धारावी पॅटर्नचा श्रेयवाद!

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. कोरानाला ब्रेक लावणार्‍या या धारावी पॅटर्नची दखल केवळ केंद्र सरकारनेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक आरोग्य संघटनेने देखील घेतली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असली तरी आता यावर श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याने या विजयाचा आनंद हरवला आहे. धारावी म्हटली की, डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते दाटीवाटीत वसलेली झोपडपट्टी व गुंडगिरी मात्र लेदर, टेक्सटाईल ते मांस व्यवसाय असे लहान सहान उद्योग धारावीत आहेत. सामान्यपणे १ बिलियन इतका आंतरराष्ट्रीय व्यवहार धारावीत वर्षाला होत असतो. यामुळे आर्थिकदृष्ट्यादेखील महत्त्वाच्या असलेल्या धारावीत मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण समोर येवून हा भाग परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. मात्र कितीही अडचणी व समस्या असल्या तरी सांघिक प्रयत्नांनी कोरोनाला रोखता येवू शकते हे धारावीने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.


सांघिक प्रयत्न केल्याने कोरोनाला रोखणे शक्य

२.५ स्केअर किमीच्या धारावीत अंदाजे लोकसंख्या घनता २,२७,१३६ प्रति चौरस किमी इतकी आहे. यामुळे धारावीत दाटीवाटीची लोकसंख्या पाहता ‘होम क्वारंटाईन’ हा पर्याय अशक्य होता. परिणामी धारावीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आव्हानात्मक काम होते. यासाठी ‘मिशन मोड’ वर राबविण्यात आलेल्या ‘चेस द व्हायरस’ उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली. या मोहिमेत ४७ हजार ५०० घरे डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यामार्फत तपासण्यात आली. ३.६ लाख लोकांचे स्कॅनिंग करण्यात आले. प्रो क्टिव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि क्वारंटाईन सेंटर्स यामुळे साथ नियंत्रणात ठेवता आली. या मिशनमध्ये सर्वांनी राजकीय मतभेद लांब ठेवत सांघिक प्रयत्न केल्याने कोरोनाला रोखणे शक्य झाले. धारावीवर सुरूवातीपासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक, राज्य सरकार, मुंबई महानगर पालिका लक्ष ठेवून होती. केंद्राच्या पथकानेही धारावीत जाऊन ग्राऊंड रिपोर्ट पाहिला होता. सर्वांना परिस्थितीची जाणीव असल्याने सर्वांनी केवळ कोरोनाला हरवायचे, हाच विचार डोक्यात ठेवून काम केल्याने आज यश पहायला मिळत आहे. यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. एक वेळ होती ज्यावेळी मुंबईतील धारावी हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट होता आणि मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण समोर येत होते. मुंबईतल्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला अजून तरी ब्रेक लागलेला नाही. मात्र, रुग्णसंख्या वाढीचा वेग बराच कमी झाल्याचे चित्र आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता जवळपास एक महिन्यापर्यंत गेला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर देखील मोठ्या प्रमाणात खाली आला आहे. धारावीचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता राज्य शासनासह स्थानिक धारावीकर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि आरएसएस सह अनेक स्वयंसेवी संस्थांच्या एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणून धारावीतील कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या यशाकडे पाहावे लागेल. एकीकडे मुंबईसह राज्यभरातील अनेक नामांकित रुग्णालये लाखों रुपये उकळत असताना, धारावीकरांनी मात्र सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या मदतीने कारोनावर मात केली. शिवाय खासगी डॉक्टरांनीही धोका पत्करुन दवाखाने उघडत सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम केले, यामुळे हे श्रेय त्यांचे देखील आहे. या भागात जवळपास ८० टक्के लोक हे सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. त्यामुळे या भागात संसर्गाचा धोका अधिक होता. मात्र, सफाई कामगारांनी शौचालयांचीही कमालीची स्वच्छता राखली, पोलिसांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडले यामुळे हे श्रेय त्यांचे देखील आहे. कंटेनमेंट झोनमधील लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना बीएमसीकडून अन्नधान्याची २५ हजार किराणा किट तर २१ हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. या कामात सर्वपक्षिय नेते व पदाधिकार्‍यांनी योगदान दिले म्हणून हे यश त्यांचे देखील आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीपर्यंत सर्व जण एकत्रित लढा देत असताना धारावीमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक करण्यात आले, येथेच माशी शिंकली. 

....म्हणजे सर्व कोरोनायोध्दांचा अपमान करण्यासारखे

मुळात आरएसएस किंवा स्थानिक पातळीवरील काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी यावर कोणतेही दावे प्रतिदावे केलेले नाहीत, परंतू काही वाचाळवीरांमुळे यास राजकीय रंग प्राप्त झाला. या आगीत तेल ओतलं गेलं ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजप आमदार नितेश राणे यांच्या भडक वक्तव्यांमुळे कारण धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केले. सगळे श्रेय सरकारने घेण्याचे काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असे म्हणते चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले. याआधी भाजप आमदार नितेश राणे यांनीसुद्दा धारावीतील कोरोना रुग्णसंख्या ही महाराष्ट्र सरकारमुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आली, असा दावा केला होता. तर शिवसेनेकडून हे केवळ राज्य सरकारचे व मुंबई महानगरपालिकेचे यश असल्याचा प्रतिदावा केला गेला. आता धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने प्रवास करत असताना अनेकांना कंठ फुटत आहे, मुळात राजकारणात हे नवे नाही किंबहूना आपल्याला याची चांगलीच सवय झाली आहे. जेंव्हा मुंबई महापालिकेची यंत्रणा, आरोग्य विभाग बॅटल फिल्डवर काम करत होता त्यावेळी त्यांना मदत करणारे अनेक हात पुढे सरसावले होते. स्वयंसेवी संस्थांनीही जबाबदारी उचलली होती. यात निश्‍चितपणे आरएसएसचे देखील मोठे योगदान आहे, हे नाकारुन चालणार नाही. कदाचित यामुळेच मोदी सरकार, भाजपा व आरएसएसवर टीका करण्याची एकही संधी न सोडणार्‍या एनडीटीव्हीने यावर विशेष भाग दाखविला होता. यातही मोदी सरकारच्या कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी स्वत: धारावीत जावून ग्राऊंड रिपोर्ट सादर करत आरएसएसच्या कामाचे कौतूक केले होते. एकला चालो रे ची भुमिका घेवून धारावीतील कोरोनावर नियंत्रण मिळवणे कोणत्याही यंत्रणेला शक्य नव्हते. यात सर्वांचीच भुमिका महत्त्वाची आहे, मात्र त्यास श्रेयवादाच्या तराजूमध्ये त्याच मोजमाप करणे म्हणजे सर्व कोरोनायोध्दांचा अपमान करण्यासारखे आहे.

Post a Comment

Designed By Blogger