सोनेरी झळाळी

कोरोना आणि लॉकडाऊनसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरात चढउतार सुरू आहेत. भारतात प्रति तोळे ५० हजाराच्यावर जात सोन्याच्या दराने नवा विक्रम स्थापित केला आहे. जळगावमध्येही प्रतितोळे ५२ हजार रुपये दर नोंदविण्यात आला आहे. सोन्याचे दर अजून किती वर जातील, सांगणे कठीण असले तरी सध्याची पातळी पाहता सोन्याच्या दराची घोडदौड अशीच सुरु राहण्याचा तज्ञांचा अंदाज आहे. प्राचीन काळापासूनच सोने हे अनिश्चिततेपासून वाचण्याचे तसेच महागाईचा सामना करणारे साधन मानले जाते. सध्याच्या परिस्थितीत भारतासोबतच वैश्विक अर्थव्यवस्थाही कठीण काळातून जाते आहे. आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार आहे. अशा संकटसमयी सर्व क्षेत्रातील व्यवसाय थंडावस्थेत असताना गेल्या सहा महिन्यात २० टक्यांहून अधिक परतावा देणारे के वळ सोने हेच गुंतवणूक माध्यम ठरले आहे. सोन्याबरोबरच चांदीची मूल्य कामगिरी पिवळ्या धातूला मागे टाकणारी ठरली आहे. यापूर्वी एक तोळे सोने व एक किलो चांदीचा दर जवळपास समान पातळीवर होता. मात्र त्यात पुन्हा आता १० हजार रुपयांहून अधिक फरक नोंदला गेला आहे. 


सुरक्षित आणि पारंपरिक गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती

भारतात सोन्याचे प्रचंड आकर्षण आहे. प्रतिष्ठा, हौस, गुंतवणूक अशा विविध कारणांनी सोन्याची मोठ्याप्रमाणात खरेदी केली जाते. महिलावर्गात सोन्याविषयी खास आकर्षण दिसून येते. आतापर्यंत लग्न किंवा अन्य धार्मिक कार्यक्रमांना सोन्याच्या खरेदीचा मुहूर्त पाहिला जायचा मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्व आले आहे. चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. आता सोने म्हणजेच संपत्ती असेही समजले जाते. अर्थव्यवस्था संकटात सापडते तेव्हा सोन्याचे भाव वर जातात. अर्थव्यवस्थेची मंदी, मोठमोठे घोटाळे, परचक्र अशा काळात शेअर्स, बाँड्स व इतर मालमत्तांचे भाव कोसळतात. मात्र, जेवढी अनिश्चितता जास्त, तेवढा सोन्याचा भाव अधिक, असे सोन्याच्या दराचे आजवरचे गणित राहिले आहे. अमेरिका आणि भारत हे दोन देश असे आहेत जिथे सरकारी तिजोरीत सोन्याचे प्रमाण जास्त आहे. सोन्याच्या दरातील स्थैर्यामुळे सोन्याला सरकारी तिजोरीत हे स्थान आहे. बाहेरच्या देशातून कुठलाही माल आयात करताना आपल्याकडच्या सोन्याचा उपयोग होतो. सध्या अमेरिका व भारतासह जगभराची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक अवस्थेतून जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी चलन - डॉलर कमकुवत झाल्याने तसेच टाळेबंदीत सुरक्षित पर्याय म्हणून ग्राहकांचा खरेदी ओघ वाढल्याने मौल्यवान धातूच्या दरांनी जवळपास दशकातील विक्रमी टप्पा गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मूल्य वेगाने खाली गेल्याने सोने प्रति औन्स १,९५० डॉलरपुढे गेले. अमेरिकेच्या बाजारात २००८ च्या आर्थिक अरिष्टादरम्यानही अनुभवला गेला होता. त्याचीत पुनरावृत्ती आता होतांना दिसत आहे. करोना-टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक चिंतेपोटी मौल्यवान धातूकडे गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिले जात असलेला ओघ सोने तसेच चांदीला त्यांच्या अनोख्या दरटप्प्यापुढे घेऊन गेला. सुरक्षित आणि पारंपरिक गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती मिळत आहे. सोन्याने ९ वर्षांचा तर चांदीने सात वर्षांहून अधिक कालावधीचा विक्रम नोंदविला आहे. सोने-चांदीचे दर येत्या काही दिवसांमध्ये आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेचा परिणाम निश्चित आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. 

सोन्याचे दागिने म्हणजे सोन्यातील गुंतवणूक नव्हे

जागतिक अस्थिरता अजून कमी झालेली नाही आणि आपल्या देशाच्या चलनाची म्हणजेच रुपयाची किंमतसुद्धा स्थिरावली नाही. अर्थव्यवस्था किती खाली जाणार आहे याबद्दल सगळेच साशंक आहेत, टाळेबंदी कधी संपणार हेसुद्धा कळत नाही, करोनाचे आकडे अजून किती दिवस असे वाढणार आणि त्याचा प्रादुर्भाव कसा कमी होणार, ही मोठी चिंता बर्‍याच देशांना सतावत आहे. या संकटकाळी सर्वसामान्य गुंतवणूकदार प्रचंड धास्तावलेले आहेत. कारण बँकासह सर्व प्रकारच्या बचतींवरचे व्याजदर तिन ते चार टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. अशात पारंपरिक गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे बघणारी मंडळी आजचा भाव बघून खूश आहेत. चालू - २०२० वर्षांत सोन्याने २८ टक्के  परतावा दिला आहे. तर चांदीबाबत हे प्रमाण अधिक, ३३ टक्के  आहे. मुंबईच्या सराफा बाजारात चांदीचा दर गेल्या तीन दिवसातच किलोमागे तब्बल ८,५०० रुपयांनी वधारला आहे. दिवसाच्या व्यवहारातील सोन्यातील १ टक्के पेक्षा चांदीच्या दरातील झेप अधिक, ६ टक्के राहिली आहे. टाळेबंदी शिथिल होत असताना औद्योगिक - उत्पादन निर्मिती हालचाल पूर्वपदावर येण्याच्या आशेने भारतातील वायदेमंचावर चांदीचे दर किलोसाठी थेट ६ टक्यांहून अधिक वाढली आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता हे सोन्याच्या दरवाढीमाचे प्रमुख कारण आहे. अडचणीच्या काळात सोनेच उपयोगी पडते ही मानसिकता निव्वळ भारतीयांची नसून जगभरातील गुंतवणूकदारांची आहे. येणार्‍या काळात अडचणी आणखी वाढतील या भितीने गुंतवणूकदार सोने खरेदी करत सुटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढून त्या परिणाम सोन्याचे दर वाढण्यावर झाला आहे. भारतातील सोन्याच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात कारण आपण सोने आयात करतो. आपल्याकडे सोने फारसे निर्माण होत नाही. मात्र चीन पाठोपाठ भारत हा जगभरातील सोन्याचा दुसर्‍या क्रमांकाचा ग्राहक आहे. आपल्याकडील सोन्याचे खरेदीदार मात्र सोन्याकडे गुंतवणूक म्हणून न पाहता लग्न व सण समारंभांच्या निमित्ताने करावयाची दागिन्यांची खरेदी या स्वरुपात पाहतात. त्यामुळेच हे सोने बहुतांशी घरच्या तिजोरीत बंदिस्तच राहते. याबद्दल आपल्याकडचे अर्थतज्ज्ञ वेळोवेळी चिंताही व्यक्त करीत आले आहेत. परंतु ते काहीही असले तरी सोन्याचे दर वाढणे ही भारतीयांसाठी सोनेरीवार्ता आहे. सोन-चांदीसारख्या मौल्यवान धातूंची खरेदी ही आजही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. असे असले तरी सोन्याचा अंतर्भाव गुंतवणुकीत केला म्हणून सोन्याच्या दागिनाप्रेमींनी हुरळून जाऊ नये. सोन्याचे दागिने म्हणजे सोन्यातील गुंतवणूक नव्हे. गुंतवणुकीची व्याख्या समजून घेतली तर सोन्याचे दागिने व सोन्यातील गुंतवणूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या अस्थिरतेच्या काळात दागिने न घेता, सोन्याचे ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड हे उपयुक्त पर्याय आहेत. 

Post a Comment

Designed By Blogger