इसिसच्या निशाण्यावर भारत!

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटनेमुळे इराक आणि सीरिया गेली कित्येक वर्ष नरकयातना भोगत आहेत. या दोन्ही देशांमध्ये इसिसच्या दहशवाद्यांनी रक्ताचे पाट सांडले. त्यांची कृरता अशी की, मृत्यूलाही भय वाटत असावे! भारतापासून हे दोन्ही देश शेकडो मैल दूर असले तरी हा धोका आता भारताच्याही उंबरठ्यावर येवून पोहचला आहे. ही संघटना आपले जाळे भारतीय तरुणांवर टाकत असल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरुन दिसून येते. केरळ आणि कर्नाटकमध्ये आयसीसच्या दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अ‍ॅनालिटिकल सपोर्ट अँड सँक्शन्स मॉनिटरिंग टीम’ या अहवालात देण्यात आला आहे. भारतीय उपखंडात अल कायदा ही दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारचे १५० ते २०० दहशतवादी असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे.


 इसिसच्या नव्या मॉड्युलचा खुलासा

सिरिया, इराक व युरोपीय देशांमध्ये निर्घृण आणि अमानुष हिंसाचारा घडवणार्‍या इसिसने आता आशियामध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. आशियामध्ये मुख्यत्वे करून भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या चार देशांकडे इसिसचे लक्ष आहे. या चारही देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि तेथे गरिबीचे, बेरोजगारीचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे येथे जाळे विणणे सोपे आहे, अशी इसिसची अटकळ आहे. इसिसचा भारतात प्रवेश सुरुवातील केवळ काश्मीरपुरता मर्यादित मानला जात होता. काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेल्या दगडफेकी दरम्यान इसिसचे काळे झेंडे अनेकवेळा फडकवल्या गेल्याने त्यास पुष्टी मिळाली. मात्र त्यानंतर गेल्यावर्षी कल्याणचे चार तरुण इराकमध्ये जावून इसिस मध्ये सहगाभी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या. त्यानंतर इसिसचा ट्विटर हँडलर बंगळुरू मधून जेरबंद झाला. तो बंगळुरूमध्ये बसून ट्विटरद्वारे लोकांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करायचा. या सर्व घडामोडींचा तपास प्राथमिक अवस्थेत असताना इसिसचा भारतातील प्रवक्ता बनण्यास निघालेल्या नवी मुंबईतील जुबेर खानला महाराष्ट्र एटीएसने दिल्लीत अटक केली होती. मराठवाड्यातून पकडलेल्या तरुणांकडे स्फोटकेही सापडली होती. गेल्या वर्षी राष्ट्रीय चौकशी समिती (एनआयए) द्वारे दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या वेगवेगळ्या भागांतून इसिसशी संबंधित १० संदिग्ध आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून इसिसच्या नव्या मॉड्युलचाही खुलासा झाला होता. अयोध्या स्थित राम जन्मभूमीवर इसिसचे दहशतवादी आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तविण्यात आली होती. हा सर्व घटनाक्रम पाहता इसिस भारतात आपले जाळे तयार करत असल्याचे उघड झाले होते.

इसिसला रोखणे भारतासमोरील मोठे आव्हान

भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची आयएसआय जैश ए मोहम्मद आणि इसिसला जवळ करत असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर विभागाने काही महिन्यांपुर्वीच गृहमंत्रालयाला दिला होता. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करावे असा ठराव संयुक्त राष्ट्र संघात भारतातर्फे मांडला गेल्यानंतर भारतात दहशतवादी घडमोडी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. भारतातील तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न या संघटनेकडून वेळोवेळी करण्यात येतो. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर सुरक्षा दलाने काहींना ताब्यात घेतले असले तरी ही फळी मोठ्याप्रमाणात वाढत चालली आहे, असे तरी सध्याच्या घटनाक्रमावरुन दिसून येते. त्यामुळे इसिसला रोखणे हे भारतासमोरील मोठे आव्हान आहे. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाने भारताची चिंता निश्‍चितपणे वाढवली आहे. भारतीय उपखंडात अल-कायदा (क्यूआयएस) तालिबानच्या मदतीने निमरूज, हेलमंद आणि कंधारमधून आपल्या कारवाया करत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात इसिसने भारतात नवा प्रांत स्थापित करण्याचा दावा केला होता. काश्मीरमधील दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर संघटनेने ही घोषणा केली होती. यापूर्वी या दशतवादी संघटनेने आपल्या नव्या शाखेचे नाव अरबी नाव ‘विलायह ऑफ हिंद’ असल्याचे अमाक या वृत्तसंस्थेद्वारे सांगितले होते. यापूर्वी, काश्मीरमध्ये इसिसचे हल्ले त्याच्या तथाकथित खोरासन प्रांत शाखेशी जोडले गेले होते. ज्याची स्थापना २०१५ मध्ये करण्यात आली होती आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आसपासच्या प्रदेश हे त्यांचे लक्ष्य होते. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले झाले होते. या इंडियन मुजाहिद्दीन संघटनेने आपली बांधिलकी इसिसशी जाहीर केली आहे. यामुळे संयुक्त राष्ट्राच्या अहवालाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 

तरुण वर्गात इसिसविषयी वाढणारे आकर्षण चिंतेची बाब

अन्य दहशतवादी संघटनांपेक्षा सिसिसचे भारातातील ऑपरेशन मॉडेल थोडेसे वेगळे दिसून येते. युरोपिय देशांप्रमाणे रक्तपात न घडविता ही संघटना फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअ‍ॅप, युट्यूब यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रसार करण्यास प्राधान्य देत आहे. कदाचित हे त्यांचे प्राथमिक धोरण असल्याचे नाकारता येणार नाही. भारतामध्ये सुशिक्षित आणि माहिती-तंत्रज्ञानाची जाण असणार्‍या मुस्लिमांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष भारताकडे अधिक आहे. सुदैवाने एक चांगली गोष्ट म्हणजे देशभरात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुस्लिम समुदायाकडून संघटितरित्या इसिसला विरोध केला जातो. अनेक पालक इसिसविषयीचे आकर्षण वाटणार्‍या आपल्या पाल्यासंदर्भात स्वतःहून पुढे येऊन पोलिसांना माहिती देत आहेत. यामुळे इसिसचे मनसुबे अद्यापतरी पूर्ण झालेले नाही. जगभरातील मुस्लिम राष्ट्रातील मुस्लिमांशी तुलना करता भारतातील मुस्लिम सुरक्षित आहे. भारतामध्ये मुस्लिमांना सर्व पातळीवर समान राजकीय अधिकार व स्वातंत्र्य दिले गेलेले आहेत. यामुळे येथील मुस्लिम इसिसच्या आहारी जाणार नाही मात्र असे असले तरी तरुण वर्गात इसिसविषयी वाढणारे आकर्षण ही चिंतेची बाब आहे. सध्या भारताला इसिसचा धोका अत्यल्प असला तरी भविष्यात तो वाढणार आहे हे नाकारून चालणार नाही. 

Post a Comment

Designed By Blogger