आयुर्वेदाचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर

योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीतर्फे कोरोनावरील औषध म्हणून ‘कोरोनील’ची घोषणा झाल्यानंतर मोठा गजहब माजला होता. नंतर ते कोरोनावरील औषध नव्हे तर इम्यूनिटी बुस्टर असल्याची सावरासावर करण्यात आली. या प्रकरणामुळे भाजपाचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले रामदेव बाबा यांच्यावर टीका होणे स्वाभाविक आहे मात्र एका गटाकडून आयुर्वेेदावरच थेट हल्ला चढविण्यात आला. भारतात प्राचीन काळी विकसित झालेले आयुष्याबद्दलचे ज्ञान व त्याच्या उपयोगाने आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. हे शास्त्र भारताने जगाला दिले आहे. मात्र भारतातच यावर टीका करणार्यांची संख्या मोठी असली तरी अमेरिकेसारख्या महासत्त्तेने करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी आता आयुर्वेदीक औषधे व उपायांची चाचपणी सुरु केली आहे. यानिमित्ताने आयुर्वेदिक औषधांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यास निश्‍चितपणे मदत होणार आहे.


आयुर्वेेदाला प्राचीन इतीहास 

युरोपीय देशांसहित जगभरात आयुर्वेदाबाबत जागृती वाढत आहे. अनेक देश आयुर्वेदाला मुख्य उपचारपद्धती म्हणून स्वीकारू पाहत आहेत. आता करोनावर प्रभावी ठरू शकणार्या आयुर्वेदिक औषधांची भारत व अमेरिकेतील आयुर्वेदिक डॉक्टर तसेच, संशोधक लवकरच संयुक्त प्रयोगशाळा चाचणी सुरू करणार आहेत. उभय देशांतील शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि डॉक्टरांमध्ये नुकत्याच झालेल्या एका वेब परिसंवादामध्ये ही कल्पना मांडण्यात आली, अशी माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू यांनी दिली. अमेरिकेत विविध क्षेत्रांतील संस्था परस्परांच्या संपर्कात असून, त्याच माध्यमातून हा प्रयोग करण्यात येणार आहे. इंडो-यूएस सायन्स टेक्नॉलॉजी फोरमतर्फे उभय देशांतील शास्त्रज्ञ आपापल्या ज्ञानाची देवाणघेवाण करत आहेत. केवळ करोनाविषयीच नव्हे; तर एकंदरीतच आयुर्वेदिक उपचारपद्धतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न उभय देशांतील आयुर्वेदिक डॉक्टर करणार आहेत. आयुर्वेेदाला प्राचीन इतीहास आहे. आयुर्वेदाचा किंवा वैद्यकाचा प्रारंभ वेदपूर्वकालात झाला. आयुर्वेद किंवा वैद्यक हे मुळापासूनचे भारतीय विज्ञान आहे. भारतीय वैद्यकाने चीन, मध्य पूर्वेतील संस्कृती, ग्रीक रोमन व अरबी संस्कृती यांच्यापासून काही गोष्टी घेतल्या असल्या तरी वैद्यकाचे विज्ञान, तत्त्वज्ञान, निदान व चिकित्सा ही सर्व स्वतंत्र रीतीने विकास पावली आहेत. सिंधु संस्कृती ही चार हजार वर्षांच्या पूर्वीची लुप्त संस्कृती. मोहेंजोदडो व हरप्पा येथील उत्खननात शिलाजतू, समुद्रफेन, मृगशृंग, सांबरशिंग, गेंड्याचे शिंग, प्रवाळ, निंब इ. आयुर्वेदिक औषधे सापडली आहेत. चिनी तुर्कस्तानातील काशगर येथील बौद्ध स्तूपामध्ये बॉवर या इंग्लिश गृहस्थाला संस्कृत व प्राकृत यांचे मिश्रण असलेला एक वैद्यकग्रंथ सापडला. हा ग्रंथ चौथ्या शतकातील असावा असे मानतात. त्याच्यात नवनीतक हे सगळ्यात मोठे प्रकरण आहे. या प्रकरणात अग्निवेश, भेड, हारीत, जातूकर्ण, क्षीरपाणी आणि पराशर यांचा व सुश्रुताचाही आयुर्वेदज्ञ म्हणून उल्लेख आहे. त्याच परिसरात योगशतक हा आयुर्वेदाचा ग्रंथ सापडला आहे. यावरुन आयुर्वेेद किती प्राचीन आहे, याची प्रचिती येते. 

जेथे पिकतं तेथे विकत नाही

आयुर्वेद केवळ व्याधिग्रस्त अवयवापुरते उपचार करत नसून व्यक्तीच्या संपूर्ण शरीराचा विचार करते आणि शरीरातील सर्व विषारांचे असंतुलन दूर करून प्रतिकारक्षमता आणि आरोग्य परत आणते. मानवी शरीर, सृष्टी व त्यांच्यातील क्रिया-प्रतिक्रिया यांसंबंधी आणि आरोग्यपूर्ण जीवनासंबंधी मौलिक तत्त्वचिंतन हा त्याचा पाया आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसेेंदिवस वाढत असली तरी बरे होणार्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. अनेक ठिकाणी अ‍ॅलोपॅथी औषधांसह योगा, प्राणायम करण्यावर देखील भर दिला जात आहे. करोना संसर्गाला रोखण्यासाठी किंवा प्रभावी उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाने आयसीएमआर आणि सीएसआयआर यांच्या तांत्रिक सहकार्याने वैद्यकीय प्रयोगाला सुरुवात देखील केली आहे. करोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी अश्वगंधा, यष्टीमधु, गुडुची, पिपळी, आयुष-६४ यासारख्या आयुर्वेदिक औषधांची उपयुक्तता तपासून पाहण्यात येत आहेत. पुण्याचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आज देशातील करोना आजारावर प्रभावी उपचार करण्यात आघाडीवर आहे. आज मोठ्या संख्येने करोनाबाधित रुग्ण तेथे उपचारासाठी येत आहेत आणि विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात १००० पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. करोना रुग्णांवर या ठिकाणी ३०० डॉक्टरसह ४५०० कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. एवढ्या मोठ्या डॉक्टर आणि कर्मचारी हजारो रुग्णांवर उपचार करत असताना मंगेशकर हॉस्पिटलने करोनावर विजय मिळवला याचे मुख्य कारण म्हणजे जलनीतीचा वापर. आयुर्वेद परंपरेत सांगितलेल्या या जलनीतीचा वापर करून आपल्या सर्वांना करोनापासून संरक्षण करता येते. ही जलनीती करोना बरा करत नाही, पण तुम्हाला त्याची लागण होण्यापासून संरक्षित करते, असा विश्वास मंगेशकर हॉस्पिटलचे डिन डॉ. धनंजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. भारतात आयुर्वेेदावर होणार्या टीकेला धार्मिक आणि विचारसरणीची किनार दिसून येते मात्र आता युरोपीय देशांप्रमाणेे अमेरिकेने देखील याचे महत्त्व ओळखून संशोधन सुरु केले आहे. ही भारताच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. जेथे पिकतं तेथे विकत नाही, असे आपण नेहमी बोलता. मात्र तेच जर अन्य पाश्‍चात्य देशाने केले तर  त्याचे अंधानुकरण करण्यावर आपणच आघाडीवर असतो, असा आजवरचा अनुभव सांगतो. यामुळे आता करोनावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांची भारत व अमेरिकेतील आयुर्वेदिक डॉक्टर व संशोधक संयुक्तिकरित्या चाचणी सुरू करतील, यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेदिक औषधांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यास निश्‍चितपणे मदत होईल, असा विश्‍वास वाटतो.

Post a Comment

Designed By Blogger