राफेलमुळे चीन, पाकिस्तानला धडकी

जगात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु आहे तर दुसरीकडे भारताचे शेजारील राष्ट्र हे घुसखोरी आणि दहशतवादी कृत्याला खतपानी घालताना दिसत आहे. गलवान सीमेवरील रक्तरंजिंत सघंर्षानंतर मागील काही दिवसांपासून चीनसोबत भारताचे संबंध अत्यंत तणावपूर्ण असल्याचे पाहायला मिळत आहे. जल, जमीन आणि आकाशातील युध्दासाठी चीनची ताकद मोठी असली तरी आतापर्यंत प्रत्येक आघाडीवर भारताने चीनला जोरदार टक्कर दिली आहे. चीनसोबतच्या युध्दज्वराच्या परिस्थितीत भारतीय वायू सेनेला राफेल फायटर जेटच्या रुपाने मोठी ताकद मिळणार आहे. भारतात येण्यासाठी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल लढाऊ विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा तळ असेल. राफेलच्या भारतात येण्यामुळे शेजारील राष्ट्रांना घाम फुटला असेल, हे सांगण्यासाठी कुण्या तज्ञाची आवश्यकता नाही.


अत्याधुनिक लढाऊ विमानांची गरज

भारतीय वायुदलाला गौरवशाली परंपरा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी आपल्या वायुदलाकडे लढाऊ विमानांच्या ११ तुकड्या होत्या. फाळणीनंतर साडेसहा तुकड्या भारतात राहिल्या तर साडेतीन तुकड्या पाकिस्तानकडे गेल्या. त्यावेळी ही सर्व लढावू विमाने दुसर्‍या महायुध्दाच्य वेळेची ब्रिटिश विमाने होती. वायुदलाचे सामर्थ्य ओळखून याला सर्वशक्तीशाली करण्यासाठी अत्याधूनिक तंत्रज्ञानाची कास धरत व काळाची गरज ओळखत नव नवी विमाने भारतीय वायुदलात भरती करण्यात आली. सध्यस्थितीत भारतीय हवाई दलात विविध प्रकारची एकूण ८१४ लढाऊ विमाने आहेत. यात प्रामुख्याने सुखोई, तेजस, मिग व जग्वारचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सुखोई-३०एमकेआय हे हवाई दलाचे असे लढाऊ विमान आहे, जे २१ व्या शतकाच्या गरजेनुसार बनवले आहे. स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे विमान नुकतेच हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. तर भारतीय हवाई दलाचे दोन इंजिने असलेले जग्वार हे छोटे लढाऊ विमान आहे. हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे विमान आहे. भारतीय हवाई दलातील जग्वार ही महत्त्वाची विमाने आहेत. मिग ही हवाई दलाची भिस्त असणारी लढाऊ विमाने निवृत्तीच्या मार्गावर असताना त्यांची जागा भरून काढण्यासाठी विविध क्षमतांच्या आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांची गरज आहे. 

वायूसेनेचा दबदबा  वाढला

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड़यांवर एकाच वेळी लढण्यासाठी हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वॉड्रन अर्थात प्रत्येकी १८ ते २० विमाने आवश्यक आहेत. सध्या त्यांची संख्या ३१ वर आली आहे. ही दरी भरून काढण्यासाठी मध्यम आकाराची, बहुउद्देशीय लढाऊ विमाने तातडीने घेण्याची गरज आहे हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कार्यकाळात जाणवले. हाच धागा पकडत यूपीए सरकारने २००७ साली जगातील सहा विमाननिर्मिती कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले. जानेवारी २०१२ मध्ये राफेल या विमानाची निवड अंतिम झाली. कराराच्या अटींसंदर्भात दोन्ही देशांत एकमत होत नव्हते. नोव्हेंबर २०१४ मध्ये मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्रिपदी आले. दसाँ कंपनी करारातील वादग्रस्त मुद्यांबाबत कोणतेच ठाम वचन देत नसल्याने २०१५ साली जुना करार बासनात गुंडाळण्यात आला. एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौर्‍यात ३६ राफेल विमाने थेट फ्रान्स सरकारच्या मार्फत तातडीने विकत घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. जानेवारी २०१६ मध्ये दोन्ही देशांत राफेल विमान खरेदीबाबत सामंजस्य करार झाला. राफेल खरेदीवरुन भारतीय राजकारणात मोठा धुराळा देखील उठला होता. मात्र शेजारील चीन व पाकिस्तान अधून मधून कुरापती काढत असल्याने राफेलसारख्या घातक ब्रम्हास्त्राची गरज होती ती आता पूर्ण झाली आहे. वार्‍याप्रमाणे गतिमान असणारे व ब्राम्हास्त्राप्रमाणे घातक असलेले राफेल भारताच्या बलाढ्या वायूसेनेत सामिल झाल्याने आता वायूसेनेचा दबदबा अधिकच वाढला आहे. 

अक्साई चीन, तिबेट, पाकिस्तान आणि पीओके राफेलच्या टप्प्यात

राफेल हे दोन इंजिन असलेले अनेक कामे करू शकणारे मध्यम आकाराचे लढाऊ विमान आहे. लांब असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या दृष्टीने या विमानांची निर्मिती करण्यात आली आहे. हवेतून मारा करणे, हवेतल्या हवेत इंधन भरणे, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणे त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता ही राफेलची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे राफेलची चर्चा नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असते. राफेलची खासियत म्हणजे हे जेट रनवेवर शॉर्ट टेकऑफ करू शकते आणि या लढाऊ विमानाला रनवेवर फार जास्त धावण्याची गरज नसते. एकदा हे जेट आकाशात पोहोचले तर यावर नजर ठेवणे फार कठिण होऊन बसते. हे जेट दुश्मनांच्या रडारला एका क्षणात चमका देऊ शकते. राफेलमध्ये चार प्रकारचे मिसाइल आहेत. हॅमर मिसाइल, स्क्लॅप मिसाइल, माइका आणि मेट्योर मिसाइल हे चारही मिसाइल फार घातक आहेत. स्क्लॅप मिसाइल आणि हॅमर मिसाइल गाइडेड मिसाइल आहेत. हे हवेतून जमिनीवर हल्ला करू शकतात. हे दोन्ही मिसाइल फायर केल्यावरही कंट्रोल केले जाऊ शकतात. चीनच्या सेनेकडे एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम आहे. राफेल या सिस्टीमलाही चमका देऊ शकते. त्यामुळे भारतात दाखल होणारे राफेल लढाऊ विमान हे चीन कडील सीमा रेषेवर तैनात केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राफेल लडाखसारख्या भागात फार फायदेशीर आहे. हे जेट खासकरून डोंगरांमध्ये लढण्यासाठीच डिझाइन करण्यात आले आहे आणि वेगाने रस्तेही बदलू शकते. जर राफेल हल्ल्याच्या रेंजबाबत सांगायचे तर अंबालामध्ये तैनात केल्यावर याचा फार फायदा होईल. राफेल अटॅकची जी रेंज आहे ती साधारण १७०० किलोमीटरच्या घरात असते. अंबाला ते लडाखचे अंतर साधारण ४३० किलोमीटरचे आहे. हे अंतर फार जास्त वाटत असले तरी सुपरसॉनिक विमानासाठी हे फार कमी अंतर आहे. याचा अर्थ हा आहे की लढाऊ विमान आणि त्यातील हत्यार या सर्कलमध्ये कुठेही दुश्मनाला मारू शकतात. या सर्कलमध्ये पूर्व लडाख, चीनने कब्जा केलेला अक्साई चीन, तिबेट, पाकिस्तान आणि पीओके आहे. हा संपूर्ण भूभाग राफेलच्या टप्प्यात येणार असल्याने पाकिस्तान व चीनला धास्ती वाटणे स्वाभाविकच आहे.

Post a Comment

Designed By Blogger