एक स्वर्गीय सूर हरपला

गेली आठ दशके भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर ‘मार्तंड’ बनून अखंड तळपणारे मेवाती घराण्याचे गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचा सोमवारी इहलोकाचा प्रवास संपला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला होता. तर राज्यशासनाने पंडित भीमसेन जोशी गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या संगीत कलेचा गौरव केला आहे. मेवाती घराणे ख्याल गायकीसाठी प्रख्यात आहे. या घराण्याची परंपरा पुढे नेत पंडित जसराज यांनी ख्याल गायकीत त्यांनी तरलता आणली. त्यात ठुमरीचा समावेश करून अधिक सहज बनवली. त्यामुळे अभिजान शास्त्रीय संगीताकडे सर्वसामान्य श्रोते आकर्षित झाले. सुमधुर आवाजाची देणगी मिळालेले पंडित जसराज यांनी भारतीय संगीतासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतले होते. संघर्ष, मेहनत आणि रियाझ यातून भारतीय संगीत सृष्टीला त्यांनी योगदान दिले. भारतीय संगीत आणि पंडित जसराज हे जणू समीकरणच झाले होते. नादमधुरस्वर हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते. त्यांनी आपल्या स्वरांनी संगीताला वेगळी उंची प्राप्त करुन दिली आहे. पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातला तारा निखळला आहे.



संगीत क्षेत्रातील पथदर्शी क्रांतिकारी

२८ जानेवारी १९३० मध्ये जन्मलेल्या पंडित जसराज यांना संगीताचा वारसा लाभला होता. त्यांचा जन्मच अशा कुटुंबात झाला ज्याच्या चार पिढ्या संगीत साधनेत होत्या. जसराज हे जेव्हा चार वर्षांचे होते त्यांच्या वडिलांचे म्हणजे पंडित मोतीराम यांचे निधन झाले. त्यानंतर मोठे भाऊ पंडित मणिराम यांनीच जसराज यांची जबाबदारी घेतली आणि त्यांना लहानाचे मोठे केले. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. पंडित जसराज यांचा पंडित जसराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षांपासून गायनाला सुरुवात केली. लहान वयात गानतपस्या करून त्यांनी गाण्यावर प्रभूत्व मिळवले. २२ व्या वर्षी पहिला स्टेज शो केला. पंडित जसराज यांनी स्वरांच्या साडेतीन सप्तकांत फिरणारे आणि ‘जसरंगी जुगलबंदी’ या आगळ्यावेगळ्या गायन प्रकाराचे योगदान संगीत क्षेत्राला दिले. आपल्या दैवी स्वरांनी भारतीय शास्त्रीय संगीत आसमंतात नेतानाच त्यांनी ते जनसामान्यांपर्यंत पोचवले. पंडित जसराज यांचा आवाज म्हणजे अलौकीक प्रार्थनेचा सूर बनला आणि तोच सामान्य रसिकांच्या हृदयात विराजमान झाला आहे. ठुमरी ते ख्याल पर्यंत सर्व प्रकारच्या अभिजात संगीत प्रकारांमध्ये त्यांनी सुलभता आणली. अर्ध्या दशकापूर्वी ख्याल गायकीमध्ये अशाप्रकारचा बदल करणे शास्त्रीय संगीतातील विश्‍वामध्ये निंदनीय मानले जात असे. मात्र पंडीत. जसराज यांनी त्यातील क्लिष्टता काढून टाकल्यामुळे श्रोत्यांनी ही गायकी प्रेमाने स्वीकारली. आपल्या गाण्यात ते अन्य घराण्याच्या गायकीचा समावेश करत असल्याबद्दल सुरवातीच्या काळात सनातनी संगीतकारांकडून त्यांच्यावर टीका होत असे. मात्र अन्य गायकीतील अनेक भाव उचलण्याची ही प्रथा आता सर्रास वापरली जाते. त्या दृष्टीने ते संगीत क्षेत्रातील पथदर्शी क्रांतिकारीच होते.

जगभरातील सूरांना शास्त्रीय संगीतामध्ये गुंफले

पुरूष आणि स्त्री गायकांच्या एकाच वेळी भिन्न राग म्हणण्याची जुगलबंदी जसरंगी या नावाने त्यांनी सुरू केली आहे. संगीतातील नव्या प्रवाहांचा तसेच नावीन्यपूर्ण संकल्पनांचा त्यांनी सकारात्मक दृष्टीने स्वीकार केला. संगीताच्या क्षेत्रात त्यांनी विविध प्रकारांवर संशोधन केलेले आहे. विशेषत: हवेली संगीतावर त्यांनी खूप काम केले. हवेली संगित प्रामुख्याने मंदिरांमधून गायले जाते, त्यांनी ते मंचावरील शास्त्रीय गायनात आणले. असे अनेक नवनवीन ध÷ाडसी प्रयोग त्यांनी केले आहेत. हरियाणात जन्मलेल्या जसराज यांचे महाराष्ट्राशी अधिक ऋणानुबंध होते. त्यांची पत्नी मधुरा मराठी आहेत. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा शांताराम यांच्याशी १९६२ मध्ये त्यांचा विवाह झाला. पंडित जसराज यांनी मराठी गीतेही गायली आहेत. पंडित जसराज यांनी केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील सूरांना शास्त्रीय संगीतामध्ये गुंफले. त्यांनी अनेक शिष्य घडवले, अगदी अमेरिका आणि कॅनडा येथेही त्यांचे शिष्य आहेत. त्यात अनेक नामवंत शास्त्रीय गायकांचा समावेश आहे. सप्तर्षी चक्रवर्ती, संजीव अभ्यंकर, कला रामनाथन, तृप्ती मुखर्जी, सुमन घोष, शशांक सुब्रह्मण्यम, अनुराधा पौडवाल, साधना सरगम आणि रमेश नारायणन आदींचा त्यात समावेश आहे. ऍटलांटा, टम्पा, व्हॅनकोव्हर, टोरँटो, न्यूयॉर्क, न्यू जर्सी, पिटसबर्ग आणि मुंबईत त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शिकवणारी विद्यालये सुरू केली. 

त्यांचा सूर अमर

शास्त्रीय गायनाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणार्‍या पंडित जसराज यांच्या नावाने एक ग्रहही अंतराळात आहे. आंतरराष्ट्रीय खगोल संघाने मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या मधे असलेल्या एका ग्रहाचे नाव पंडित जसराज असे ठेवले आहे. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय कलावंत ठरले. मंगळ आणि गुरु यांच्या मधे असलेला एक लहान ग्रह २००६ व्हिडी ३२ असा आहे. या ग्रहाचा शोध २००६ मध्ये लागला होता. या ग्रहाला पंडित जसराज यांचे नाव देण्यात आले. आपल्या गायनातून श्रोत्यांना ईश्वर अनुभूती देणारे, देश-विदेशातल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे पंडितजी हे संगीत क्षेत्रातले गान गुरु होते. वाढत्या वयातदेखील न थकता संगीतसाधणा करणार्‍या पंडित जसराज यांनी २०१२ मध्ये वयाच्या ८२व्या वर्षी अंटार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवावर आपल्या संगीताचे सादरीकरण केले होते. यामुळे पृथ्वीसोबतच सातही खंडामध्ये आपला कार्यक्रम सादर करणारे ते पहिले भारतीय ठरले होते. शास्त्रीय गायनासाठी त्यांना आजपर्यंत अनेक सन्मान, पुरस्कार मिळाले आहेत. पंडित जसराज हे गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबासह अमेरिकेतच राहत होते. न्युजर्सी येथे वास्तव्यास असलेले पंडितजी काही दिवसांपासून आजारीच होते. आज त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असली तरी पुढच्या अनेक पिढ्यासाठी ते खूप काही देवून गेले आहेत. त्यांचा सूर अमर आहे. 




Post a Comment

Designed By Blogger