जगभरात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ व्हायरसने भारतातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांची एकूण संख्या १३७ झाली आहे, ज्यामध्ये २४ परदेशींचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त ४२ प्रकरणे आहेत. तर संशयितांची संख्या हजारोच्या घरात आहे. भारतात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. चीनमध्ये जवळपास चार हजार जणांची बळी घेतल्यानंतर आता इटली, इराण, फ्रान्ससह युरोपिय देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. एका छोट्याश्या विषाणूमुळे जगात सर्वात शक्तीशाली मानल्या जाणर्या अमेरिकेसह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आपआपल्या परीने काम करत आहे, त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच आतापर्यंत भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. ही जमेची बाजू असताना दुसरीकडे अनेकांना या गंभीर संकटाचे जराही गांभीर्य दिसून येत नाही. सोशल मीडियावर तर अफवा व उपाययोजना सांगणार्या कथित तज्ञांचे पीकं आले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने लोकांनी घरात बसावे व घरून काम करावे, अशी विनंती वजा आवाहन सरकार करीत असले तरी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातील काही अपवाद वगळता गदी अजूनही म्हणावी तेवढी कमी झालेली नाही.
परिस्थिती हाताबाहेर जावू नये...
केरळपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या या व्हायरसने आता पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण देशातील कोरोनाव्हायरस रुग्णांची आकडेवारी आणि एकूण परिस्थिती पाहता कोरोनाव्हायरस दुसर्या टप्प्यात आहे, असा दिलासा इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने दिला आहे. चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बर्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे. कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असली तरी राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे परिस्थिवर लक्ष ठेवून आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शॉपिंग मॉल्स, जीम, शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. निवडणुका व परीक्षा पुढे ढकालण्यात आल्या आहेत. खाजगी कंपन्यांमध्येही वर्क फॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयांमध्येही आवश्यकतेनुसारच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर, गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक, शिर्डीतील साई मंदिरासह राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरे बंद ठेवली आहेत. एकंदरीत परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे.
उच्चशिक्षित लोकचं बेजबाबदारपणे वागणे
पोलीस, आरोग्य यंत्रणांसह अनेक स्वयंसेवी संस्थादेखील कोरोना व्हायरस विरुध्द छेडलेल्या युध्दात ‘बॅटल ग्राऊंड’वर उतरले आहेत. मात्र अजूनही आपण या विषयाकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. गेल्या आठवडाभरात सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. काही ‘अर्धवटरावां’मुळे हा गंभीर विषय सोशल मीडियावर टिंगलटवाळीचा विषय ठरत आहे. याबाबतचे अनेक मिम्स् व जोक्स व्हायरल होत आहेत. इतकेच नव्हे तर अफवा पसरवणारी बनावट सरकारी परिपत्रके तयार करणारे किंवा बनावट व्हिडीओंमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सरकार ओरडून ओरडून सांगतयं की, गरज असेल तरच घराबाहेर पडा परंतू रेल्वेंमधील चित्र वेगळेच सांगत आहे. तोंडावर मास्क लावून बिनदिक्कत फिरणारे अनेक ठिकाणी आढळून येत आहेत. विदेशवारी करुन आलेल्यांनी स्वत:हून चाचणी करुन घ्यायला हवी मात्र इकडे संशयित रुग्णच रुग्णालयातून पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. या महाभागांमुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे मात्र त्यांना कोणाचीच पर्वा नाही, असे सध्यातरी दिसून येत आहे. पुण्यात तर संशयित रुग्ण आढळून आलेल्या कुटूंबावरच नव्हे तर संपूर्ण सोसायटीवर जणू बहिष्कार टाकल्यागत त्यांच्याशी व्यवहार होत असल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. गावात राहणार्या किंवा कमी शिकलेल्यांची अनेकवेळा टिंगलटवाळी केली जाते मात्र ज्या घटना समोर आल्या आहेत त्यात उच्चशिक्षित लोकचं बेजबाबदारपणे वागत असल्याचे समोर आले आहे.
करोनाने हात-पाय पसरल्यास त्याला रोखणे कठिण
यात काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी नेहमीप्रमाणे अतिरेक सुरु केला आहे. मुंबईत कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी रेल्वे व लोकल बंद ठेवणे कसे फायदेशिर आहे, याची मॅरेथॉन चर्चा आपण दिवसभर पाहिली. पण रेल्वे व लोकलमधून केवळ सरकार किंवा खाजगी नोकरी करणारेच प्रवास करतात का? हातावर पोट असणारे लाखों लोकांनी जर प्रवास केला नाही तर संध्याकाळी त्यांच्याघरी चूल पेटणार नाही, अशी परिस्थिती आहे. या करीता माध्यमांनीही या काळात अधिक जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर सरकार बस, रेल्वे, लोकलसह अन्य प्रवासी वाहतूकही बंद करेल मात्र ही वेळच येवू नये म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. १.३ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या महाकाय देशात करोनाने हात-पाय पसरल्यास त्याला रोखणे कठिण बनून जाईल. याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. आवश्यता नसेल तर घराबाहेर न पडता कुटूबियांसोबतच जास्तीजास्त वेळ घालवा. मात्र घरी असताना दररोज मिळणार्या एक जीबी नेटच्या मदतीने सोशल मीडियावर अफवा फैलवू नका. कारण आता जर परिस्थिती हाता बाहेर गेली तर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यापलीकडे कोणताच पर्याय शिल्लक राहणार नाही. जर असे झाले तर हातावर पोट असणारे गरीब हे कोरोनामुळे नव्हे तर भूकेने निश्चित मरतील, याकरीता प्रत्येकाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जबाबदारीने वागायला हवे.
Post a Comment