काँग्रेसचे तरुण तुर्क म्हातारे अर्क

देशाच्या सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला सध्या एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधील सत्ता बंडखोरीमुळे गमवावी लागल्यानंतर सध्या काँग्रेसमोर राजस्थानमधील सत्ता टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणार्‍या काँग्रेसने बंडखोर नेते सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली आहे. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रीपदेदेखील काढून घेण्यात आली आहेत. मात्र एका मागून एका राज्यातील सत्ता काँग्रेसच्या हातातून का निसटत आहे, यावर मंथन करण्याची वेळ काँग्रेंसवर आली आहे. भाजपा पैशांच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा राजकीय आरोप काँग्रेस नेते करत असले तरी इतकी वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले व विशेषत: राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवा नेत्यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखविला आहे. जनाधार गमावलेल्या काँग्रेसला नेते देखील रामराम ठोकत असल्याने नव्याने आत्मशोध घेण्याची नितांत आवश्यकता आहे. राहुल यांचा पक्षांतर्गत प्रभाव वाढू शकलेला नाही आणि काँग्रेसला विळखा देऊन बसलेल्या बुजुर्गांचे वर्चस्वही संपू शकलेले नाही, यामुळे काँग्रेसची अशी फरपट सुरु आहे.


तरुण विरुध्द जेष्ठ असा संघर्ष

जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत म्हणून भारताला युवा देश म्हणून म्हटले जाते. आज अनेक क्षेत्रात युवा वर्गाने प्रभुत्व निर्माण केले आहे. यास अपवाद असलेले क्षेत्र म्हणजे राजकारण! ५० वर्ष वय असलेल्या नेत्यांनाही युवा नेता म्हटले जाते, अशी भारतीय राजकारणाची अवस्था आहे. बहुतांश राजकीय पक्षांमध्ये तरुण विरुध्द ज्येष्ठ असा संघर्ष अधून मधून रंगतांना दिसतो. याचा सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसत आल्याचा गत पाच-सहा वर्षांचा इतीहास सांगतो. याचे कारण म्हणजे, भारतातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीत असलेल्या बहुतांश सदस्यांनी वयाची सत्तरी गाठली आहे. यात तरुण गोगोई, हरीश रावत, गुलाम नबी आझाद, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एके. अँटोनी, मल्लिकार्जुन खर्गे, अंबिका सोनी, उमन चांडी, अशोक गेहलोद, आनंद शर्मा, सिद्दारमैय्या असो किंवा दिग्विजय सिंग असो. या सर्वांची पक्षावर भक्कम पकड आहे कारण हे सर्व जण तेंव्हा पासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत जेंव्हा सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षा नव्हत्या. यामुळे पक्षामध्ये या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मोठे वजन आहे. राहुल गांधी यांच्या गटात पक्षातील तरुण नेत्यांचा भरणा आहे. हे युवा नेते ‘युवराजांच्या’ मर्जीतील असल्याने पक्षात तरुण विरुध्द जेष्ठ असा संघर्ष सुरुच असतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटांमध्ये छुपा संघर्ष उफाळून आल्याने त्याची मोठी किंमत काँग्रेस पक्षाला चुकवावी लागली होती. हा वाद चव्हाट्यावर येण्याचे निमित्त ठरली २०१८ साली झालेली मध्यप्रदेश व राजस्थान विधानसभेची निवडणूक. 

सिंधिया व पायलट यांच्या सारख्या लोकप्रिय नेत्यांना डावलले

मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिंया यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सत्ता मिळवली तर दुसरीकडे राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या कुशल नेतृत्वात काँग्रेसने भाजपाला सत्तेतून बाहेर फेकले. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसच्या या युवा नेत्यांना मोठा जनाधार मिळाल्याने काँग्रेसला अच्छे दिन आल्यानंतर देखील दोन्ही ठिकाणी या युवा नेत्यांची बोळवण करत ७२ वर्षांच्या कमलनाथ यांना मध्य प्रदेश तर ६८ वर्षीय अशोक गेहलोद यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर बसविण्यात आले. सिंधिया व पायलट यांच्या सारख्या लोकप्रिय नेत्यांना डावलण्यात आल्याने दोन्ही राज्यांमध्ये दुफळी निर्माण होणे स्वाभाविकच होते. पायलट यांची लोकनेता अशी ओळख आहे. गेल्या काही वर्षांत पायलट यांचा करिश्मा राजस्थानात दिसला आहे. एकमेकांना पाण्यात पाहणार्‍या गुर्जर आणि मीणा समुदायांना एकत्र आणण्याचे अवघड काम पायलट यांनी करून दाखवले. त्यामुळेच २०१८ मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता आली होती. सचिन पायलट यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचे काल म्हटले होते. मात्र काँग्रेसने केलेल्या कठोर कारवाईमुळे आता यांच्या परतीचे दोर कापले गेले आहेत. त्यामुळे आता पायलट नेमके काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पायलट स्वत:चा पक्ष काढणार की ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याप्रमाणे भाजपामध्ये जाणार, याबद्दल उत्सुकता आहे. पायलट यांना स्वत:कडे खेचण्यासाठी भाजपाने जोर लावला आहे. आतापर्यंत राजस्थानात भाजपाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. मात्र आता भाजपा नेते सक्रिय झाले आहेत. 

राहुल गांधींची भुमिका नेहमी भाजपाच्या पथ्यावर 

या राजकीय नाट्यामागे भाजप असल्याचा आरोप काँग्रेसने केले आहे. ‘पूर्ण बहुमताने निवडून आलेले सरकार पाडण्यामागे भाजपाचे षडयंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच दिल्लीमध्येही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे गेल्या काही काही दिवसांपूर्वी समोर आले होते. मात्र तो वाद निवळला. मात्र आता राजस्थानमध्ये काँग्रेसपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. हे संकट एका रात्रीत उभे राहीलेले नाही. मुळात या वादाला तरुण नेते विरुध्द ज्येष्ठ नेते अशी पार्श्‍वभूमी आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यशैलीविषयी पक्षातील बुजुर्ग नेत्यांच्या टीकेची तीव्रता वाढत चालल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. गलवान खोर्‍यातील तणावादरम्यान काँग्रेस कार्यकारिणीची व्हर्च्युअल बैठक झाली होती. या बैठकीत, मोदींना लक्ष्य करण्याऐवजी सरकारी धोरणांवर टीका केली जावी, अशी सूचना आरपीएन सिंह यांनी केली. त्यावरून राहुल गांधी संतप्त झाले. ‘मोदींवर टीकेची झोड उठविण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. मी त्यांना घाबरत नाही आणि ते माझे काहीही बिघडवू शकणार नाहीत. मी त्यांच्यावर टीका करीत राहीन. ती आवडत नसेल, तर कार्यकारिणीने माझे तोंड बंद करून दाखवावे,’ असा आक्रमक पवित्रा राहुल यांनी घेतला. या भुमिकेवरुन देखील पक्षात धुसफुस सुरु आहे. राहुल गांधींची ही भुमिका नेहमी भाजपाच्या पथ्यावर पडत असल्याचे काँग्रेसमधील काही नेत्यांचे ठाम मत झाले आहे. मात्र पिंजर्‍यातला पोपट मेला आहे, हे सांगणार कोण? हा मुख्य प्रश्‍न आहे.

Post a Comment

Designed By Blogger