आरोग्य यंत्रणा बळकटीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना हव्या

चीनच्या वुहान शहरापासून सर्वत्र पसरलेल्या करोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गुरुवारी दोन लाखांच्या वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यूची संख्या ८,९५३ वर पोहोचली आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १४६ भारतीयांना आणि २५ परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. चीननंतर सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत पाच हजार हून अधिक जणांनी आपले प्राण करोनामुळे गमावले आहेत तर जवळपसा ८१ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. इराण व इटलीसारख्या देशांची स्थिती पाहता आकाराने छोटे असूनही या देशातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जास्त आहे. इटलीमध्ये आत्तापर्यंत दिड हजार हून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेतही कोरोनाही १०० पेक्षा जास्त जणांची जीव घेतला आहे. त्या तुलनेत भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात बरीच खबरदारी घेण्यात आलेली दिसते. करोना विषाणूच्या संसर्ग रोखण्याबाबत महिनाभर केंद्रीय व राज्यातील आरोग्य यंत्रणांनी केलेली तयारी आणि प्रतिबंधात्मक उपाय कौतुकास्पद आहेत. 


महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा सज्ज, पण .....

आपत्कालीन परिस्थिती असो किंवा मानवनिर्मित वा नैसर्गिक संकटे, यात सर्वात जास्त ताण आरोग्य व्यवस्थेवर येतो. म्हणूनच पुरेसे मनुष्यबळ, औषधसाठा, लोकसहभाग अर्थात जागरुकता महत्त्वाचे ठरतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेले निर्णय निश्‍चितपणे कौतूकास्पद आहेत. देशपातळीवर प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, परदेशात अडकलेल्या भारतीयांना रेस्क्यू करण्यासाठी मोदी सरकारने वेळीच पावले उचलली. रेस्क्यू ऑपरेशनसाठी सर्वाधिक उड्डाणे घेत चीन, ईराण, इटली इत्यादी देशांतून भारतीयांची सुटका करून त्यांना मायदेशात परत आणण्यात आले. भारताने आपल्या नागरिकांसोबतच १० हून अधिक देशांतील नागरिकांनाही करोना प्रभावित देशातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. यामध्ये मालदीव, म्यानमार, बांग्लादेश, चीन, अमेरिका, नेपाल, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांसारख्या देशांचाही समावेश आहे. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय राबविण्यात येत आहेत. 

साथरोग रुग्णालयाचा प्रस्ताव गेले दशकभर धूळ खात 

राज्यात करोना विषाणू साथीचा प्रसार वाढू लागल्याने राज्य सरकारने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या  महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा आणि जलतरण तलाव बंद केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी प्रमुख प्रार्थनास्थळे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी काही प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत तर काही ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. करोनाग्रस्त रुग्णांना इतरांपासून वेगळे ठेवण्यासाठी ‘आयसोलेशन कॅम्प’ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या संशयितांच्या आणि रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत करोना व्हायरस पोहचू शकला नाही. मात्र आरोग्य यंत्रणांच्या बळकटीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत आपण आजही गंभीर नसल्याचेच चित्र आहे. भविष्यात कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करणे हे दीर्घकालीन धोरण हवे, असे मत राज्याचे निवृत्त वैद्यकीय महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी नुकतेच व्यक्त केले होते. ते अगदी १०० टक्के योग्य आहे. भविष्यात अशी आपत्ती राज्यावर आल्यास त्याचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी राज्याची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. पुण्यात साथरोग रुग्णालयाचा प्रस्ताव गेले दशकभर धूळ खात पडला आहे. यावर वेळीच निर्णय झाला असता तर या संकटसमयी त्याची मोठी मदत झाली असती. 

वॉर अगेन्स्ट व्हायरस

करोना व्हायरस हे वेगळ्या प्रकारचे युद्ध आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचना पाळा. घरातच राहा, गर्दी टाळा. स्वत:हून काही बंधने पाळा, असे सांगतानाच हे वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याने रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊन नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हे करत असताना सरकारच्या पातळीवर आधी ज्या चुका झाल्या आहेत त्याची दुरुस्तीही तातडीने करण्याची आवश्यकता आहे. कारण आपण कितीही संशोधन, तंत्रज्ञान, विज्ञानाच्या गप्पा मारत असलो तरी एका व्हायरसने संपूर्ण जगाला पुर्णपणे हतबल केले आहे, हे विसरुन चालणार नाही. महराष्ट्रात लातूर जिल्ह्याच्या किल्लारी परिसरात १९९३साली मोठ्या भूकंपामुळे सारा देश हादरून गेला होता. यापासून धडा घेत १९९५ साली आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते. केंद्र सरकारने २००५साली आपत्कालीन व्यवस्थापन कायदा संमत करून प्रत्येक राज्याला याबाबतचा आराखडा तयार करणे कायद्याने बंधनकारक केले. आताही संसर्गजन्य आजारापासून लढण्यासाठी ठोस आराखडा व तयारी करण्याची आवश्यकता आहे. याची पायाभरणी महाराष्ट्रातूनच झाली तर त्याचे अनुकरण अन्य राज्य देखील निश्‍चितपणे करतील. हे करत असताना समाजातील प्रत्येक घटकाचीही ही जबाबदारी आहे, की कोरोना विरुध्दाच्या या युध्दात प्रत्येकाना आपआपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडावी. आरोग्य यंत्रणा त्यांच्या परीने काम करत आहेत. आपण स्वत:ची काळजी घेणे म्हणजे एकाप्रकारे त्यांना मदत करणेच आहे.

Post a Comment

Designed By Blogger