समुह संसर्गाच्या मार्गावर!

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ हजार ७२० रुग्ण आढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. २५ ते ३० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. असे असतानाही देशात सामूहिक संसर्ग नसल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. मात्र करोनाबाधितांच्या संख्येत रोज होणारी प्रचंड वाढ लक्षात घेता हा करोनाच्या सामूहिक संसर्गाचा परिणाम आहे, असे स्पष्ट निरीक्षण इंडियन मेडिकल असोसिएशनने नोंदवले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन ही वैद्यकीय व्यावसायिकांची स्वतंत्र शिखर संस्था आहे. तिची विश्वासार्हता आहे. अशा संस्थेच्या मताकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.


अनेक जिल्ह्यांत प्रसार वेगाने

करोना रुग्णांच्या संख्येत जागतिक पातळीवर भारत आज तिसर्‍या स्थानावर असून भारतातील करोना रुग्णांची संख्या १२ लाखा पेक्षा अधिक झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, जळगाव, औरंगाबाद, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत, त्याचप्रमाणे तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश अशा राज्यांतही अनेक जिल्ह्यांत या आजाराचा प्रसार वेगाने होऊन, खूप मोठ्या संख्येने बाधित असलेले व्यक्तीसमूह निर्माण झालेले आहेत. या व्यक्तीसमूहांकडून आणखी मोठ्या प्रमाणात इतरांना आजाराचा संसर्ग होऊन करोनाच्या रुग्णवाढीच्या संख्येत मोठी भर पडत आहे. करोनाग्रस्तांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी दर दहा लाख लोकसंख्येच्या प्रमाणात भारतातील रुग्णांचे प्रमाण कमीच असल्याचे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केंद्रीय पातळीवरून सुरू आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचा व मृत्यूदर कमी झाल्याच्या आकडेवारीचे दाखले देऊन करोनाचे गांभीर्य कमी करण्याचाही प्रयत्न केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे केला जात आहे. नागरिकांमध्ये घबराहट पसरु नये, हा यामागचा उद्देश आहे, असे मानले तरी विक्रमी वेगाने वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. भारताची वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असलेली आयसीएमआर मात्र अजून हा सामूहिक संसर्ग आहे, ही बाब मान्य करायला तयार नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कात न येताही एखाद्या व्यक्तीला कोरोना होतो, संसर्ग नेमका कोठून आणि कसा झाला हे कळत नाही ती स्थिती समूह संसर्गाची मानली जाते. 

कोंबडे झाकून ठेवले, तरी सूर्य उगवायचे थोडेच थांबणार आहे?

सुरुवातीला शहरी भागापुरता मर्यादित असलेल्या कोरोनाने आता देशातील ग्रामीण भागातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. सामूहिक संसर्गाचा मुद्दा अजून सोप्या भाषेत मांडायचा म्हटल्यास, बाधित झालेल्या व्यक्तीपासून जेव्हा इतर निरोगी व्यक्तींना त्या विषाणूची लागण होते त्याला संसर्ग म्हणतात. हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो त्याला त्या आजाराची साथ म्हणतात. कोणत्याही साथीमध्ये सुरुवातीला एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला त्याची लागण होते, त्याला व्यक्तीगत प्रसार म्हणतात. या व्यक्तीगत प्रसारात एखाद्या व्यक्तीला नव्याने लागण झाली, तर ती कुणापासून झाली हे समजू शकते. म्हणजे रोगाच्या संक्रमणाचा मागोवा घेतला जाऊ शकतो. ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली, तर संसर्ग झालेल्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आढळतात. यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तींना नक्की कोणापासून तो आजार उद्भवला याचा मागोवा घेता येत नाही. आजार नक्की कोणत्या विवक्षित व्यक्तीकडून झाला हे समजणे अशक्यप्राय होऊन बसते. यालाच सामूहिक संसर्ग अर्थात ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’ असे म्हटले जाते. सध्या भारतात विक्रमी वेगाने वाढणारी रुग्णांची संख्या सामूहिक संसर्गाचाचे स्पष्ट संकेत देत आहेत. आयएमएच्या दाव्या आधी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, आसाम सरकारचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनीही आपआपल्या राज्यांमध्ये करोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचे संकेत दिले होते. देशात सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचा सर्वांना अनुभवायला येत आहे, पण त्यावर केंद्र सरकार का पांघरूण घालतेय, याची अनेक कारणे असू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी होईल, लोकांमध्ये घबराट पसरेल, आरोग्य यंत्रणा कोलमडून पडेल, सरकारवर अपयशीपणाचा शिक्का बसेल, याची भीती वाटत असली तरी कोंबडे झाकून ठेवले, तरी सूर्य उगवायचे थोडेच थांबणार आहे?

देशातील आरोग्य सुविधांचा फेरआढावा घेण्याची गरज

महाराष्ट्रात व देशात रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर पोहचली असली तरी, करोना हाताळणीच्या संबंधात अजून मोठ्या प्रमाणात बेपर्वाईच दिसून येत आहे. प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लॉकडाऊनसंदर्भात धरसोडीचे धोरण आणि नागरिकांमध्ये दिसणारी बेफिकीर वृत्ती, ही कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची कारणे आहेत. नियोजनात त्रुटी राहू शकतात, मात्र निदर्शनास आल्यानंतरदेखील त्या अमान्य करणे, ही मानसिकता प्रभावी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडथळा ठरत आहे. लॉकडाऊनसारख्या उपायांनी करोना आटोक्यात येत नाही हे दिसून आल्याने आणि करोनावर कोणतेही औषध अजून अस्तित्वात नसल्याने नेमके करावे तरी काय, याची दिशा निश्‍चित होतांना दिसत नाही. करोनाचे पेशंट वाढत असताना त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतही आता सरकारी यंत्रणांवर मर्यादा येत आहेत. केंद्र सरकारच्या पातळीवर करोना नियंत्रणासाठी आणखी व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. त्यात त्यांना सातत्य राखावेच लागेल. राज्यांना त्यासाठी पुरेशी आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर देशातील आरोग्य सुविधांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर कोरोनासारखी साथ भविष्यात आल्यास आजच्यासारखी धावपळ होऊ नये यासाठीचा व्यापक आराखडा तयार होणे आवश्यक राहील. 

Post a Comment

Designed By Blogger