कलयुगातील रामायण

भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या नेपाळमधील पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सरकार धोक्यात असतानाच त्यांना आता प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मरण झाले आहे. केपी शर्मा ओली यांनी यावेळी अजब दावा केला आहे. खरी अयोध्या भारतात नाही तर नेपाळमध्ये असून भगवान राम भारतीय नाही तर नेपाळी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यामुळे भारत व नेपाळ या दोन्ही देशांमध्ये मोठा वादंग उभा राहीला आहे. ओलींच्या मुक्ताफळांवर संपूर्ण भारतातून संताप व्यक्त होत आहे. तिकडे नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे नेते आणि माजी उप पंतप्रधान कमल थापा यांनी ओली यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. नेपाळ अनेक दिवसांपासून भारताला वाकुल्या दाखवतोय. कधी चीनचे अप्रत्यक्ष समर्थन करत तर कधी भारतीय भूभाग नेपाळी नकाशा दाखवत. आता तर कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असणार्‍या प्रभू-श्रीरामांवरच नेपाळी पंतप्रधानांनी दावा ठोकला मात्र हे त्यांच्या अंगलटी येत असल्याचे लक्षात येताच नेपाळी सरकारने सावरासावर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.प्रभू श्रीरामचंद्रांबाबत वादग्रस्त विधान

भारत - चीन सीमेवरील गलवान घाटीमध्ये तणावाला सुरुवात झाल्यानंतर सर्वच पातळीवर भारताने चीनला छोबीपछाड दिली आहे. यामुळे संतापलेल्या चीनने भारताला घेरण्यासाठी शेजारच्या देशांचा वापर करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने भारताच्या सीमेवर मोठा फौज उभी केली तर भारताचा मित्र किंबहुना लहान भाऊ अशी ओळख असलेल्या नेपाळने सर्वप्रथम भारतीय भूभाग नेपाळी नकाशत दाखवला. चीनबरोबरच्या सीमावादावर चर्चा सुरू असतानाच आता नेपाळने भारताबरोबर नवा सीमावाद उकरून काढला. भारतीय भूभाग गिळंकृत करणार्‍या नकाशाला नेपाळमध्ये अधिकृत मान्यता दिल्यानंतर छोट्याशा देशाने नवा वाद निर्माण केला. काही दिवसांपूर्वी नेपाळच्या रेडिओवर भारताविरोधी गाणी गाण्यात येत होती. तर काही ठिकाणी नेपाळी जनता भारतविरोधात निदर्शने करत रस्त्यावर उतरली होती. मात्र नेपाळी पंतप्रधानांचे हे चीनी प्रेम त्यांच्याच अंगलटी येवू लागले आहे. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांबाबत वादग्रस्त विधान केले. भारतातली अयोध्या नगरी ही प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान नाहीच तर नेपाळच्या वाल्मिकी आश्रमाच्या जवळ प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान आहे, सीतामातेचा विवाह झालेला राम नेपाळी होता. नेपाळमधल्या बीरगंज प्रदेशाजवळ ठोरी नावाच्या ठिकाणी वाल्मिकी आश्रम आहे, तिथले राजकुमार प्रभू श्रीराम होते, अशी मुक्ताफळे ओपी शर्मा ओलींनी उधळली. 

श्रीरामांवर नेपाळने केलेला हा पहिलाच दावा नाही

भारतात लिहिले गेलेले वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस यांच्यानुसार, अयोध्या उत्तर प्रदेशात आहे. यानुसार, प्रभू श्रीरामांचा जन्म येथेच झाला होता. भगवान श्रीरामांचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्येतच झाला, याचा उल्लेख मंगोलिया, थायलंड आणि इंडोनेशियामध्ये सांगितल्या जाणार्‍या दंतकथांतूनही होत आला आहे. वाल्मीकी रामायणाच्या ५ व्या सर्गात अयोध्यापुरीचे वर्णन तपशीलवार केले आहे. सर्व शास्त्रांमध्ये याचा उल्लेख आपल्याला मिळेल की अयोध्या नगरी सरयू नदीच्या काठावर वसलेली होती त्यानंतर नंदीग्राम नावाचे एक गाव होते. अयोध्या पासून १६ मैलावर दूर आहे हे नंदीग्राम जेथे राहून भरत ने राज्य केले होते. येथे भरतकुंड सरोवर आणि भरतचे देऊळ देखील आहे. नेपाळमध्ये नंदीग्राम किंवा सरयू नदी किंवा हनुमानगढी नाही, चीनने नेपाळला भडकवतांना ही माहिती न दिल्याने व ओली यांनी स्वत:चे डोकं न वापरल्याने त्यांनी अशी मुक्ताफळे उधळली असतील. रामायण काळात मिथिलाचे राजा जनक होते. त्यांचा राजधानीचे नाव जनकपूर असे. जनकपूर नेपाळमधील प्रख्यात धार्मिक स्थळ आहे. हे शहर भगवान रामाची सासुरवाडी म्हणून प्रख्यात आहे. या शहरातच माता सीतेने आपले बालपण व्यतीत केले होते. अशी आख्यायिका आहे की इथे तिचे रामासह लग्न झाले होते. रामाने शिव धनुष्य देखील इथेच मोडले होते. इथे असलेल्या एका दगडाच्या तुकड्याला त्याच धनुष्याचे अवशेष असल्याचे सांगितले जाते. इथे ‘धनुषा’ या नावाने लग्नमांडव आहे या मांडवात लग्न पंचमीच्या दिवशी पूर्ण रीतीने राम-जानकीचा लग्न सोहळा केला जातो. मात्र श्रीरामांवर नेपाळने केलेला हा पहिलाच दावा नाही. 

लहान देश म्हणून नेपाळकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

१९९२ मध्ये इतिहासकार श्याम नारायण पांडे यांनी, ‘एनशियंट जिओग्राफी ऑफ अयोध्या’ यात म्हटले आहे, अयोध्या अफगाणिस्तानच्या हेरात शहरात होती. २००० मध्ये राजेश कोचर यांचे ‘द वैदिक पीपुलः देअर हिस्ट्री अँड जिओग्राफी’, हे पुस्तक प्रसिद्ध झाले. यात कोचर यांनी दावा केलाय, की भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला नव्हता. त्यांच्या मते शरयू नदी अफगानिस्तानच्या हरोयू अथवा हरी-रुड येथे होती. २०१५ मध्ये ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अब्दुल रहीम कुरैशी यांनी ‘फॅक्टस् ऑफ अयोध्या एपीसोड’ नावाने एक पेपर प्रसिद्ध केला होता. यात त्यांनी दावा केला होता, की भगवान श्रीरामांचा जन्म पाकिस्तानातील रहमान डेहरी येथे झाला होता. थायलंडमध्येही अयोध्या असल्याचा दावा केला जातो. येथेही प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्याचा पुरावा दिला जातो. येथील अयोध्या मध्य युगातील शहर अयुथाया येते होती. आज येथे एक ऐतिहासिक पार्क तयार करण्यात आला आहे. मात्र हे सर्व दावे प्रतिदाव्यांना धार्मिक भावनांची किनार आहे. यामुळे यावर अंतिम तोडगा निघणे थोडेसे कठीच आहे. मात्र नेपाळने प्रभू श्रीरामांवरुन उकरुन काढलेला हा वाद भावनिक नसून राजकीय आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अयोध्येवर वक्तव्य करून भारत आणि नेपाळचे संबंध आणखी खराब केले आहेत. ओली यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टचाराच्या आरोपांमुळे त्यांचा पाय आधीच खोलात रुतला आहे. आता ओली हे चीनचे कळसूत्री बाहुले झाले आहेत. भारतविरोधी भूमिकेमुळे ओली यांच्याविरुद्ध पक्षात व संसदेत बंड झाले. त्यांची खुर्ची धोक्यात आली तेव्हा नेपाळमधील चिनी राजदूतांना ओली यांची खुर्ची वाचवण्यासाठी धावाधाव करावी लागली होती. ओली यांचा बोलवता धनी चीनच आहे, हे ओळखायला कुण्या तज्ञांची गरज नाही. नेपाळचा भारताबद्दलचा बदललेला दृष्टिकोन लक्षात घेत आणि आशियातला दबदबा वाढवण्यासाठी चीनने गेल्या काही वर्षांमध्ये तिथे गुंतवणुकीचश्र प्रमाण वाढवले आहेत. सोबतच दोन्ही देशांमधील लष्करी संबंध मजबूत करण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहे. यामुळे लहान देश म्हणून नेपाळकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger