कोरोना विरुध्द लढाईत उद्योगजगत मैदानात!

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात ३,८०,००० लोकांना करोनाची लागण झाली असून तब्बल १६,००० जणांचे बळी करोनाने घेतले आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास ५,००० जणांचे बळी तर एकट्या इटलीत गेले आहेत. भारतातही कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत ५००च्यावर जणांना याची लागण झाली असून ९ जणांचा बळी देखील गेला आहे. भारतातील सार्वधिक १०१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. करोनाचा प्रसार ज्या गुणाकार पद्धतीने होत आहे ते अत्यंत धोकादायक आहे. कोरोना जायबंदी करण्यासाठी सर्वच देश प्रयत्नशील आहेत. भारतातही कोराना विरुध्द सुरु असलेल्या या लढाईत केंद्र व राज्य सरकार पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहे. आता सरकारच्या मदतीला उद्योग जगतदेखील धावून आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता अनेक प्रतिष्ठित व्यक्ती पुढे सरसावले असून यासाठी मोठ्याप्रमाणात निधीची उभारणी करुन भारतातील उद्योगपतींनी जगासमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे.

अर्थव्यवस्था देखील अडचणीत

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने अनेक देशांपाठोपाठ राज्य व आतातर जिल्ह्यांनी देखील त्यांच्या सिमा बंद केल्या आहेत. आयात-निर्यात ठप्प झाल्याने बड्या कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प बंद ठेवले आहेत. देशात विमान, रेल्वे, रस्ते वाहतूक ठप्प पडल्याने अर्थव्यवस्थेच्या गतीला ब्रेक लागला आहे. मंदीची झळ बड्या अर्थव्यवस्थांना बसू लागल्याने जगभरातील बेरोजगारांची संख्या २ कोटी ५० लाखांपर्यंत वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने व्यक्त केली आहे. भारतात कोरोना हा सध्या दुसर्‍या टप्प्यात आहे. पण ज्या पद्धतीने तो पसरतोय, त्यामुळे तो केव्हाही तिसर्‍या टप्प्यात पोहोचू शकतो. कोरोनाचा फटका उद्योगजगताला बसला असून अर्थव्यवस्था देखील अडचणीत आली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटाचा सामाना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारच्या मदतीला काही मोठे उद्योजक सरसावले होते. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, चीनमधील प्रसिद्ध उद्योगपती जॅक मा यांच्या जॅक मा फाउंडेशन आणि अलिबाबा फाउंडेशन यांनी कोरोनाग्रस्तांसाठी भरघोस निधी देण्याची घोषणा केली. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कोविड-१९ विषाणूवरील उपचार शोधण्यासाठी १०० दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केल्यानंतर भारतीय उद्योगपतींनीही मदत जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. उद्योगपती आता पुढे येताना दिसत आहेत. 

भारतीय उद्योगपती संकटसमयी पुढे 

देशातील सर्वच उद्योग ठप्प पडल्याने बेरोजगारीचे संकट गहिरे होण्याचे संकेत मिळू लागले आहे. या संकटसमयी कंपनी कोणालाही कामावरून काढणार नाही. तसेच कोणाचे वेतनही कापणार नाही, असा निर्णय देशातील मोठ्या उद्योगपतींनी घेतला आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आगामी काही महिन्यांचे आपले १०० टक्के वेतन कंपनीच्या समाजसेवा शाखेला देण्याची घोषणा केली आहे. यासह, कोरोनाग्रस्तांसाठी व्हेंटिलेटर्स तयार करण्यापासून, महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्टही उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली असून केवळ सवंग लोकप्रियतेची घोषणा न करता त्या दृष्टीने काम देखील सुरु केले आहे. अब्जाधीश उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या वेदांता समूहाने भारतातील आपल्या खाणीतील रोजंदारी व कंत्राटी कामगारांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्याची घोषणा केली आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी स्वदेशी व्हेंटिलेटर संशोधनासाठी ५ कोटी रुपये जाहीर केले आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समुहाने दोन आठवड्यांच्या अत्यंत कमी कालावधीत १०० बेडची क्षमता असलेले देशातील पहिले करोना समर्पित रुग्णालय उभारले आहे, तर क्वारेंटाईन फॅसिलिटी, चाचणीच्या किट आणि प्रति दिन १० लाख मास्कची निर्मिती रिलायन्सकडून केली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीने सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनने मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात १०० बेडची क्षमता असलेले केंद्र सुरू केले आहे. करोनाबाधित रुग्णांवर इथे उपचार केले जाणार आहेत. रिलायन्स प्रति दिन १० लाख मास्क निर्मिती करण्याची तयारी करत आहे. यासोबतच खाजगी सुरक्षा साहित्य निर्मिती करण्यावरही भर दिला जात आहे. करोना व्हायरसविरोधात दोन हात करत असलेल्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांसाठी आवश्यक कपडेही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रिलायन्सने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५ कोटी रुपयांची मदत केली आहे.

निस्वार्थ सेवेचा नवा पायंडा

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात ‘सीएसआर’ वर अधून मधून चर्चा होतच असते. अनेक कंपन्या किंवा उद्योग घराणे यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असले तरी काहीवेळा यावर टीका होत असते मात्र आता कोरोना विरुध्द सुरु असलेल्या या युध्दात उद्योग जगताने सर्व स्वार्थ बाजूला ठेवत निस्वार्थ सेवेचा नवा पायंडा पाडला आहे. याचे कौतूक करायलाच हवे. जसे देशातील डॉक्टर्स, नर्सेस, सर्व आरोग्य यंत्रणा व पोलीस यंत्रणा आपआपल्या परिने लढा देत आहेत तसेच प्रत्येकाने एका सैन्याप्रमाणे या लढाईत उतरणे केवळ आवश्यकच नाही तर काळाची गरज देखील आहे. आपण पाहतोय कि सरकारने सर्वत्र कलम १४४ लागू केल्यानंतर घराबाहेर पडण्यासाठी बंदी केली असताना विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यांवर गर्दी करणार्‍या महाभागांची कमी नाही. हे जणू सरकारचे काम आहे, याच्याशी आमचे काही एक घेणे देणे नाही, अशा आविर्भात रहाणार्‍यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्याची आवश्यकता आहे. जी चुक इटली, फ्रान्स, जर्मनी या युरोपिय देशांनी केली ती आपल्याला परवडणारी नाही. यासाठी जबाबदारीने वागा, वेळ अजूनही गेलेली नाही.


Post a Comment

Designed By Blogger