अंतराळावर युध्दाचे ढग

संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत आहे. या जीवघेण्या विषाणूला रोखण्यासाठी लस हा एकमेव पर्याय असल्याने जगभरातील शास्त्रज्ञ लोकांचे जीव वाचविण्यासाठी लस विकसित करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. कोरोना विरुध्दच्या लढाईत अपेक्षित यश दृष्टीक्षेपात दिसत असले तरी पुढची लढाई सोपी नाही, याची जाणीव संपूर्ण जगाला आहे. पृथ्वीवरील या युध्दाची बित्तंबातमी आपण घेत असलो तरी अवकाशातील एका युध्दाबाबत अनेकजण अद्यापही अनभिज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर संवेदनशिल असलेल्या दोन घटना गेल्या आठवडाभरात घडल्या आहेत. चीनच्या ‘तियानवेन १’ मिशनतंर्गत हैनान येथील तळावरुन गेल्या शनिवारी लाँग मार्च ५ रॉकेट ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर घेऊन मंगळाच्या दिशेने झेपावले. लाँग मार्च ५ चीनचे सर्वात शक्तीशाली रॉकेट आहे. चीन पाठोपाठ अमेरिकाही ३० जुलैला मंगळावर रोव्हर पाठवणार आहे. ही तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी मजल मानली जात असली तरी दुसरी घटना थोडीशी चिंताजनक आहे. चीन आणि रशिया एकत्रितपणे अंतराळात युद्ध सुरू करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप जपानने केला आहे. जपानच्या एका उपग्रहाजवळ चीन आणि रशियाचे किलर सॅटेलाइट आढळले आहेत. रशियाने अंतराळात एक सॅटेलाईट शस्त्रासारखी वस्तू तयार केली असल्याचा आरोप ब्रिटन आणि अमेरिका यांनीही केला आहे.


पृथ्वीवर सुरु असलेली स्पर्धा आता अवकाशातही

अंतराळ कार्याचा विकास आणि अंतराळ संशोधन यावरून देशाची व्यापक क्षमता दिसते. सर्वच जण याचे महत्व जाणून असल्याने अमेरिका, चीन, रशिया, भारतासह अन्य देशांची अंतराळात चढाओढीची स्पर्धा आता नवी राहिलेली नाही. या क्षेत्रात इस्त्रोच्या कामगिरीमुळे भारताचा मोठा दबदबा निर्माण झाला आहे. भारताची मंगळयान मोहिम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्यानंतर अनेक देशांच्या भुवया उंचावल्या होत्या. मंगळ ग्रहाच्या संशोधनात जास्त जोखीम असली तरी अनेक देश यात सक्रीय आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ आहे आणि तिथले वातावरण पृथ्वीसारखे आहे. यामुळे मंगळावर जीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता असल्याने या संशोधानात चढाओढ सुरु असते. आजवर अमेरिका, सोव्हिएत संघ, जपान, युरोपच्या अंतराळ संस्थांनी आणि भारताने डिटेक्टर्स मंगळावर पोहोचवले आहेत. तसेच अमेरिका आणि सोव्हिएत संघाने मंगळावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. आत्तापर्यंत फक्त अमेरिकेने मंगळावर प्रवास आणि निरीक्षण केले आहे. आता चीनने देखील मंगळावर स्वारी केली आहे. चीनने २३ जुलैला तियानवेन-१चे सफल प्रक्षेपण केले. ही मोहीम सफल झाल्यास पहिल्याच मोहिमेत मंगळावर सॉफ्ट लँडिंग पूर्ण करणाचा चीन हा पहिलाच देश ठरेल. या मोहिमेद्वारे मंगळावरील मातीचा अभ्यास करण्याची योजना आहे. अमेरिकादेखील ३० जुलै रोजी मार्स रोव्हर अवकाशात सोडेल असा अंदाज आहे. १९९० पासून अमेरिकेने आतापर्यंत मंगळावर चार रोव्हर पाठवले आहेत. चीनच्या आधी संयुक्त अरब अमिरातींनी २० जुलै रोजी मार्स रोव्हर अवकाशात सोडला. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले. अरब जगतातील कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती. ‘अल अमल’ मंगळाच्या कक्षेत भ्रमण करणार आहे. या देशांच्या मंगळस्वारीमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये पृथ्वीवर सुरु असलेली स्पर्धा आता अवकाशातही पाहायला मिळणार आहे. 

मंगळग्रहाचे मानवाच्या दृष्टीने महत्व 

मंगळावर पाणी आणि वायूमंडळ असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. प्रामुख्याने कार्बनडाय ऑक्साईड असलेले हे वायूमंडळ पृथ्वीपेक्षा वेगळे आहे, पण आपण तंत्रज्ञानाने या कार्बनडाय ऑक्साईडमधून प्राणवायू काढून घेऊ शकतो. यामुळे लोक श्वासोश्वास घेऊ शकतात, तसेच इंधने तयार करू शकतात. यामुळे भविष्यात यंत्रमानव किंवा मानव मंगळ ग्रहावर वास्तव्य करू शकतील, असे मानले जाते. याकरिता स्पेक्स एक्सचे सीईओ एलन मस्क यांनी एक कोटी लोकांना मंगळावर नेण्याचा दावा आधीच केला आहे. यावरुन मंगळग्रहाचे मानवाच्या दृष्टीने महत्व लक्षात येते. या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी दुसरी घटना चिंताजनक आहे. रशियाने अंतराळात एक सॅटेलाईट शस्त्रासारखी वस्तू तयार केली आहे. ब्रिटनच्या अंतराळ संचालनालयाचे प्रमुख एअरव्हाईस मार्शल हार्वे स्मिथ यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारची कृती अंतराळातील शांततेचा भंग करते. पूर्ण अंतराळात नुकसान होऊ शकते. या घटनेने अंतराळात शस्त्रास्त्राची नवी स्पर्धा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अन्य देशही अशी चाचणी करू शकतात. 

विनाशाच्या दिशेने तर नाही ना?

२०१८ मध्येच अमेरिकेने याबाबत काळजी व्यक्त केली होती. चीन आणि रशिया एकत्रितपणे अंतराळात युद्ध सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे अनेकवेळा म्हटले गेले आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा जपानला आली आहे. जपानच्या एका उपग्रहाजवळ चीन आणि रशियाचे किलर सॅटेलाइट आढळले आहेत. जपानच्या अधिकार्‍यांच्या मते, चीन आणि रशियाचे सॅटेलाइट्स जपानच्या लष्करी सॅटेलाइटच्या जवळ आले आहेत. त्याबाबत जपानने अमेरिकेला याची माहिती दिली आहे. चीन आणि रशिया या देशाच्या सॅटेलाइट्च्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जपानकडे यंत्रणा नाही. त्यामुळे त्यांनी अमेरिकेची मदत घेतली आहे. या सॅटेलाइट्सच्या मदतीने जपान गुप्त माहिती मिळवते. रशियन उपग्रह अंतराळांमध्ये शत्रू देशाच्या उपग्रहाला निष्क्रिय अथवा नष्ट करण्याचा सराव अभ्यास करत असल्याचा आरोप अमेरिकेने या आधीही केला आहे. अमेरिकेत जगातील सर्वाधिक गुप्तहेर उपग्रह आहेत. या उपग्रहांच्या मदतीने अमेरिका इतर देशातील गुप्त माहिती आणि हालचालींवर लक्ष ठेवत आहे. यापैकी काही उपग्रहांना रशिया अथवा चीनने नष्ट केल्यास युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेचे मोठे नुकसान होऊ शकते. चीनकडेही अंतराळात मारा करण्याची क्षमता अधिक आहे. जमिनीतून हवेत डागता येणारे अ‍ॅण्टी सॅटेलाइट मिसाइल आणि लेझर गन चीनने विकसित केले आहे. भारताकडेदेखील अ‍ॅण्टी सॅटेलाइट मिसाइल आहेत. मार्च २०१९ मध्ये भारताने याची चाचणी घेत एका निष्क्रिय उपग्रहाचा वेध घेतला होता. अंतराळात वर्चस्व तयार करण्याची ही स्पर्धात्मक चढाओढ मानव जातीला विनाशाच्या दिशेने तर नेत नाही ना? याचाही विचार सर्व देशांनी करण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger