कुणाचे नागरिकत्व नाही, ३६ जणांचा जीव गेला

आग का क्या है पल दो पल में लगती है,
बुझते बुझते एक ज़माना लगता है... 

अशा शब्दात उर्दू शायर आणि गीतकार डॉ. राहत इंदौरी यांनी दिल्लीतील दंगलीवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापेक्षा चांगल्या शब्दात यावर कुणी भाष्य करुच शकत नाही. दिल्ली मागील चार-पाच दिवसांपासून जळत आहे. सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याने दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीत आतापर्यंत ३६ जणांचा यामध्ये मृत्यू झाला तर २००च्यावर जण जखमी झाले आहेत. अनेकांचे घर, संसार उद्ध्वस्त झाली असून आता या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय. दंगेखोरांनी पोलीस कॉन्स्टेबल रतन लाल आणि गुप्तचर संस्था ‘आयबी’तील अधिकारी अंकीत शर्मा या दोन सुरक्षा कर्मचार्‍यांची हत्या केली. जवानांवर अ‍ॅसिड फेकले. दगड, विटा, बंदुकांचा सर्रास वापर झाला. शेकडो गाड्या, दुकाने, घरे आगीत भस्मसात झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत असताना दंगली उसळाव्यात, हा योगायोग नक्कीच नाही. हे अचानक घडले नाही. गेले दोन-अडीच महिने याचा कट शिजत होता. याची साधी कुणकुण देखील न लागणे किंवा तशी माहिती असल्यास त्यावर ठोस उपाययोजना न आखणे हे गुप्तचर यंत्रणा, दिल्ली पोलीस व केंद्र सरकारचे अपयश आहे, हे आता उघड झाले आहे. आता त्यावर राजकीय चिखलफेक सुरु आहे, जी आपल्याला नवी नाही.


आंदोलनाच्या आडून हिंसा भडकावण्याचा डाव

भारताला दंगली निश्‍चिपणे नव्या नाहीत आतापर्यंत ज्या ज्या दंगली झाल्या त्याला कारणी वेगळी आहे. बहुतांश दंगली या एका मोठ्या षडयंत्राचे भाग होत्या हे कालांतराने सिध्द देखील झाले आहे मात्र प्रत्येकवेळी त्याला धार्मिकतेचे स्वरुप दिले गेले. हा वाद सोडविण्याऐवजी त्याला धग देवून पेटविण्याचे काम धर्माच्या मुद्यावर स्वत:ची राजकीय पोळी शेकणार्‍यांनी इमानेइतबारे केले. आता सध्या देशात जे सुरु आहे ते यापेक्षा वेगळे नाही. सीएएवरुन हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दुफळी निर्माण केली जात आहे. त्यात ढोंगी पुरोगामी, स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणारे स्वार्थी राजकारणी व भारताला अशांत ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या बाह्यशक्ती दिशाभूल करुन मुस्लिमांची डोकं भडकविण्याचे काम करत आहेत. यामुळे शाहीनबागेचे आंदोलन उभे राहिले. मुळात शाहीनबागमधील आंदोलन वेळीच मोडून काढायला हवे होते, पण तसे घडले नाही. त्यातून सीएए समर्थकांचे आंदोलन उभे राहिले. त्यामुळे आंदोलनाच्या आडून हिंसा भडकावण्याचा डाव सफल झाला. यास धार्मिक दंगलीचे स्वरुप देण्यात येत आहे. त्यात अनेक निष्पाप लोकही आहेत. पोलीस कॉन्स्टेबल रतन लाल आणि आयबीचे अधिकारी अंकीत शर्मा या दोन सुरक्षा कर्मचार्‍यांचा दंगलीने बळी घेतला. या दंगलीत बंदुका, पिस्तुलांचा सर्रास वापर करण्यात आला. ही दंगल पूर्वनियोजित होती हे स्पष्ट होते. गेल्या काही दिवसांपासून भारतातील मुस्लिम संकटात असल्याची बांग काही जणांकडून ठोकली जात आहे. 

मुस्लिमांचा केवळ सोईस्कर राजकारणासाठी वापर

भारतात मुस्लिम अल्पसंख्याक म्हणून गणले जात असले तरी अंदाजे २० कोटी मुस्लिम भारतात राहतात. जगभराचा विचार केल्यास जगातील एकूण मुस्लिमांपैकी ११ टक्के मुस्लिम भारतात गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र मुस्लिमांचा केवळ सोईस्कर राजकारणासाठी वापर करुन घेण्यात येतो, हे सत्य स्विकारण्यास मुस्लिम तयार नाहीत. काही पक्ष व नेते आपणच मुस्लिम समाजाचे तारणहार असल्याचा आभास निर्माण करत ढोंगी प्रेमाच्या जाळ्यात त्यांना ओढण्याचा प्रयत्न करतात व मुस्लिम समाज त्यात अलगदरित्या अडकतो. याचे कारण म्हणजे मुस्लिम समाजातील निरक्षरता! जर आपण मुस्लिम समाजातील कोणत्याही नेत्याचे उदाहरण घेतल्यास त्यांची मुलं उच्च शिक्षण घेतांना दिसतात. अनेकांची परदेशात आहेत. मात्र तेच नेते मुस्लिम तरुणांच्या शिक्षणासाठी ठोस अशी भुमिका घेतल्याचे आजवर तरी दिसून आलेले नाही. परिणामी मुस्लिम समाजामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यांना धार्मिक रुढीपरंपरेतून बाहेर काढण्याऐवजी त्यांनी कट्टरतावादाची शिकवण दिली जाते. भारतात ते कसे असुरक्षित आहेत, याचाही खोटा कांगावा करुन काही मुस्लिम नेते समाजाचे तारणहार म्हणून स्वत:ला समाजात मिरवतांना दिसतात. या व्देषाने हिंदू विरुध्द मुसलमान असे धु्रवीकरण होत आहे. यास काही जहाल हिंदुत्ववादी नेतेही वादग्रस्त वक्तव्य करुन आगीत तेल ओतून त्यावर स्वत:ची राजकीय पोळी शेकून घेतात. सध्या सीएएवरुन देशात जे सुरु आहे ते याचाच एक भाग आहे. सीएमुळे येथील मुसलमानांचा काडीमात्रचाही संबंध नाही मुळात हा कायदा कुणाचे नागरिकत्व काढून घेण्याचा नसून देण्याचा आहे. मात्र हे सत्य एकही मुसलमान नेता समाजाला समजवून न देता त्यांचा भावना कशा भडकतील व त्यावर त्याचे राजकीय स्वार्थ कसे पुर्ण होईल, याची काळजी घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करणार्‍या राजकीय पक्षांना मुस्लिम समाजाचा सरकारविरुद्ध अस्त्र म्हणून वापर करायचा आहे. 

'ते' नेते मुस्लिम समाजाचे खरे शत्रू

मोदी सरकारविरुद्ध मुस्लिम समाजाचा उठाव घडवून आणण्यासाठी काँग्रेससह सर्वच राजकीय विरोधकांना आयती संधी मिळाली. त्यामुळे मुस्लिम समाजात या कायद्यांविषयी जितकी भीती घालता येईल तितकी घातली. या कायद्यान्वये मुस्लिमांना देशाबाहेर हाकलले जाईल, असा अपप्रचार करण्यात येत आहे. त्यांच्या हातात दगड व बंदुका देवून त्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्नही सातत्याने करण्यात येत असल्याने आज ईशान्य दिल्ली जळत आहे. हिंदू आणि मुस्लिम एकमेकांचे शत्रू नसून जे राजकारणी स्वत:च्या मुला मुलींना उच्चशिक्षणाला पाठवून अन्य तरुणांच्या हाती दगड देत आहेत तेच नेते मुस्लिम समाजाचे खरे शत्रू आहेत, हे आता सर्व मुस्लिम समाजाने समजून घ्यायला हवे. कट्टर इस्लामिक विचारधारेकडे जाणार्‍यांची अवस्था काय होते, याचा पाकिस्तान, सिरीया, अफगणिस्तानसारख्या देशांच्या स्थितीवरुन बोध घेतला पाहिजे. हा देश आपल्या सर्वांचा आहे. परंतू गेल्या पाच दिवसांपासून शीखविरोधी दंगलीनंतरची अशांतता राजधानी अनुभवते आहे. सोशल मीडियावर अफवांचे पीकं आले आहे. त्यात कट्टरतेचे प्रदर्शन मांडले जात आहे. पण आता तरी सर्वांनी समाजाने सजगपणे वागण्याची वेळ आहे. सुरक्षायंत्रणेसमोर सर्वाच मोठे आव्हान आहे ते, दंगल पसरवणार्‍या, भडकवणार्‍यांना शोधण्याचे. त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे. या क्षणी सुरक्षा यंत्रणांवर अविश्वास दाखवून चालणार नाही. राहीला विषय तो सीएएचा तर, सीएएमुळे कुणाचे नागरिकत्व जाणार नव्हते आणि गेलेही नाही, पण ३६ जणांचे नाहक जीव मात्र गेले हे कुणीही विसरता कामा नये. 

Post a Comment

Designed By Blogger