जळगावात जीव गुदमरतोय!

‘आयक्यूएअर एअर व्हिज्युअल्स’ या संस्थेने जागतिक हवा शुद्धता अहवाल-२०१९ नुकताच जाहीर केला. यानुसार, जगातील सर्वाधिक अशुद्ध हवा असलेल्या ३० शहरांपैकी २१ शहरे भारतीय आहेत. अशुध्द हवेचा विषय सुरु असताना जळगावचा उल्लेख झाला नाही तर चर्चा पुर्णच होणार नाही. गेल्या काही महिन्यांपुर्वी प्रसिध्द झालेल्या एका अहवालात राज्यातील सर्वाधिक प्रदुषित हवा असलेल्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात पहिल्या दहामध्ये जळगाव शहराचाही समावेश होता. आज जळगाव शहरातील मूलभूत सुविधांचा पाया डळमळीत झाला आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि अस्वच्छतेचा प्रश्‍न सर्वव्यापी बनली आहे. परिणामी जळगावकरांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत आहे. रेंगाळलेली अमृत योजना, महामार्गाचे संथ गतीने सुरु असलेले काम, भूमीगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची पार चाळणी झाली आहे. यामुळे खड्डे व त्यातून निघणार्‍या धुळीच्या लोटांमध्ये जळगावकरांना जीव गुदमरायला लागला आहे.


‘सायलंट किलर’ वायूप्रदूषण 

कोरोना व्हायरसमुळे जगभरात मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या अडीच हजाराच्यावर पोहचल्यामुळे हाहाकार उडाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने आणिबाणी घोषित केली आहे. कोरोना व्हायसर निश्‍चितपणे घातकच आहे, यात दुमत नाही मात्र एखाद्या व्हायरसमुळे अडीच तिन हजार जणांचा मृत्यू होतो, ७०-७५ हजाराच्यावर जणांना त्याची लागण होते तेंव्हा त्याकडे जसे गांभीर्याने पाहिले जाते तसे वायू प्रदूषणाच्या समस्येकडे का पाहिले जात नाही? हा मोठा प्रश्‍न आहे. एका अहवालानुसार, हवेच्या प्रदूषणामुळे वर्षाला तब्बल १२ लाख जणांचा मृत्यू होतो. वायूप्रदूषण ‘सायलंट किलर’ ठरत आहे. जगभरात अनेक ठिकाणी हवेच्या प्रदूषणाविषयी माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यावर उपाययोजनाच होत नाहीत, ही मोठी समस्या आहे. आज जळगावची स्थितीही फारशी वेगळी नाही. दिवाळीच्या दिवशी फटाके फोडल्यानंतर किती प्रमाणात वायूप्रदूषण झाले याचे मोजमाप लगेच होते. त्यावेळी हवा किती प्रदूषित होती याची टक्केवारी पाहून वायू प्रदूषणामुळे होणार्‍या आजारांवर उहापोह केला जातो मात्र आज जेंव्हा काम सुरु असलेल्या महामार्गावरुन किंवा अन्य रस्त्यांवरुन एखादी अवजड वाहन जेंव्हा जाते तेंव्हा त्यामागे धुळीचे लोट उठतात. त्यामुळे होणारे वायूप्रदूषण कधी मोजणार? वायू प्रदूषणामुळे श्वसन, नेत्रविकार आणि त्वचेशी निगडित अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढले आहे. गंभीर हवा प्रदूषणाला सामोरी जाणारी लहान मुले गणित शिकण्यात मागे पडत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. विनाकारण होणारी चिडचिड, नैराश्य आणि थकवा यालाही हवेचे प्रदूषण जबाबदार आहे. 

जळगावकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

आज मितीस जळगाव शहरातील बहुतांश रस्त्यांची दैना झाली आहे. (विशिष्ट लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचा रहिवास असलेला परिसर सोडून) अमृत योजनेचे काम जे सप्टेंबर २०१९ पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित होते ते आतापर्यंत जेमतेम ५० टक्के झाले आहे. शहरातून जाणार्‍या आठ किमीच्या महामार्गाचे काम तसेच तिन ठिकाणी होणार्‍या उड्डाणपुलांचे काम संथगतीने सुरु आहे. यामुळे अपघात होवून त्यात मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे परंतू यासह सायलंट किलर ठरणार्‍या वायूप्रदूषणामुळे जळगावकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होवू लागले आहेत, याकडेही लक्ष देण्याची वेळ आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मते, आपल्या सभोवताली दोन प्रकारची प्रदूषित हवा असते. एक म्हणजे घातक, विषारी वायू हवेत मिसळल्याने झालेले प्रदूषण आणि दुसरे म्हणजे हवेतील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धुलिकणांमुळे होणारे प्रदूषण. वायूयुक्त हवेमध्ये प्रामुख्याने कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, ओझोन, नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर ऑक्साइड यांचे प्रमाण अधिक असते. तर धुलिकण मिश्रीत हवेमध्ये अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण अधिक असते. हे धुलीकण इतके सूक्ष्म असतात, की ते केवळ फुप्फुसात खोलवर जात नाहीत तर रक्त वाहिन्यांपर्यंत पोहोचून शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पोहोचतात. अतिसूक्ष्म धुलिकणांचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात, आज जळगाव शहरातील हवेतील वाढते धुलिकणांचे प्रमाण चिंतेचे कारण बनले आहे. वाढत्या अतिसूक्ष्म धुलिकणांचा परिणाम सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यावर होतो आहे. मुख्यत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि फुप्फुसाचे विकार असलेल्या नागरिकांना अधिक फटका बसतो. या धुलिकणांमुळे मुलांना सातत्याने फुप्फुसांमध्ये संसर्ग, फुप्फुसांच्या वाढीतील अडथळे आणि दम्याच्या विकाराला सामोरे जावे लागते आहे. तर मोठ्या माणसांना दमा, श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे आजार आणि फुप्फुसाच्या कर्करोगाचा सामाना करावा लागतो आहे. ज्येष्ठ नागरिकांना या आजारांचा धोका आहेच, शिवाय त्यांचे हृदय, रक्तवाहिन्या, मेंदूसाठी देखील हे प्रदूषण धोकादायक ठरते आहे. हृदयविकाराचा झटका, उच्चरक्तदाब, अर्धांगवायुच्या झटक्यामागेही हवेचे प्रदूषण एक कारण ठरते.

प्रदुषणामुळे सरासरी मानवी आयुष्य चार वर्षांनी कमी

या अनुषंगाने जळगावकरांच्या आरोग्यावर होणार्‍या या परिणामांचा अभ्यास केल्यास धक्कादायक निष्कर्ष समोर येवू शकतात. यास जळगावमधील राजकीय लोकप्रतिनिधींची अनास्था कारणीभूत आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. लोकप्रतिनिधींकडून दरवेळी घेतली जाणारी सो÷ईस्कर भुमिका, राजकीय चिखलफेक, कामांवरुन श्रेयवाद किंवा आरोप-प्रत्यारोप आणि केवळ मलाईदार विषयांमध्ये असणारा विशेष रस, हा जळगावच्या प्रगतीमधील सर्वात मोठा स्पीडब्रेकर ठरत आहे. आतापर्यंत लोकप्रतिनिधींच्या भुमिकेचा परिणाम सर्वसामान्यांवर कितपत होत होता याचे मूल्यमापन जो तो आप आपल्यापरिने करेलच मात्र सध्या रस्त्यांवरील खड्डे व त्यातून उडणार्‍या धुळीमुळे जळगावकरांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. तो तातडीने थांबविण्यासाठी ठोस उपाययोजनांची आखणी करण्याची आवश्यकता आहे. आपण सर्वप्रकारचे कर नियमित भरत असल्याने सर्व मुलभुत सुविधा मिळणे हा जसा प्रत्येकाचा अधिकार आहे तसाच श्वसनासाठी रोज शुद्ध हवाच मिळणे हा देखील आपला अधिकार आहे. प्रदुषणामुळे सरासरी मानवी आयुष्य चार वर्षांनी कमी होत असल्याचे आता संशोधनाअंती सिध्द देखील झाले आहे मग विषाची परीक्षा घेण्यात अर्थ नाही. शहरात धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी रेंगाळलेली विकास कामे व त्यातही चाळणी झालेल्या रस्त्यांची कामे त्वरीत पुर्ण करण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींही राजकीय जोडे बाजूला ठेवून हा प्रश्‍न सोडविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

Post a Comment

Designed By Blogger