पवार विरुध्द पवार

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवारांचे चांगलेच कान उपटले. पार्थ पवारांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारले. कुटुंबातील वाद बंद दाराआडच मिटवणारे पवार कुटुंबातील भीष्माचार्य शरद पवार यांनी प्रथमच जाहीररित्या इतक्या आक्रमक पध्दतीने मत व्यक्त केल्याने राजकीय धुराळा उडणे अपेक्षितच आहे. राज्याच्या राजकारणात विशेषत: पवार कुटुंबियांमध्ये शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. त्यामुळे ‘मोठे साहेब’ जे सांगतिल त्यावर अमंलबजावणी करण्याची जबाबदारी घरातील व्यक्तींची असते व प्रत्येकवेळी ती होत देखील आली आहे. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून पवार कुटुंबातील कलह अधूनमधून बाहेर येवू लागला आहे. तिसर्‍या पिढीने राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर अनेक वेळा पवार विरुध्द पवार असा सामना रंगतांना दिसत आहे. 


अजित आणि शरद पवार यांच्यात असंतोषाची ठिणगी

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मुत्स्द्दी राजकारणी म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. त्यांचा दबदबा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्ली दरबारीही दिसून येतो. पवार कुटुंबाच्या पहिल्या पिढीत एकटे शरद पवार राजकारणात आल्याने त्यांच्या कुटुंबात कोणताही कलह निर्माण झाला नाही. दुसर्‍या पिढीत मात्र, पुतण्या अजित पवारांसोबत शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे देखील राजकारणात उतरल्या. पण तिथेही पवारांनी सुप्रियाताई दिल्लीत तर अजितदादा राज्यात अशी राजकीय वाटणी करून दिली. त्यामुळे या दोन्ही बहीण भावांमध्ये जाहीररित्या वाद झाल्याचे ऐकवित नाही. या बहिणभावाचे जमलेले राजकीय ट्यूनिंग हा अनेकवेळा चर्चेचा विषय ठरतो. पण जेव्हा कुटुबांची तिसरी पिढी म्हणजेच पवारांचे नातू राजकारणात उतरले आणि तिथून पुढेच खर्‍या अर्थाने पवार घराण्यात राजकीय धुसफूस सुरू झाल्याचे दिसून येते. याचा पहिला अंक लिहिला गेला तो लोकसभा निवडणुकीवेळी! लोकसभा निवडणूकीच्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्याकडून त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात आला. याप्रश्नी त्यांनी आधी पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्ष आणि घरच्या पातळीवर हा प्रश्न सुटल्याने पार्थच्या उमेदवारीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच एकाच घरात किती उमेदवारी द्यायची असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी प्रचार काळात शरद पवारांनी मावळमध्ये फक्त एकदाच प्रचार सभा घेतली. दुसर्‍या बाजूला अजित पवार यांनी मावळमध्ये आपली सगळी ताकद पणाला लावली. परंतु पार्थ पवारांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या ईडी चौकशी प्रकरणावेळी अजित पवारांनी अचानक राजीनामा दिला होता. पवार कुटुंबातील कलहामुळेच हा राजीनामा दिल्याचे चित्र त्या वेळी रंगवण्यात आले. नंतर शरद पवारांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते. येथूनच अजित आणि शरद पवार यांच्यात अलीकडील असंतोषाची ठिणगी पडली होती. पुत्र पार्थ यांचा पराभव झाल्याचाही राग अजित पवार यांच्या मनात आहे. 

अजित पवारनिष्ठ आणि शरद पवारांचे निष्ठावान असे गट 

विधानसभा निवडणुकीनंतर पहाटेच्या सरकारमध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी छुपी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. नंतर हा गोंधळ मिटवताना शरद पवार यांना जो त्रास झाला त्यातूनही अजित आणि शरद पवार यांच्यातील दरी वाढल्याचे दिसून येते. दुसरिकडे शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार मोठ्या सफाईदारपणे राजकारणात पुढे जाताना दिसत आहे. शरद पवारही रोहित यांना सोबत घेऊन फिरू लागल्याने रोहित आणि पार्थची तुलना होऊ लागली आणि तिथूनच पवार कुटुंबात कलह वाढू लागला. पवार कुटुंबातील ही तिसरी पिढी राजकीय मैदानात उतरल्यानंतर खरा वारसदार कोण? यावर चर्चा सुरु झाली आहे. अजितदादांचे पुत्र पार्थ यांचा लोकसभेत पद्धतशीरपणे पराभव करण्यात आला, असे मानणारा एक गट आहे. रोहित यांना विधानसभेत निवडून आणण्यासाठी खास ताकद लावण्यात आल्याचे मानणारा दुसरा गट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी असल्याचे उघडपणे कोणी बोलत नसले तरी अजित पवारनिष्ठ आणि शरद पवारांचे निष्ठावान असे गट असल्याचे आजवरच्या घटनांवरून दिसले आहे. यास फोडणी देण्याचे काम पार्थ पवार करताना दिसत आहेत. अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळी पार्थ यांनी जय श्रीराम असे ट्विट केले होते की, ‘हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापाशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत’. त्यानंतर पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे ट्विट केले होते. एवढ्यावर न थांबता पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत, सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी. संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची हीच भावना आहे. यामुळे राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केली. 

राष्ट्रवादीला अडचणीत आणणार्‍या भूमिका 

पार्थ पवारांच्या या दोन्ही भूमिका राष्ट्रवादीला अडचणीत आणणार्‍या होत्या. यागोष्टीमुळे पवार कुटुंबियांमध्ये वैचारीक आणि राजकिय दरी वाढत चालल्याचे दिसून येते. गेल्या लोकसभा निवडणूकीत पार्थ यांना उमेदवारी देताना शरद पवारांनी पहिल्यांदा जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दुसर्‍यांदा आता पुन्हा एकदा जाहीरपणे तो अपरिपक्व असल्याची टिपण्णी करत त्याचे बोलण्याला कवडीची किंमत देत नसल्याचे सांगत पार्थ पवार यांना नगण्य मानत असल्याचे जाहीर संकेत दिल्याने हा खरा राग पार्थ यांच्यावर आहे का अजित पवारांवर? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होणे अपेक्षितच आहे. आजोबा व नातवाच्या या मतभेदांमध्ये तेल ओतण्याचे काम भाजपाकडून पध्दतशिरपणे केले जात आहे. विशेषत: निलेश राणे यांनी या पुढाकार घेतल्याचे दिसून येते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. शरद पवार हे राजकारणात तेल लावलेले पहिलवान म्हणून ओळखले जातात आतापर्यंत त्यांनी भल्या भल्यांना धोबीपछाड दिली आहे, आता कुटुंबाच्या आखाड्यात कोणता डाव ते टाकतात, याची उत्सुकता सर्वांना आहे.


Post a Comment

Designed By Blogger