डिजिटल स्ट्राइकने चीन बिथरला, पण..

लडाख मध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर भारत - चीन सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटत आहे. चीनच्या कोणत्याच धमक्यांना भीकं न घालता त्यांना तितक्याच आक्रमक पध्दतीने उत्तर देण्याच्या मुड मध्ये केंद्र सरकार दिसत आहे. एकीकडे राजकीय, लष्करी पातळीवर चर्चा सुरु असली तरी भारताने युध्द सज्जतेच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसर्‍यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सोमवारी टिकटॉकसह युसी ब्राऊझर, झेंडर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने भारताचा हा ‘डिजिटल स्ट्राईक’ चीनच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. चीनच्या सरकारी मीडियाने भारताला धमकावण्यास सुरुवात केली असून भारताविरोधात आर्थिक युद्ध पुकारण्याचा इशारा दिला. यासाठी केवळ डिजिटल स्ट्राईकच्या आनंदोत्सव न साजरा करता व्यापार व उद्योगांची दीर्घकालीन धोरणांची आखणी करुन त्यावर वाटचाल सुरु केली पाहिजे.चीनची विस्तारवादी भूमिका

चीनची आक्रमक विस्तारवादी भूमिका जगाला नवीन नाही. आर्थिक आणि लष्करी सत्तेचा वापर करून चीनला जगातील सर्वात बलाढ्य महासत्ता बनवायचे आहे. याच्यासाठी जिनपिंग यांनी काही कार्यक्रम हाती घेतले आहेत. विविध देशांना व्यापारी मार्गाने जोडणारी वन बेल्ट वन रोड (ओबोर) ही योजना हाती घेणार्‍या चीनची जगावर प्रभाव गाजवण्याची महत्त्वाकांक्षा वारंवार दिसून आली आहे. जगात आपला प्रभाव, व्यापार आणि सामरिक विस्तार वाढवण्यासाठी चीनची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे, वन बेल्ट, वन रोड (ओबोर)! ओबोरचे भूमार्ग आणि सागरी मार्ग असे दोन महत्त्वाचे भाग आहेत; हे दोन्ही पाकिस्तानमध्ये एकत्र येतात म्हणून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चीन आणि पाकिस्तान यांनी प्रकल्पाचा एक भाग म्हणून ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपेक) योजनेचा प्रस्ताव मांडला आहे. चीनने पन्नास ते साठ अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली आहे. याचा जवळपास निम्मा खर्च पाकिस्तानच्या ऊर्जा प्रकल्पांना पुरवून ते स्वयंपूर्ण करण्यासाठी आहे. परंतु, याच्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे, चीनच्या सिंकियांग प्रांतापासून काराकोरम महामार्गाद्वारे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील मकरान समुद्र तटावरील ग्वादार बंदराला जोडण्याची योजना आहे. यातला काही अंश भाग पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार म्हणून भारताने केवळ आक्षेप न घेता ओबोरमध्ये सामील न होण्याची भूमिकाही घेतली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे चीनचा सागरी मार्ग हा ग्वादार बंदराला जोडणार आहे आणि यामुळे चीनला भारताला उत्तरेकडून भूमार्गाने आणि दक्षिणेकडून समुद्र मार्गाने विळखा घालणे शक्य होईल. यास भारत विरोध करत असल्याने चीन अधून मधून कुरापती काढत असतो. 

बायकॉय चायनाची मोहिम

पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यात जो संघर्ष उद्भवला त्याला ५ मे पासून भारत-चीन सीमेवर होत असलेल्या चकमकींची पार्श्वभूमी आहे. मे महिन्यात भारताच्या गलवान, हॉट स्प्रिंग, पेंगोंग त्सो, ग्रोग्रा या भागात चीनने सैन्याची जमवाजमव सुरु केली होती. हे भाग आधी वादग्रस्त म्हणून परिचित नव्हते. परंतु चीनने या भागात घुसखोरी केल्यावर आपले तळ ठोकले आहेत. यामुळे आता सध्या भारत-चीन सीमेवर सुरु असलेला वाद चीनच्या रणनितीचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची दुसरी बाजू म्हणजे, नोव्हेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये कोरोना विषाणू आढळून आला. ही बाब चीनने बरेच दिवस दडवून ठेवली. संपूर्ण जग चीनच्या चुकीमुळे कोरोनाच्या विळख्यात आल्याने व बहुतांश देशात टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली. जगभरात चीनविरोधी वातावरण तापू लागले. खुद्द चीनमध्ये कोरोना महामारीमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला, बेरोजगारी वाढली. चीनची अतिशय प्रगत, शक्तिशाली, प्रतिमा ढासळली. यास्तव चीनी नागरिकांचे व जगाचे लक्ष या मुद्यावरून भरकटवण्यासाठी भारत-चीन सीमावादाचा मुद्दा चीनने तापवायला सुरुवात केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गलवान खोर्‍यात घडलेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत-चीन संबंध अधिकच दुरावतील. चीनच्या या धाडसाला भारताने आक्रमकतेने परंतु रणनीतीच्या आधारे शह देणे आवश्यक आहे. चीनची ताकद व कमजोरी ओळखून धोरणे आखावी लागतील. हे तर सरकारी पातळीवर होईलच मात्र आता देशात आता जी बायकॉय चायनाची मोहिम जोर धरत आहे. त्याला यशस्वी करण्यासाठी दीर्घकालीन धोरणे आखणे गरजेचे आहे. 

कोरोनामुळे जगभरात चीनची विश्वासार्हता कमी

चीनची खरी शक्ती आहे उद्योग-व्यवसायातून निर्माण होणारे प्रचंड परकीय चलन. चीन जगाला कच्चा माल, स्वस्त मनुष्यबळ व मोठी बाजारपेठ पुरवितो. यास्तव जगभरातील उत्पादन क्षेत्रातील उद्योगानी चीनमध्ये त्यंच्या मालाचे उत्पादन करतात. कोरोनामुळे जगभरात चीनची विश्वासार्हता कमी झाली आहे व चीनमधील इतर देशांचे उद्योग चीनबाहेर पडण्याच्या विचारात आहेत. याकडे भारताने संधी म्हणून पाहिले पाहिजे व चीनमध्ये बस्तान बसविलेल्या उद्योगांना भारतात आकर्षण्यासाठी उद्योगस्नेही धोरणे तात्काळ राबविली पाहिजेत. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असेल तरच चीनला रोखणे शक्य होईल. ५९ चीनी अ‍ॅप बंदी वरुन चीनमधील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन ट्विट करुन ‘चीनच्या लोकांनी भारतीय उत्पादनास बॅन करायचा निर्णय घेतला, तर त्यांना पर्यायही नाही. कारण, भारतीयांकडे तसे काही नाही की, जे चीनी नागरिकांनी बॅन करावे’, अशा शब्दात चॅलेंज केले आहे. यास उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी उत्तर देतांना ‘आपण भारतीयांना उद्देशून केलेली टीका ही पहिल्यांदाच आहे, त्यामुळे सर्वात प्रेरक आणि प्रभावी सिद्ध होईल. आम्हाला डिवचल्याबद्दल धन्यवाद, आम्ही या संधीचं सोनं करुन दाखवू’, अशा शब्दात दिलेले सडेतोड उत्तर निश्‍चितच प्रेरणादायी ठरु शकते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ चा जो नारा दिला आहे त्याची प्रत्येक्षात अमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger