‘हर्ड इम्युनिटी’च्या दिशेने

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. भारतात विशेषत: महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी किंवा तो मारण्यासाठी जगभरातील संशोधक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक देशांतील लसींवरील संशोधन अंतिम टप्प्यात पोहचले असले तरी सर्वसामान्यांना लस उपलब्ध होण्यासाठी आणखी खूप काळ जावू शकतो. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. या संकटकाळात दिलासादायक घडलेली गोष्ट म्हणजे, काही लोकं आपल्या उत्तम रोगप्रतिकारक क्षमतेमुळे कोरोनावर मात करण्यात यशस्वी होत आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीयांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक वेगळी रोगप्रतिकारक क्षमता कामी येऊ शकते. ज्याला आपण ‘हर्ड इम्युनिटी’ असे म्हणतो. दिल्ली, मुंबई, औरंगाबाद, मालेगाव या ठिकाणी काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याची दिलासादायक माहिती समोर आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचे समोर आले आहे. हर्ड इम्युनिटीमुळे हे होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


..... तेव्हा आपण आजारी पडतो

हर्ड या इंग्लिश शब्दाचा अर्थ - कळप किंवा समूह, इम्युनिटी - म्हणजे रोग प्रतिकारकशक्ती. हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची रोग प्रतिकारकशक्ती. हर्ड इम्युनिटीमुळे एका माणसाकडून दुसर्‍या माणसाकडे जाणार्‍या रोगाचा प्रसार मंदावतो. अशामध्ये ज्या लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत आहे, त्यांच्यापर्यंतही हा आजार पोहोचण्याची शक्यता कमी होते, कारण त्यांच्या आजूबाजूला इम्युनिटी चांगली असणार्‍या लोकांची ढाल तयार झालेली असते. म्हणूनच परिणामी या लोकांनाही संरक्षण मिळते. म्हणजे जेव्हा समाजातल्या भरपूर लोकांच्या शरीरात एखाद्या रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते, तेव्हा त्या रोगाचा परिणाम कमी होऊ लागतो. याबद्दल अजून सोप्या भाषेत सांगायचे म्हटल्यास, लोकं त्या व्हायरससोबत जगणे शिकून जातात. माणसाला जेव्हा बाहेर पडावे लागते तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हायरसचा सामना त्यांना करावा लागतो, हे व्हायरस शरीरात दाखल होतात मात्र आपल्या असलेल्या इम्युनिटी सिस्टिम व्हायरससोबत लढून त्याचा नाश करतात आणि जेव्हा आपली इम्युनिटी व्हायरससोबत लढू शकत नाही, तेव्हा आपण आजारी पडतो. हर्ड इम्युनिटी दोन पध्दतीने तयार होते. नैसर्गिक पद्धत व लसीकरण म्हणजेच व्हॅक्सिनेशनव्दारे देखील हर्ड इम्युनिटी तयार करता येवू शकते. सध्या देशात दोन्ही पध्दतीने हर्ड इम्युनिटी तयार होत आहे. 

दाट लोकवस्ती असलेल्या भागासाठी फायदेशिर 

मुंबई, मालेगाव, औरंगाबाद किंवा दिल्लीचा विचार केल्यास तेथे लोकांमध्ये नैसर्गिक पध्दतीने रोग प्रतिकार क्षमता वाढत आहे. यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधी, आर्सिनिक अल्बमच्या गोळ्या, आयुर्वेदिक काढा आदींचे सेवन देखील करत आहेत. ब्रिटनच्या प्रिंस्टन युनिव्हर्सिटी आणि सेंटर फॉर डिजीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) च्या काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हर्ड इम्युनिटीचा भारतीयांना सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. यामुळे भारतीय जनता कोरोनापासून बचाव करू शकणार आहे. निती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्यावतीने आर उत्तर (दहिसर), एम पश्चिम (चेंबूर)आणि एफ उत्तर (माटुंगा) या भागांत जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये रॅन्डमली पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान, या तीन विभागांतील ६ हजार ९३६ जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. तसेच झोपडपट्टीतील निर्धारित लक्ष्यापैकी अधिक तर बिगरझोपडपट्टी भागांतील ७० टक्के रहिवाशी सहभागी झाले होते. त्यातील झोपडपट्टीतील ५७ टक्के तर बिगरझोपडपट्टी भागांतील १६ टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याची माहिती समोर आली. पहिल्या टप्प्यातील हे सर्वेक्षण हर्ड इम्युनिटीच्या अभ्यासासाठी पूरक ठरणार आहे. मात्र, हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी किती प्रमाणात अ‍ॅन्टिबॉडीज सापडल्या पाहिजेत हे अद्याप अनिश्चित आहे. दरम्यान, मोठ्या लोकसंख्येत अ‍ॅन्टिबॉडीजचे प्रमाण टिकून राहिले तर मुंबईची हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते, असेही सर्वेक्षणाच्या अहवालातून सांगण्यात आले आहे. सेरो सर्वेक्षणाची पहिली फेरी पूर्ण झाली असून दुसरी फेरी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात येणार आहे तोपर्यंत अंतिम निष्कर्षांसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागासाठी हे निश्‍चितपणे फायदेशिर ठरणारे आहे.

हर्ड इम्युनिटी दुधारी तलवार

कोरोनाचा खात्मा करण्यासाठी लोकांमध्येच हर्ड इम्युनिटी वाढत असल्याची दिलासादायक बाब दिसत असली तरी यात संशोधकांमध्ये मतभिन्नता आहे. काही संशोधकांच्या मते, हर्ड इम्युनिटीच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी देश आणि जगातील खूप मोठ्या लोकसंख्येला या व्हायरसचे संक्रमण होणे आवश्यक आहे. व्हायरसविरोधात सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती एकसारखी नसते. वृद्धांमध्ये आणि लहान मुलांमध्ये प्रतिकारक शक्ती कमी असते. आजारी रुग्णांची पण इम्युनिटी कमी असते. अशातच जेव्हा एका मोठ्या लोकसंख्येला कुठल्याही व्हायरसचे संक्रमण होते तेव्हा अनेकांसाठी तो जीवघेणा ठरतो. ज्या लोकांची प्रतिरोधक शक्ती मजबूत असते जशी की तरुणांची, त्यांच्या शरीरात व्हायरसविरोधात इम्युनिटी विकसित होऊ शकते, मात्र जे लोक अशक्त आणि आजारी आहेत त्यांचा जीव यात जावू शकतो. भारतात किंवा अन्य कुठल्याही देशात हर्ड इम्युनिटी वाढवण्याचा उपाय करणे हे धोकादायक आहे. कोरोनाला सीमित क्षेत्रात पसरवणे आणि यातून अँटीबॉडीज तयार करणे सोपे काम नाहीये. हा उपाय केला तर काही जणांचे प्राण जाऊ शकतात असे काही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. ‘हर्ड इम्युनिटी’मुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी फायदा होऊ शकतो मात्र अशाप्रकारे अँटीबॉडीज तयार करणे धोकादायक ठरू शकते, असे देखील एका संशोधनात समोर आले आहे. यामुळे हर्ड इम्युनिटीला दुधारी तलवार म्हटले जावू शकते. यामुळे मास्कचा नियमित वापर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन हेच सध्याचे प्रभावी शस्त्र आहेत.  


Post a Comment

Designed By Blogger