शेतकर्‍यांना ‘अवकाळी’ मार!

गेल्या वर्षी अतिवृष्टीनंतर दिवाळीत गारपीट व वादळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावला गेला. या धक्क्यातून कसेबसे सावरलेल्या शेतकर्‍यांनी पुन्हा मोठ्या हिंम्मतीने कापूस, मका, हरबरा, गहू आदी पिकांची पेरणी केली. हे पिकं कापणीला आले असताना आता गेल्या ४८ तासांपूर्वी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा राज्यभरात हजेरी लावली. याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे द्राक्षबागांसह, आंबा, टरबूजचे मळे संकटात आले आहेत, तर रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारच्यावतीने एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना कर्जमाफी दिलेली असताना दुसरीकडे पावसाने शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ केली आहे. त्यामुळे आधीच कर्जाच्या बोजाखाली असलेल्या शेतकर्‍याच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे मका, कापासाची निर्यात बंद आहे. अन्य व्यापारावरदेखील याचा परिणाम जाणवू लागला आहे. एकामागून एक सुरु असलेली संकटांची मालिका संपायचे नाव घेत नसल्याचे शेतकरीच स्वत:चे जीवन संपविण्याचा दुर्देवी मार्ग निवडू लागला आहे. अशा संकटात सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.


शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान

सामान्यतः जून ते सप्टेंबर हे पावसाचे महिने मानले जातात. परंतु जूनमध्ये केवळ तोंड दाखवून मान्सून गायब होतो आणि जुलैच्या मध्यात अनेक ठिकाणी पुन्हा हजेरी लावतो. परतीचा पाऊस सप्टेंबरच्या मध्यापर्यंत येण्याची अपेक्षा असते. परंतु ऐन ऑक्टोबरमध्ये पाऊस कोसळणे हे बिघडलेल्या निसर्गचक्राचे निदर्शक आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून असेच काहीसे चित्र दरवर्षी दिसते. यंदा देशाच्या अनेक भागांमध्ये इतका मुसळधार पाऊस ऑक्टोबरमध्ये कोसळला की, या गेल्या शंभर वर्षांमधील उच्चांक मोडला. ऐन दिवाळीच अवकाळी पाऊसाने सर्वत्र थैमान घातले होते. यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले होते. जिथे पीक काढून टाकले, तिथेच कोंब उगवले. सोयाबीन, तूर, ज्वारी, फुलांच्या शेतीचे नुकसान झाले. हा खर्‍या अर्थान ओला दुष्काळ होता कारण एकीकडे. पिके पाण्याखाली गेलीच आहेत, पण दुसरीकडे शेतकरी, त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यांतील पाणीही थांबत नव्हते. त्यावेळी राज्यातील राज्यकर्त्यांना शेतकर्‍यांपेक्षा सरकारस्थापना महत्त्वाची वाटत असल्याने शेतकर्‍यांना वेळेवर मदत मिळालीच नाही. अशा संकटातही शेतकरी स्वत:च्या हिंम्मतीवर उभा राहीला. यंदाच्या हंगामात तरी गेल्यावेळेचे नुकसान भरुन निघेल अशी अपेक्षा होती. जळगाव जिल्ह्यास अनेक भागांमध्ये कापसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जात. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सहा हजार प्रति क्विंटलपर्यंत भाव गेला. मात्र त्यानंतर चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला. परिणामी चीनमधील उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली. निर्यात बंद झाली. याचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर झाला. 

पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत

गेल्या १५ दिवसात कापसाचे भाव घसरले आहेत. अन्य पिकांच्या बाबतीतही सारखीच परिस्थिती आहे. दुसरीकडे देशावर आर्थिक संकटाच वादळ घोंगावत आहे. मंदीमुळे उद्योग बंद पडत आहेत. लाखो लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. अमेरिका व चीन मधील व्यापारयुध्दात होरपळलेली जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येण्याची चिन्हे दिसत नसतांना आता चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. चीनमध्ये पसरत असलेला धोकादायक आणि प्राणघातक कोरोनाव्हायरस मानवासह उद्योगजगतावरही विपरित परिणाम करीत आहे. एक-एक करून वेगवेगळी क्षेत्रे त्याला त्याला बळी पडत आहेत. याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतावरही होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आधीच भारताचा जीडीपीचा रेट गेल्या पाच वर्षात निच्चांकी पातळीवर आहे. देशांतर्गत महागाईने कळस गाठला आहे. भारतातील या आर्थिक मंदीच्या काळात कोरोनामुळे आयात उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा फटका शेतकर्‍यांना देखील बसण्याची शक्यता आहे. कारण शेतीशी निगडीत अनेक विषयांवर भारत चीनवर अवलंबून आहे. आता चीनमधील उद्योग बंद पडले तर रासायनिक खते, पेस्टीसाईड्स आदींच्या किंमती वाढू शकतात. आधीच शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्ज आहेच. एकंदरीच संकटांची मालिका चहूबाजूने घेरून आली आहे. या संकटातून शेतात उभा असलेला मका, ज्वारी, द्राक्षबागा तारुण नेतील अशी अपेक्षा असताना, शनिवारी राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी आल्या. यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या नुकसान झाले. विशेष करुन द्राक्ष उत्पादक आणि ज्वारी उत्पादक शेतकर्यांना याचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत पडला आहे. 

बळीराजाला दिलासा देण्यासाठी उपाययोजना आवश्यक

काही ठिकाणी या पावसात खळ्यात मळ्यात उघड्यावर असलेला कांदा भिजून खराब झाला. अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला. कांदे भिजून खराब झाले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहेच, पण जगायचे कसे आणि मरायचे कसे या विवंचनेत आहे. आधीच शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. त्यात आता अवकाळी पावसाने भर घातली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तोच जर खचला तर कसे होईल? यामुळे अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेल्या शेतकर्‍यांना पडेल ती किंमत मोजून जगवायला हवे. या संकटावर मात व्हावी. यासाठी सरकारने कोणतेही राजकारण न करता चौकटीबाहेर जावून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सध्या ठाकरे सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र ती लातफितीत अडकणार नाही, याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सध्या जे नुकसान झाले आहे, त्याचेही तातडीने पंचनामे करुन बळीराजाला दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कारण आधीच राज्यातील शेतकरी खचला आहे. त्याला आता जर दिलासा न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होवू शकतात, यामुळे ठाकरे सरकारची जबाबदारी निश्‍चितपणे वाढली आहे. तसेच निर्यात कोंडीमुळे निर्माण झालेल्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारशी देखील चर्चेचा मार्ग खुलाच ठेवावा लागेल. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच शेतकर्‍यांना दिलासा मिळू शकतो.

Post a Comment

Designed By Blogger