टेनिसला पडलेले एक ‘सुदंर’ स्वप्न

टेनिस आणि सुंदरता म्हटले म्हणजे स्टेफी ग्राफ, अ‍ॅना कुर्निकोवा, मार्टिना हिंगिस, सानिया मिर्झा यांची नावे डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. यातही सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे मारिया शारापोव्हा. वयाच्या १७व्या वर्षी पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावून टेनिस जगतात खळबळ उडवून दिल्यानंतर वयाच्या १८व्या वर्षी जगातिक रँकिंगमध्ये अव्वल ठरलेली रशियाची ३२ वर्षीय टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हाने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. आपल्या उत्कृष्ट खेळाने जगभरातील चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणार्‍या मारिया शारापोव्हाने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेची २, तर ऑस्ट्रेलियन-विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे प्रत्येकी एक विजेतेपद मिळवले आहे. जेंव्हा टेनिसच्या कोर्टवर विनस आणि सेरेना विलियम्स बहिणींचा केवळ बोलबालाच नव्हे तर अक्षरक्ष: दादागिरी होती. अशावेळी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी म्हणजे अगदी तरुण वयात मारियाने विम्बलडनच्या कोर्टवर सेरेनाला धूळ चारली आणि तिसरी सर्वांत तरुण विंबल्डन विजेती ठरली होती.


टेनिस जगतात एकापेक्षा एक मातब्बर खेळाडूंचा दबदबा

टेनिस हा खेळ काहीसा महागडा खेळ असला तरी भारतात त्याची लोकप्रियता भरपूर आहे. शालेय स्तरापासून या खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. हा खेळ फारसा अवघड नसल्यामुळे आपल्या देशात गावोगावी हा खेळ खेळला जातो असे म्हटले जात असले तरी यासाठी प्रचंड स्टॅमिना लागतो. अलीकडच्या काही वर्षात हा खेळ उच्चभू लोकांच्या फिटनेससाठी सर्वाधिक पसंती असलेला खेळ म्हणून देखील नावारुपाला आहे. भारतातलिएडंर पेस, महेश भुपती, सानिया मिर्झा यासारख्या खेळाडूंनी या खेळाला नवी ओळख मिळवून दिली. तोपर्यंत टेनिस हा आपल्या भारतीय जातकुळीचा खेळच नाही. तो खेळावा तर युरोपियन्स, अमेरिकन्स आणि ऑस्ट्रेलियन्सनी, असे अलिखित समीकरणच झाले होते. या खेळासाठी लागणारी प्रचंड ताकद, अमर्याद दम ही कामे करावी परदेशातल्या अरदांड खेळाडूंनी करावीत आपण आपले क्रिकेट खेळावे. टेनिस, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स वगैरेंच्या वाटेला फारसे जाऊ नये, असे चित्र अनेक वर्षे कायम होते. अजूनही रोहन बोपन्ना, युकी भामरी, सोमदेव देववर्मन, सुमित नागल अशी बोटावर मोजण्याइतकी नावे सोडली तर एकही मोठे नाव समोर येत नाही कारण या खेळाकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही, ही वस्तूस्थिती कुणीही नाकारु शकणार नाही. मात्र जागतिक टेनिस जगतात एकापेक्षा एक मातब्बर खेळाडूंचा दबदबा दिसून येतो. २०व्या शतकाची सुरुवात झाल्यानंतर टेनिसला लोकप्रिय करणार्‍या खेळाडूंमध्ये एक नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे मारिया शारापोव्हा.

अवघ्या १७ व्या वर्षी स्टार टेनिसपटू

शारापोव्हाने वयाच्या चौथ्या वर्षापासून हातात टेनिसचे रॅकेट हाती घेतले होते तेव्हाच मारियाचे वडील युरी यांना आपल्या या कन्यारत्नातील चमक दिसली होती. त्यांनी तिला अमेरिकेतील बोलेटेरी अकादमीत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कर्ज घेतले आणि त्यांच्या या मुलीने हे प्रयत्न फोल जाऊ दिले नाहीत. लहान वयातच आपल्या कौशल्याच्या जोरावर यशोशिखर गाठायला सुरुवात केलेल्या मारिया शारापोव्हाच्या देखण्या रुपाने सार्‍या जगाला तिचा खेळ बघण्यास भाग पाडले होते. टेनिस कोर्टवर जसा मारियाचा वावर सुंदर आणि आकर्षक होता, तेच सौंदर्य विविध जाहिराती, ब्रँड्स, पुस्तकांची मुखपृष्ठे यात शोभून दिसत असे. त्यामुळे टेनिससम्राज्ञी ते हृदयाची राणी असाही तिचा प्रवास झाला.  अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपन्यांची ती ब्रॅण्ड अ‍ॅबसिडर देखील असल्याने सर्वत्र तिच्या नावाचा बोलबाला होता. इतकेच काय तर ज्या देशात सर्वाधिक क्रिकेट खेळला जातो. त्या खेळाचा देव म्हणून ओळखला जाणार दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील तिचा खेळ आवडायचा. (सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर, शारापोव्हावर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी फैलावर घेतले होते. यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.) विम्बलडन २००४ मध्ये अवघ्या १७ व्या वर्षी स्टार टेनिसपटू आणि त्यावेळची नंबर वन सेरेना विलियम्सवर शारापोव्हाने मात केली होती. ते शारापोव्हाचं पहिलं ग्रँडस्लॅम होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर २००६ मध्ये यूएस ओपन, २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, २०१२ आणि २०१४ मध्ये फ्रेंच ओपनवर शारापोव्हाने आपले नाव कोरले. शारापोव्हाच्या नावे ३६ डब्लूटीएचे आणि चार आटीएफचे खिताब आहेत. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये एकेरीत रौप्यपदक पटकावले आहे. 

२८ वर्षं आणि ५ ग्रँड स्लॅम

क्रीडाविश्वातील दिग्गज आणि नावाजलेल्या खेळाडूंमध्ये शारापोव्हाचा समावेश होत असून, गेल्या काही स्पर्धांपासून ती आपल्या खराब फॉर्मशी झगडत होती. मेलडोमिन चाचणीत दोषी सिद्ध झाल्याने २०१६ साली तिच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. २०१७ मध्ये तिने पुनरागमन केले. मात्र पूर्वीचा सूर तिला गवसला नाही. तसेच शारीरिक दुखापतींमुळेही ती हैराण झाली होती. परिणामी तिचे मानांकन ३७३व्या स्थानापर्यंत खाली घसरले होते. गेल्या तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये तर ती पहिल्या फेरीतच बाद झाली. पुनरागमन केल्यानंतर तिला एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. उमेदीच्या काळात शारापोव्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. काही वर्षांपासून शारापोव्हा फॉर्मात नव्हती, ज्यामुळे अखेरीस तिने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. २८ वर्षं आणि ५ ग्रँड स्लॅमनंतर आता मी पुन्हा एकदा पर्वत चढण्यासाठी सज्ज झाले आहे. अर्थातच दुसर्‍या क्षेत्रातला, असे म्हणत शारोपोव्हाने निवृत्ती जाहीर केली. विसाव्या शतकाची सुरुवात झाल्यानंतर टेनिस या खेळाची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत गेली यात निश्‍चितपणे शारापोव्हाचाही सिंहाचा वाटा आहे. शारापोव्हा २००५ ते २००८ सालादरम्यान इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केली जाणारी ‘स्पोटर्स सेलिब्रेटी’ ठरली होती. कुणी तिचा खेळ पाहण्यासाठी तर कुणी तिची सुंदरता पाहण्यासाठी टेनिस कोर्टवर हजेरी लावत असे, अर्थात खेळ व सुंदरता याचे अचुक मिश्रण म्हणजे शारोपोव्हा! हे आजही कुणीच नाकारत नाही. सर्वोच्च यशोशिखरावर पोहचल्यानंतर कधीतरी यशाला उतरती कळा लागतेच अशावेळी कुठे व कधी थांबायचे याचा निर्णय घ्यायचाच असतो. तोच निर्णय शारोपोव्हाने घेतला आहे. निवृत्तीनंतर टेनिसचाहत्यांच्या हृदयावर तिचेच स्थान अव्वल असेल यात शंका नाही.

Post a Comment

Designed By Blogger