार, भारताचा सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक, २००७ मध्ये टी-ट्वेंटी विश्वकरंडक, २०११मध्ये एकदिवसीय क्रिकेटचा विश्वकरंडक आणि २०१३ या वर्षी ‘चँपियन्स ट्रॉफी’ जिंकणारा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव कर्णधार आणि आयपीएलमध्येही एक यशस्वी कर्णधार अशी धोनीची बहुपैलू ओळख आहे. भारतीय क्रिकेट संघात तुफानी वेग आणि ऊर्जा आणण्याचे श्रेय ‘बेस्ट फिनिशर’ म्हणून नावाजलेल्या कर्णधार धोनीलाच द्यावे लागेल. मैदानात डोकं शांत ठेवून धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखल्य जाणार्या ‘कॅप्टन कूल’ने निवृत्तीचा धाडसी निर्णय त्याने शांततेच घेतला.
खरगपूरच्या स्टेशन ते क्रिकेट
क्रिकेटसाठी वेड्या असणार्या भारतात स्टार खेळाडूला देवत्व बहाल करण्यात येते. जो खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या लढतीतच शून्यावर बाद होतो, पुढील तिन सामने धावांसाठी चाचपडतो तो खेळाडू सचिन, द्रविड, गांगुली, सेहवाग यासारख्या खेळाडूंच्या मांदियाळीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करेल आणि कोट्यवधी भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनेल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. मात्र हि किमया साध्य करुन दाखवली ती महेंद्रसिंग धोनीने. रांचीसारख्या लहान शहरातून आलेला व रेल्वे खात्यात तिकीट तपासनीस म्हणून खरगपूरच्या स्टेशनात तिकिटे गोळा करणारा हा तरुण भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च शिखर गाठेल, याचा कुणी विचार देखील केला नसेल. धोनीच्या कारकीर्दीचा, नेतृत्वगुणांचा धांडोळा त्याच्या राजस अलिप्ततेची दखल घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. विजयाचा उन्माद नाही नि पराभवाचा विषाद नाही. सातत्याने मेहनत करणे आणि आपल्याविषयी उपस्थित होणार्या प्रश्नांना मैदानात खेळातूनच प्रत्युत्तर देणे हा तो आदर्श. कसोटी, वन-डे आणि टी-२० तिन्ही प्रकारातील धोनीची धावांची सरासरी बोलकी आहे. यष्टिमागे घेतलेले झेल आणि स्टम्पिंग करण्याची लालसा पाहिल्यास धोनीच्या शरीराच्या लवचिकतेची कल्पना येते. भारतीय क्रिकेटमध्ये कुणीही यष्टिरक्षक-फलंदाज धोनीची ही आकडेवारी स्वत:पुरते आव्हान म्हणून स्वीकारू शकणार नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात धोनी प्रचंड फॉर्मात होता. हेलिकॉप्टर शॉटच्या अनोख्या शैलीमुळे धोनीने चाहत्यांची मने जिंकली. फलंदाजी असो किंवा यष्टीरक्षण प्रत्येक बाबतीत धोनीने आपला दर्जा उंचावून ठेवला होता.
लढत जिंकणारा ‘फिनिशर’
२००४मध्ये बांगलादेशच्या दौर्यावर आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या लढतीतच तो बिचारा धावचीत होऊन शून्यावर परतला. पुढील तिन सामन्यांमध्ये धावा काढण्यासाठी त्याची धडपड संपूर्ण जगाने पाहिली पण श्रीलंकेविरुद्ध दहा षटकारासह १८३ धावा ठोकताच एका स्टार खेळाडूचा जन्म झाला. तिथून पुढे सुरू झाले, ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासातले एक विजयपर्व होते. याच तरुणाच्या समर्थ आणि समंजस नेतृत्वाखाली पुढे भारतीय संघाने २००७ मध्ये टी-ट्वेंटी विश्वकरंडक उचलला. २०११मध्ये एकदिवसीय क्रिकेटचा विश्वकरंडक खेचून घेतला, आणि २०१३ या वर्षी ‘चँपियन्स ट्रॉफी’ जिंकली. २००९मध्ये भारतीय संघ जगात अव्वल स्थानावर आला. ९० कसोटी सामने, साडेतीनशे एकदिवसीय लढती आणि ९८ ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटच्या झुंजी ही धोनीच्या सोळा वर्षांच्या कारकिर्दींतली जमापुंजी आहे. अत्यंत भरवशाचा फलंदाज, निष्णात यष्टिरक्षक, धूर्त चाली रचणारा कर्णधार, सहकार्यांना प्रेरित करणारा आणि कठीण प्रसंगीदेखील धीरोदात्तपणे लढत जिंकणारा ‘फिनिशर’ अशा कितीतरी भूमिकांमध्ये धोनी वावरला. धोनीने व्यावसायिक क्रिकेट लीगमध्येही आपली कॅप्टन कूल ही इमेज कायम राखली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सूपर किंग्ज संघाचे नेतृत्व करताना त्याने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये त्याने आयपीएल ट्रॉफीवर चेन्नईचे नाव कोरले. तसेच चॅम्पियन्स लीग टी-२० मध्येही २०१० आणि २०१४ चे जेतेपद चेन्नईला जिंकून दिले आहे. गेल्या वर्षभरापासून धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु होती. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीला टीकाही सहन करावी लागली. वर्षभरासाठी धोनी भारतीय संघाबाहेर होता. पण गेली अनेक वर्ष भारतीय संघाचा भार आपल्या खांद्यावर वाहणार्या धोनीने कोणताही गाजावाजा न करता, कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीसाठी प्रयत्न न करता निवृत्त व्हायचे ठरवले व तशी घोषणाही केली.
आजवरचा सर्वोत्तम कर्णधार
आत्तापर्यंतच्या सवोर्र्कृष्ट यष्टिरक्षक व यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. कुमार संगकारा, अॅन्डी फ्लॉवर, ब्रेंडन मॅक्युलम, अॅडम गिलख्रिस्ट हे आधुनिक क्रिकेटमधील काही शानदार यष्टिरक्षक-फलंदाज आहेत. तथापि तटस्थ नजरेतून पाहिल्यास धोनीने या सर्वच दिग्गजांना मागे टाकले आहे. धोनीच्या तुलनेत संगकारा, मॅक्युलम आणि फ्लॉवर हे अल्पकाळ कर्णधार होते. कर्णधार या नात्याने धोनी दडपणासह परिस्थितीला सामोरा जायचा. त्याने भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून दिली. आयसीसीच्या तिन्ही महत्त्वपूर्ण ट्रॉफीचे जेतेपद पटकावणे अभूतपूर्व कामगिरी म्हणावी लागेल. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो, धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत. त्याची आजवरची कारकिर्द पाहता धोनी कधीच प्रसिध्दीसाठी खेळला नाही, तो खेळला फक्त देशासाठी. आजवरचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून त्याचा नावलौकिक आहे, त्याने ठरवले असते तर निवृत्तीचा सामना खेळून मोठा गाजावाजा करत तो निवृत्त झाला असता. परंतू निवृत्तीसाठी त्याने देशाच्या स्वातंत्र्यदिनाची निवड केली, यावरुन त्याचे देशप्रेम दिसून येते. धोनीची कोणतीही गोष्ट नॉर्मल नव्हती. त्याची विकेट किपींग, त्याची हेअर स्टाइल, त्याचा हेलिकॉप्टर शॉट, फिटनेस, कोणत्याही परिस्थितीत डोक शांत ठेवण्याची क्षमता, डीएसआरएल घेण्याची निर्णय असो या सर्व गोष्टीत धोनी वेगळा होता. आता त्याची निवृत्ती देखील नॉर्मल नव्हती. धोनीला मैदानाबाहेरील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा!
Post a Comment